मुंबई : विश्वचषक स्पर्धेतील संघाच्या कामगिरीवर मी खूश आहे. एकूणच ही स्पर्धा आमच्यासाठी चांगली ठरली. महत्त्वाचे म्हणजे या स्पर्धेच्यानिमित्ताने खूप चांगले बदल झाले असून आता भारतीय महिला क्रिकेटचे ‘अच्छे दिन’ सुरू झाले आहेत, असे महिला विश्वकप क्रिकेट स्पर्धेतील उपविजेत्या भारतीय संघाची कर्णधार मिताली राजने म्हटले आहे.
बुधवारी रात्री अडीचच्यादरम्यान भारतीय संघाचे मुंबईत आगमन झाले. या वेळी संघाचे जोरदार स्वागत करण्यात आले. ‘इंडिया... इंडिया’ अशा घोषणांनी संपूर्ण विमानतळ दणाणून गेले. यानंतर दुपारच्या सत्रात झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये कर्णधार मितालीसह संपूर्ण संघ उपस्थित होता.
मितालीने या वेळी म्हटले, ‘‘स्पर्धेतील पहिल्या सामन्यात मिळवलेल्या विजयानंतर सर्वांचा आत्मविश्वास कमालीचा वाढला आणि आम्ही अंतिम फेरीपर्यंत धडक मारली. तसेच, विश्वचषक पात्रता आणि चौरंगी मालिका खेळल्याचा फायदा झाल्याने विश्वचषक स्पर्धेत चांगली कामगिरी करण्यात यश आले.’’
एकूणच स्पर्धेतील कामगिरी पाहता महिला संघाने संपूर्ण देशाचे मन जिंकले. यामुळे आता महिलांच्या आयपीएल स्पर्धेचीही चर्चा होऊ लागली. याबाबत प्रश्न विचारले असता मितालीने म्हटले, ‘‘जर दोन वर्षांपूर्वी हा प्रश्न विचारला असता, तर कदाचित मी याचे समर्थन केले नसते. परंतु, विश्वचषक स्पर्धेनंतर आता याची शक्यता आहे. ज्या प्रकारे खेळाडूंनी खेळ केला आहे आणि महिला क्रिकेटच्या स्तरामध्ये सुधारणा झाली आहे, ते पाहता महिला क्रिकेट आता वेगळ्या उंचीवर गेले आहे.’’
त्याचप्रमाणे, ‘‘एका डावात ३०० हून अधिक धावा फटकावणे, प्रत्येक संघाकडे शतक झळकावणारे
फलंदाज आणि पाच बळी घेणारे गोलंदाज उपलब्ध असणे हे सर्व आॅस्टेÑलिया व इंग्लंड येथे सुरू असलेल्या लीगमुळे शक्य झाले. या लीगमध्ये खेळून अनेक खेळाडूंनी आपल्यात सुधारणा करत देशासाठी खेळताना चांगले योगदान दिले,’’ असेही मितालीने म्हटले.
आयपीएलसारख्या लीग स्पर्धेद्वारे देशांतर्गत खेळाडूंनाही आपला स्तर उंचावण्याची मदत होईल, असे सांगताना मितालीने म्हटले, ‘‘आता आमच्याकडे आधार आहे आणि याद्वारे देशांतर्गत खेळाडूंनाही फायदा होईल. परंतु, लीग आयोजित करणे बीसीसीआयचे काम आहे. एक खेळाडू म्हणून मला वाटते, की देशांतर्गत खेळाडूंना चांगले क्रिकेटचे वातावरण मिळाले आणि त्यांना विदेशी क्रिकेटपटूंसह खेळण्याची संधी मिळाली, तर नक्कीच त्याचा त्यांना फायदा होईल.’’
मुंबई विमानतळावर झालेले भव्य स्वागत पाहून भारावलेल्या मितालीने म्हटले, ‘‘अशा प्रकारचे झालेले स्वागत पाहून मी खूप भावनिक झाले. पहिल्यांदाच आमचे अशा प्रकारचे स्वागत झाले. २००५ मध्येही काहीसे असे स्वागत झाले होते, परंतु तेव्हा आम्ही बीसीसीआयअंतर्गत नव्हतो. त्यामुळे या वेळी आमचे स्वागत कसे होईल, हाच विचार माझ्या मनात होता. मुलींना अशा प्रकारचे स्वागत झालेले पाहून नक्कीच आनंद झाला असेल.’’
लॉडर््सवर खेळणं प्रत्येक क्रिकेटपटूचं स्वप्न असते. अंतिम सामना खेळून आम्ही आमचे स्वप्न साकारले. या सामन्यादरम्यान दबाव खूप होता, परंतु आम्ही क्रिकेटचा पुरेपूर आनंद घेतला.
-झूलन गोस्वामी, वेगवान गोलंदाज
जेव्हा तुम्ही खेळत असता, तेव्हा नाणेफेकीचा काहीच भरवसा नसतो. पहिले किंवा नंतर फलंदाजी करण्याने काहीच फरक पडत नाही. आम्ही धावांचा चांगल्या प्रकारे पाठलाग केला. परंतु, अंतिम क्षणी आमच्याकडून चुका झाल्या.
- पूनम राऊत, सलामीवीर
मला लहानपणापासूनच आक्रमक फलंदाजीची आवड होती. मी याच प्रकारे खेळ शिकले असून मी मुलांसोबत खेळून क्रिकेट शिकले. मुले सहज षटकार खेचत. मलाही त्यांच्याप्रमाणे फटकेबाजी करणे आवडायचे. अंतिम सामन्यात आम्हाला धावांची आवश्यकता होती आणि मी धावा करण्याचा प्रयत्न करीत होती. मी मारलेला फटका क्षेत्ररक्षकाच्या हातात गेल्याने खूप निराश आहे. आॅस्टेÑलियाविरुद्धची फलंदाजी विशेष ठरली. अशी खेळी मी देशांतर्गत स्पर्धेमध्ये केली आहे. मात्र आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये अशी मोठी खेळी केली नव्हती. आॅस्टेÑलियाविरुद्धचा सामना आम्हाला जिंकायचा होता आणि मोक्याच्या वेळी ही मोठी खेळी केली याचा आनंद आहे. आवश्यकता असताना खेळी साकारली आणि संघ जिंकला. -हरमनप्रीत कौर, अष्टपैलू
Web Title: Indian Women's cricket welcome mumbai Airport
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.