भारतीय महिला क्रिकेट संघाची उपकर्णधार स्मृती मानधना सध्या चर्चेत आहे. अमिताभ बच्चन यांच्या 'कौन बनेगा करोडपती' या कार्यक्रमात बोलताना तिनं विविध मुद्द्यांवर भाष्य केलं. स्मृती मानधनानं तिच्या इथपर्यंतच्या प्रवासाबद्दल भाष्य केलं असून, यशाचे श्रेय आई-वडिलांना दिलं आहे. अलीकडेच पार पडलेल्या ऑस्ट्रेलियाविरूद्धच्या कसोटी सामन्यात तिनं अप्रतिम कामगिरी केली. इंस्टाग्रामवर स्मृतीचे ८५ लाखांहून अधिक फॉलोअर्स आहेत. अमिताभ बच्चन यांच्यासमोर स्मृतीनं वैयक्तिक जीवनाबद्दल देखील भाष्य केलं अन् आयुष्याचा जोडीदार कसा यावर आपलं मत मांडलं.
आयुष्याचा जोडीदार कसा असावा?
शोमध्ये उपस्थित असलेल्या प्रेक्षकांमधील एका तरुणाने स्मृती मानधनाला एक भन्नाट प्रश्न केला. "सोशल मीडियावर तुझे खूप फॉलोअर्स आहेत. भारतातील अनेक तरूण मुलं तुला फॉलो करतात. त्यामुळे तुला माझा प्रश्न आहे की तुला मुलांमध्ये कोणते गुण आवडतात?", हा प्रश्न ऐकताच अमिताभ बच्चन यांना हशा पिकला. चाहत्याच्या प्रश्नावर 'तुझं लग्न झालं आहे का?' अशी विचारणा अमिताभ यांनी केली. यावर मुलानं सांगितलं की, लग्न झालं नाही म्हणूनच हा प्रश्न विचारला आहे. यावर स्मृती म्हणाली की, मला वाटतं की काळजी करणारा असावा आणि माझ्या खेळाला समजून घ्यायला हवं. या दोन महत्त्वाच्या गोष्टी आहेत ज्या मला त्याच्याकडे पाहिजे आहेत. कारण मी त्याला जास्त वेळ देऊ शकणार नाही, म्हणून त्यानं या गोष्टी समजून घेतल्या पाहिजेत आणि नेहमी काळजी घ्यायला हवी.
भारतीय क्रिकेटपटूने सांगितला किस्सा
आठवणींना उजाळा देताना स्मृतीनं म्हटलं, "माझे वडील आणि भाऊ दोघेही लहानपणापासून क्रिकेटशी निगडीत होते. हे माझ्या बाबांचेच स्वप्न होते की, आपल्या घरातील कोणीतरी राष्ट्रीय पातळीवर क्रिकेट खेळावे." स्मृतीचे वडील श्रीनिवास मानधना आणि भाऊ श्रवण यांनी सांगलीत जिल्हास्तरीय क्रिकेट खेळले आहे. तसेच मला वाटतं मी माझ्या आईच्या पोटात असल्यापासून क्रिकेटचा सराव करायचे. भाऊ खेळत असताना नेटच्या मागून बघून मी फलंदाजी शिकले. खरं तर मी उजव्या हाताने खेळते, पण माझा भाऊ लेफ्टी होता, ते पाहूनच मी डाव्या हाताने फलंदाजी करायला शिकले. मी नेटच्या मागे उभी राहून त्याला पाहत राहायचे. मला वाटते की मी तिथूनच क्रिकेट खेळायला सुरुवात केली, असेही स्मृतीने सांगितले.
अमिताभ बच्चन यांनी स्मृतीच्या आई-वडिलांचे कौतुक करताना म्हटले, "तुम्हा दोघांचे खूप खूप अभिनंदन... या आधुनिक कल्पना आहेत. महिलांना पुरूषांप्रमाणेच संधी मिळत असल्याचे पाहून आनंद वाटतो." बिग बींच्या प्रतिक्रियेनंतर स्मृती म्हणाली की, लोक माझ्या आई-वडिलांना टोमणे मारायचे. 'ती क्रिकेट खेळायला गेली अन् काळी झाली तर तिच्याशी कोणी लग्न करणार नाही'. पण सगळ्यात चांगली गोष्ट म्हणजे आई-बाबांनी कधीच याची पर्वा केली नाही आणि त्यांनी मला माझी स्वतंत्र ओळख निर्माण करण्यासाठी मदत केली.
Web Title: Indian women's cricket team vice-captain Smriti Mandhana and Ishan Kishan appeared on Amitabh Bachchan's KBC show
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.