Asia Cup, INDWvsUAEW: भारतीय महिला संघाच्या विजयाची हॅटट्रिक! स्मृती मानधनाच्या नेतृत्वात UAE चा केला पराभव

भारतीय महिला संघाने यूएईचा पराभव करून आशिया चषकात विजयाची हॅटट्रिक लगावली आहे. 

By ऑनलाइन लोकमत | Published: October 4, 2022 04:43 PM2022-10-04T16:43:52+5:302022-10-04T16:45:03+5:30

whatsapp join usJoin us
Indian women's team has scored a hat-trick of victories in the Asia Cup by defeating the UAE | Asia Cup, INDWvsUAEW: भारतीय महिला संघाच्या विजयाची हॅटट्रिक! स्मृती मानधनाच्या नेतृत्वात UAE चा केला पराभव

Asia Cup, INDWvsUAEW: भारतीय महिला संघाच्या विजयाची हॅटट्रिक! स्मृती मानधनाच्या नेतृत्वात UAE चा केला पराभव

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

सिल्हेट : बांगलादेशच्या धरतीवर सध्या महिला आशिया चषकाचा थरार रंगला आहे. भारतीय संघाने स्पर्धेतील सलामीचे तिन्ही सामने जिंकून विजयाची हॅटट्रिक लगावली आहे. लक्षणीय बाब म्हणजे भारत आज यूएईविरूद्धच्या सामन्यासाठी चार मोठ्या बदलांसह मैदानात उतरला होता. संघाची नियमित कर्णधार हरमनप्रीत कौरला आजच्या सामन्यासाठी विश्रांती देण्यात आली त्यामुळे संघाची धुरा मराठमोळ्या स्मृती मानधनाच्या खांद्यावर सोपवण्यात आली. भारताने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकांत 5 बाद 178 धावा केल्या होत्या. ज्याचा पाठलाग करताना यूएईचा संघ 20 षटकांत 4 बाद केवळ 74 धावा करू शकला. भारतीय गोलंदाजांनी केलेल्या चमकदार कामगिरीमुळे संघाने 104 धावांनी मोठा विजय मिळवला. 

तत्पुर्वी, भारतीय संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. भारतीय संघाची सुरूवात निराशाजनक झाली होती. मात्र जेमिमा रॉड्रिग्ज आणि दीप्ती शर्मा यांनी भारताचा डाव सावरला. दोघींनीही वैयक्तिक अर्धशतकी खेळी करून संघाला मजबूत स्थितीत पोहचवले. या सामन्यात जेमिमा रॉड्रिग्सने नाबाद 75 धावा केल्या तर दीप्ती शर्माने 64 धावा केल्या. भारताने दिलेल्या 179 या विशाल आव्हांनाचा पाठलाग करताना यूएईचा संघ अपयशी ठरला. राजेश्वरी गायकवाडने शानदार गोलंदाजी करून एकतर्फी सामन्यात भारताला विजय मिळवून दिला. जेमिमा रॉड्रिग्जने 45 चेंडूत नाबाद 75 धावा केल्या, तिच्या या शानदार खेळीमुळे तिला सामनावीर पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. 

आजच्या सामन्यासाठी भारतीय संघ - 
स्मृती मानधना (कर्णधार), एस मेघना, जेमिमा रॉड्रिग्ज, डी हेमलता, ऋचा घोष, किरण नविगरे, पूजा वस्त्राकर, स्नेह राणा, दीप्ती शर्मा, रेणुका सिंग,राजेश्वरी गायकवाड. 

7 संघांमध्ये रंगतोय 'सामना' 
1 ऑक्टोबरपासून महिला आशिया चषकाचा थरार रंगला आहे. आयसीसीने अलीकडेच जाहीर केलेल्या फ्युचर टूर प्रोग्राम जाहीर केला होता, ज्यामध्ये ऑक्टोबरमधील 2 आठवडे महिला आशिया चषकाला देण्यात आले आहेत. या स्पर्धेत भारत, पाकिस्तान, श्रीलंका, थायलंड, मलेशिया, यूएई आणि यजमान बांगलादेश हे सात सहभागी झाले आहेत. त्यामुळे किताबासाठी सात संघ आमनेसामने असणार आहेत. 

भारतीय संघाने यूएईविरूद्धचा सामना जिंकून स्पर्धेत सलग तिसरा विजय मिळवला. साखळी टप्प्यात सर्व सात संघ एकमेकांविरुद्ध प्रत्येकी एक सामना खेळतील आणि त्यानंतर अव्वल चार संघ उपांत्य फेरीत प्रवेश करतील. आशिया चषकाचा मागील हंगाम मलेशियाच्या धरतीवर आयोजित करण्यात आला होता, जिथे बांगलादेशने सहा वेळच्या चॅम्पियन भारताचा शेवटच्या चेंडूवर पराभव करून पहिल्यांदाच विजेतेपद पटकावले होते.  

 

Web Title: Indian women's team has scored a hat-trick of victories in the Asia Cup by defeating the UAE

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.