जोहान्सबर्ग : चांगल्या सुरुवातीनंतर मधल्या व तळाच्या फळीतील फलंदाज अपयशी ठरल्यामुळे भारतीय महिला क्रिकेट संघाला रविवारी दक्षिण आफ्रिकेविरुद्ध तिस-या टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यात पाच गड्यांनी पराभव स्वीकारावा लागला. दक्षिण आफ्रिका संघाने या विजयासह पाच सामन्यांच्या मालिकेत आव्हान कायम राखले. मालिकेत यजमान संघ १-२ ने पिछाडीवर आहे.
दक्षिण आफ्रिकेत प्रथमच टी-२० मालिका जिंकण्यास उत्सुक असलेला भारतीय संघ १२ व्या षटकात २ बाद ९३ अशा दमदार स्थितीत होता, पण तरी पाहुण्या संघाचा डाव १७.५ षटकांत १३३ धावांत संपुष्टात आला.
प्रत्युत्तरात दक्षिण आफ्रिका संघाने शानदार कामगिरी करताना एक षटक शिल्लक राखत विजय साकारला. दक्षिण आफ्रिकेतर्फे लिजेल ली (०५) झटपट माघारी परतल्यानंतर कर्णधार डेन वान निकर्क (२६ धावा, २० चेंडू) आणि स्यून लुस (४१ धावा, ३४ चेंडू) यांनी उपयुक्त भागीदारी केली. निकर्क बाद झाल्यानंतर लुस हिने मिगनोन डू प्रीजच्या (२०) साथीने तिस-या विकेटसाठी ५० धावांची भागीदारी केली. क्लो टायरनने १५ चेंडूंना सामोरे जाताना ३४ धावांची आक्रमक खेळी केली.
भारतातर्फे वेगवान गोलंदाज पूजा वस्त्रकारने २१ धावांत दोन बळी घेतले. अनुजा पाटीलची कामगिरी निराशाजनक ठरली. तिने ४ षटकांत ४४ धावा बहाल करताना केवळ एक बळी घेतला. त्याआधी, भारतीय संघाने अखेरच्या पाच विकेट केवळ ९ धावांच्या मोबदल्यात गमावल्या.
नाणेफेक गमाविल्यानंतर प्रथम फलंदाजी करणाºया भारतीय संघाला कर्णधार हरमनप्रीत कौर (४८) व स्मृती मंधाना (३७) यांनी १२ व्या षटकात २ बाद ९३ धावांची मजल मारून दिली होती. या दोन्ही खेळाडू बाद झाल्यानंतर भारताचा डाव गडगडला. हरमनप्रीतने ३० चेंडूंना सामोरे जाताना २ षटकार व ६ चौकार लगावले. पहिल्याच षटकात अनुभवी मिताली राज (०) बाद झाल्यानंतर हरमनप्रीत
व स्मृती यांनी दुस-या विकेटसाठी आक्रमक ५५ धावांची भागीदारी केली.
लेग स्पिनर निकर्कने स्मृती मानधना हिला बाद करीत ही भागीदारी संपुष्टात आणली. स्मृतीने २४ चेंडूंमध्ये ५ चौकार व १ षटकार लगावला. वेगवान गोलंदाज शबनम इस्माईलने (५-३०) हरमनप्रीत कौरला बाद करीत पहिले यश मिळवले. वेगवान गोलंदाज मासाबाता क्लासची (२-२०) शबनमला योग्य साथ लाभली. (वृत्तसंस्था)
भारत महिला : १७.५ षटकात सर्वबाद १३३ धावा (हरमनप्रीत कौर ४८, स्मृती मानधना ३७, वेदा कृष्णमूर्ती २३; शबनम इस्माइल ५/३०, मसाबता क्लास २/२०) पराभूत वि. दक्षिण आफ्रिका महिला : १९ षटकात ५ बाद १३४ धावा (सून लूस ४१, सी. ट्रायोन ३४, डी वॅन नीकर्क २६; पूजा वस्त्रकार २/२१)
Web Title: Indian women's defeat in the third match
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.