Harmanpreet Kaur Team India | ढाका : तीन सामन्यांच्या वन डे मालिकेतील अखेरचा आणि निर्णायक सामना अनिर्णित करून बांगलादेशच्या महिला संघाने भारताच्या तोंडचा घास पळवला. भारतीय कर्णधार हरमनप्रीत कौरच्या वादग्रस्त विकेटने सामना चर्चेत राहिला. सामन्यानंतर बोलताना हरमनने काही गंभीर आरोप करत प्रश्न उपस्थित केले. काही निर्णयांवर समाधानी नसून अत्यंत खराब अम्पायरिंग आज पाहायला मिळाली, असे हरमनने सांगितले.
हरमनचा संताप
सामन्यानंतर हरमनप्रीतने म्हटले, "मला वाटते की या सामन्यातून आम्हाला खूप काही शिकायला मिळाले. क्रिकेटशिवाय इथे अम्पायरिंगचा हा प्रकार पाहून मी थक्क झाले. जेव्हा आम्ही पुढच्या वेळी येऊ तेव्हा आम्ही अशा प्रकारच्या अम्पायरिंगसाठी आधीच तयार असू. मी या आधीही सांगितले होते की, इथे अत्यंत खराब अम्पायरिंग आहे. काही निर्णयांमुळे मी दुखावले आहे." एकूणच भारतीय कर्णधाराने बांगलादेश क्रिकेट बोर्डावर नाराजी व्यक्त केली.
दरम्यान, भारतीय कर्णधार हरमनप्रीत कौरच्या वादग्रस्त विकेटने अनेकांचे लक्ष वेधले. अम्पायरने बाद देताच हरमनने संताप व्यक्त करत स्टम्पच्या दिशेने बॅट भिरकावली. स्वीप मारण्याच्या प्रयत्नात असलेली हरमन फसली अन् बांगलादेशी खेळाडूंनी विकेटसाठी अपील केली. खरं तर स्लिपमध्ये झेलचा दावा केला त्यासाठी अपील केली गेली. मात्र, अम्पायरने तिला LBW बाद घोषित करताच हरमनचा राग अनावर झाला. हरमनप्रीत १४ धावा करून तंबूत परतली.
बांगलादेशने तोंडचा घास पळवला
बांगलादेशने दिलेल्या २२६ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना भारताकडून स्मृती मानधना आणि हरलीन देओल यांनी अर्धशतकी खेळी केली. भारताकडून हरलीन देओलने सर्वाधिक (७७) धावांची खेळी केली, तर स्मृती मानधना (५९), हरमनप्रीत कौर (१४) आणि जेमिमा रॉड्रिग्जने नाबाद (३३) धावा करून भारताच्या विजयाच्या आशा जिंवत ठेवल्या. पावसामुळे काही वेळ खेळ थांबवण्यात आला होता. पण पावसाच्या व्यत्ययानंतर खेळ सुरू होताच भारताला हरलीन देओलच्या रूपात मोठा झटका बसला. मात्र, मागील सामन्यातील सामनावीर जेमिमाने आजही कमाल करत भारताच्या विजयाच्या आशा जिवंत ठेवल्या. पण जेमिमा (३३) धावांवर नाबाद परतली.
खरं तर अखेरच्या २ षटकांमध्ये भारताला विजयासाठी ९ धावांची गरज होती तर बांगलादेशला १ विकेट हवी होती. सेट फलंदाज जेमिमा खेळपट्टीवर टिकून होती. पण मेघना सिंहला बाद करण्यासाठी बांगलादेशने रणनीती बनवली. मेघनाने ४९वे षटक चांगले खेळले. जेमिमा फलंदाजी करत असताना ४९व्या षटकातील पहिले २ चेंडू निर्धाव गेले. मग तिने एक धाव काढून मेघनाला फलंदाजीची संधी दिली. चौथा चेंडू मेघनाने निर्धाव खेळला तर पाचव्या चेंडूवर चौकार लगावला. सहाव्या चेंडूवर एक धाव काढून मेघनाने स्ट्राईक आपल्याकडे ठेवले. अखेरच्या षटकात भारताला विजयासाठी ३ धावांची गरज होती. पहिल्या दोन चेंडूंवर १-१ धाव काढून मेघनाने विजयाकडे कूच केली. पण तिसऱ्या चेंडूवर मेघनाच्या बॅटला स्पर्श करून चेंडू यष्टीरक्षकाच्या हातात गेला अन् बांगलादेशने भारताच्या तोंडचा घास पळवला आणि सामना अनिर्णित झाला.
Web Title: Indian women's team captain Harmanpreet Kaur expressed her displeasure after being dismissed by the umpire for a controversial decision in the INDW vs BANW match
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.