माऊंट माऊंगानुई : गोलंदाजांच्या चमकदार कामगिरीनंतर सलामीवीर फलंदाज स्मृती मानधनाच्या शानदार फलंदाजीच्या जोरावर भारतीय महिला संघाने दुसऱ्या वन-डे क्रिकेट सामन्यात न्यूझीलंडचा ८ गडी राखून पराभव केला आणि तीन सामन्यांच्या मालिकेत २-० ने सरशी साधली. भारतीय महिलांनी १९९५ मध्ये एकमेव वन-डे सामना जिंकून मालिका जिंकली होती. त्यानंतर २००५-०६ मध्ये न्यूझीलंडने ४-१ अशा फरकाने भारताला पराभूत केले होते. त्यामुळे तब्बल २४ वर्षांनी भारतीय महिला संघाने न्यूझीलंडमध्ये वन-डे मालिका जिंकण्याचा पराक्रम केला.
नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी स्वीकारणाºया भारताने न्यूझीलंडचा डाव ४४.२ षटकांत १६१ धावांत गुंडाळला. त्यानंतर ‘प्लेअर आॅफ द मॅच’ मानधना (नाबाद ९०) व कर्णधार मिताली राज (नाबाद ६३) यांनी तिसºया विकेटसाठी १५१ धावांची अभेद्य भागीदारी करीत संघाला विजय मिळवून दिला. एकवेळ भारताची २ बाद १५ अशी अवस्था होती. सलामीवीर जेमिमा रोड्रिगेज (०) आणि दीप्ती शर्मा (८) यांना मोठी खेळी करता आली नाही.
मानधनाचे हे गेल्या १० वन-डे सामन्यांतील सातवे अर्धशतक होते. आज तिने ८२ चेंडूंना सामोरे जाताना ९० धावा केल्या. दुसºया टोकाकडून मितालीने १११ चेंडूंना सामोरे जात ६३ धावा केल्या. मितालीने षट्कार ठोकत भारताला ३५.२ षटकांत २ बाद १६६ धावांची मजल मारून दिली.
मिताली म्हणाली, ‘संघाच्या कामगिरीमुळे खूश आहे. आव्हानात्मक परिस्थितीमध्ये फलंदाजी करणे मला नेहमीच चांगले वाटते. येथे संयमाने खेळण्याची गरज होती. स्मृती फॉर्मात असून तिच्यासोबत खेळपट्टीवर टिकून राहण्याची गरज होती.’
आयसीसी महिला चॅम्पियनशिप मालिकेच्या या लढतीत भारताने २-० ने आघाडी घेतली. पहिला सामन्यात भारताने ९ विकेटने सरशी साधली होती. त्याचसोबत भारतीय संघाने यापूर्वी खेळल्या गेलेल्या आयसीसी महिला चॅम्पियनशिप मालिकेत न्यूझीलंडकडून १-२ ने पत्कराव्या लागलेल्या पराभवाची परतफेड केली.
भारताने प्रथम गोलंदाजी करत किवी संघाला १६१ धावांत बाद केले. झुलन गोस्वामीने २३ धावांत ३ बळी घेतले. फिरकीपटू एकता बिष्ट, पूनम यादव आणि दीप्ती शर्मा यांनी प्रत्येकी दोन बळी घेतले. न्यूझीलंडतर्फे सर्वाधिक ७१ धावा कर्णधार एमी सॅटर्थवेट हिने केल्या. (वृत्तसंस्था)
धावफलक-
न्यूझीलंड : सुजी बेट््स झे. तानिया गो. झुलन ००, सोफी डेवाईन पायचित गो. शिखा ०७, लारेन डाऊन झे. स्मृती गो. एकता १५, एमी सॅटर्थवेट झे. तानिया गो. पूनम ७१, अमेलिया केर त्रि. गो. एकता ०१, मॅडी ग्रीन त्रि. गो. पूनम ०९, ले कास्पेरेक त्रि. गो. झुलन २१, बर्नाडाईन बी त्रि. गो. दीप्ती १३, अन्ना पीटरसन नाबाद ०४, हन्ना रोव त्रि. गो. दीप्ती ००, लिया ताहूहू त्रि. गो. झुलन १२. अवांतर (८). एकूण ४४.२ षटकांत सर्वबाद १६१. बाद क्रम : १-०, २-८, ३-३३, ४-३८, ५-६२, ६-१२०, ७-१३६, ८-१४८, ९-१४८, १०-१६१.
गोलंदाजी : झुलन ८.२-२-२३-३, शिखा ६-०-१९-१, एकता ८-१-१४-२, दीप्ती ९-०-५१-२, पूनम १०-०-३८-२, हेमलता ३-०-१६-०.
भारत : जेमिमा रोड्रिगेज झे. अमेलिया गो. अन्ना ००, स्मृती मानधना नाबाद ९०, दीप्ती शर्मा झे. बर्नाडाईन गो. लिया ०८, मिताली राज नाबाद ६३. अवांतर (५). एकूण ३५.२ षटकांत २ बाद १६६. बाद क्रम : १-२, २-१५.
गोलंदाजी : ताहूहू ६-१-१६-१, पीटरसन ५-१-२६-१, कास्पेरेक ८-१-२९-०, डेवाईन ५-०-२७-०, केर ८.२-१-३८-०, रोव २-०-१८-०, सॅटर्थवेट १-०-१०-०.
Web Title: Indian women's team beat New Zealand 24 years later
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.