Join us  

INDW vs AUSW 2022: "धोनी माझा आदर्श असून मला त्याला भेटायचं आहे", भारतीय महिला खेळाडूने व्यक्त केली इच्छा

सध्या भारतीय महिला आणि ऑस्ट्रेलियाच्या महिला संघामध्ये ट्वेंटी-20 मालिकेचा थरार रंगला आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: December 14, 2022 2:11 PM

Open in App

मुंबई : सध्या भारतीय महिला आणि ऑस्ट्रेलियाच्या महिला संघामध्ये ट्वेंटी-20 मालिकेचा थरार रंगला आहे. मालिकेतील सलामीच्या सामन्यात कांगारूच्या संघाने विजय मिळवला तर दुसऱ्या सामन्यात यजमान संघाने विजय मिळवून मालिकेत 1-1 ने बरोबरी साधली. खरं तर सुपर ओव्हरमधील अखेरच्या चेंडूपर्यंत रंगलेल्या सामन्यात भारतीय महिलांनी बलाढ्य ऑस्ट्रेलियाचा 4 धावांनी पराभव केला. आज मालिकेतील तिसरा सामना पार पडणार आहे. मागील सामन्याचा निकाल सुपर ओव्हरमध्ये लागला होता.

दरम्यान, ऑस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजी करून 20 षटकांत 1 बाद 187 धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात भारतीय संघाने 20 षटकांत 5 बाद 187 धावा केल्या. त्यामुळे धावसंख्या बरोबरीची झाली आणि सामन्याच्या निकालासाठी सुपर ओव्हर खेळवावी लागली. सुपर ओव्हरच्या पहिल्या चेंडूवर भारताच्या रिचा घोषने षटकार ठोकला तर दुसऱ्या चेंडूवर ती बाद झाली. भारताकडून तिसऱ्या चेंडूचा सामना कर्णधार हरमनप्रीत कौरने केला आणि 1 धाव काढून स्मृतीला फलंदाजीची संधी दिली. मानधनाने याचा पुरेपुर फायदा घेत आपल्या पहिल्याच चेंडूवर चौकार नंतर एक षटकार आणि अखेरच्या चेंडूवर 3 धावा काढल्या. भारताने सुपर ओव्हरमध्ये कांगारूसमोर विजयासाठी 21 धावांचे आव्हान ठेवले होते. 

भारतीय संघाची सलामीवीर रिचा घोष हिने तिसऱ्या सामन्याच्या पूर्वसंध्येला पत्रकार परिषदेत विविध मुद्द्यांवर भाष्य केले. "सुपर ओव्हरमध्ये स्मृती मानधनाने मला आक्रमक खेळण्यासाठी प्रोत्साहित केले. त्यामुळेच मी पहिल्याच चेंडूवर षटकार मारू शकले. मी नेहमीच आक्रमक शॉर्ट खेळण्यावर भर दिला आहे. मी नेहमी शेवटपर्यंत टिकून राहण्याचा आणि माझ्या संघासाठी जिंकण्याचा प्रयत्न करते. यासाठी आमचा प्लॅन होता", असे रिचाने दुसऱ्या सामन्याच्या खेळीवर सांगितले. 

"धोनी माझा आदर्श असून मला त्याला भेटायचं आहे"तसेच भारतीय पुरूष संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी माझा आदर्श असल्याचे तिने सांगितले. धोनीबद्दल बोलताना ती म्हणाली, "मी दिग्गज एमएस धोनी याला पाहून मोठी झाली, तो प्रचंड दबावाखाली मॅच फिनिशिंग कारनाम्यासाठी ओळखला जात होता. लहानपणापासून मी धोनीला फॉलो केले आहे. माझ्या वडिलांनी (मानबेंद्र घोष) माझी पॉवर हिटिंग कौशल्ये वाढवण्यासाठी खूप मदत केली, ते माझ्याबरोबर सर्वत्र जायचे. मात्र मी अद्याप माझा आदर्श धोनीला भेटू शकले नाही. मला अजून त्याला भेटण्याची संधी मिळाली नाही. आशा आहे की मी त्याला कधीतरी भेटेन."  ऑस्ट्रेलिया मालिकेसाठी भारतीय संघ - हरमनप्रीत कौर (कर्णधार), स्मृती मानधना (उपकर्णधार), शेफाली वर्मा, यास्तिका भाटिया (यष्टीरक्षक), जेमिमाह रॉड्रिग्स, दीप्ती शर्मा, राधा यादव, राजेश्वरी गायकवाड, रेणुका सिंग ठाकूर, मेघना सिंग, अंजली सरवाणी, देविका वैद्य, एस मेघना, रिचा घोष (यष्टीरक्षक), हरलीन देओल.

नेट गोलंदाज - मोनिका पटेल, अरुंधती रेड्डी, एसबी पोखरकर, सिमरन बहादूर. 

टी-20 मालिकेचे वेळापत्रक

  1. भारत विरूद्ध ऑस्ट्रेलिया - 9 डिसेंबर, सायंकाळी 7 वाजल्यापासून 
  2. भारत विरूद्ध ऑस्ट्रेलिया - 11 डिसेंबर, सायंकाळी 7 वाजल्यापासून 
  3. भारत विरूद्ध ऑस्ट्रेलिया - 14 डिसेंबर, सायंकाळी 7 वाजल्यापासून
  4. भारत विरूद्ध ऑस्ट्रेलिया - 17 डिसेंबर, सायंकाळी 7 वाजल्यापासून
  5. भारत विरूद्ध ऑस्ट्रेलिया - 20 डिसेंबर, सायंकाळी 7 वाजल्यापासून 

 

टॅग्स :भारत विरुद्ध ऑस्ट्रेलियाभारतीय महिला क्रिकेट संघभारतीय क्रिकेट संघमहेंद्रसिंग धोनीस्मृती मानधना
Open in App