harmanpreet kaur on bcci | नवी दिल्ली : भारतीय महिला संघाची कर्णधार हरमनप्रीत कौर वादामुळे चर्चेत आहे. बांगलादेशविरूद्धच्या वन डे मालिकेदरम्यान केलेले गैरवर्तन हरमनला चांगलेच भोवले. तिला आयसीसीने शिक्षा ठोठावली असून भारतीय कर्णधाराला आगामी दोन आंतरराष्ट्रीय सामने खेळता येणार नाहीत. त्यामुळे हरमनच्या अनुपस्थितीतच भारतीय संघ आशियाई क्रीडा स्पर्धेतील सुरूवातीचे दोन सामने खेळेल. भारतीय कर्णधार हरमनप्रीत कौर हिने महिलांचे आणखी कसोटी सामने आयोजित करण्याची इच्छा व्यक्त केली आहे. तसेच देशांतर्गत क्रिकेटमध्ये अधिक दिवसांचे सामने आयोजित केले जावेत, असेही तिने म्हटले. तीन कसोटी, १२७ वन डे आणि १५४ ट्वेंटी-२० सामन्यांमध्ये हरमनने भारताचे प्रतिनिधित्व केले आहे.
महिला क्रिकेटच्या फ्यूचर टूर वेळापत्रकानुसार, भारतीय संघ आगामी काळात दोन कसोटी सामने खेळणार आहे. इंग्लंड आणि विश्वविजेत्या ऑस्ट्रेलियन संघाशी भारतीय संघ भिडणार आहे. 'स्काय स्पोर्ट्स क्रिकेट पॉडकास्ट'वर बोलताना हरमनप्रीत म्हणाली की, खेळाडू म्हणून माझी इच्छा आहे की, आम्ही अधिकाधिक कसोटी सामने खेळले पाहिजे कारण लहानपणी आम्ही ट्वेंटी-२० पेक्षा जास्त कसोटी पाहायचो. ट्वेंटी-२० खेळण्यात मजा आहे पण प्रत्येक क्रिकेटपटूला कसोटी क्रिकेट खेळावे असे वाटते. कसोटी क्रिकेट खेळणे चांगले आहे. या वर्षी आम्ही इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियाविरुद्ध प्रत्येकी एक कसोटी खेळू. मला आशा आहे की याचा महिला क्रिकेटवर चांगला परिणाम होईल आणि आम्हाला पुढे आणखी कसोटी खेळायला मिळतील. "महिला प्रीमिअर लीगमधील सामन्यांची संख्या वाढवायला हवी", असे देखील हरमनने नमूद केले.
हरमनची 'मन की बात'तसेच देशांतर्गत क्रिकेट पहिल्यापेक्षा अधिक चांगले होत आहे. जेव्हा मी खेळायला सुरूवात केली होती, तेव्हा कदाचित मोजकेच जण क्रिकेट खेळत होते. पण मागील काही दिवसांपासून देशांतर्गत क्रिकेटचा स्तर वाढला आहे. जास्तीत जास्त सामने टीव्हीवर लाईव्ह दाखवले जातात. क्रिकेटमध्ये चांगले होण्याचा एकमेव मार्ग म्हणजे अधिक खेळणे. सुधारणा नक्कीच होत असून अधिक चांगली प्रतिभा भारतीय संघापर्यंत पोहोचेल. महिला प्रीमिअर लीग हा एक चांगला उपक्रम आहे आणि सर्वांनी त्याचा खूप आनंद घेतला. आशा आहे की पुढच्या वर्षी त्यात आणखी सुधारणा होईल आणि काही युवा खेळाडू समोर येतील, असेही भारतीय कर्णधार हरमनप्रीतने सांगितले.