बर्गिंहॅम : राष्ट्रकुल स्पर्धांचा थरार दिवसेंदिवस रंगत चालला आहे. आज क्रिकेटच्या मैदानावर कट्टर प्रतिस्पर्धी भारत आणि पाकिस्तान आमनेसामने आहेत. हरमनप्रीतच्या नेतृत्वातील भारतीय महिला क्रिकेट संघ 'करा किंवा मरा'च्या सामन्यात पाकिस्तानविरूद्ध मैदानात उतरला आहे. पाकिस्तानच्या संघाची सुरूवात निराशाजनक झाली असून संघाला पहिल्या ११.३ षटकांमध्ये ४ बाद केवळ ६४ धावा करता आल्या. भारतीय गोलंदाजांनी आपला दबदबा कायम ठेवत पाकच्या फलंदाजांना तंबूत पाठवले आहे. पाकिस्तान कडून ११.३ षटकांपर्यंत मुनीबा अलीने सर्वाधिक ३२ धावांची खेळी केली आहे. इरम जावेदला तर खाते देखील उघडता आले नाही. पाकिस्तानची कर्णधार बिस्माह महरूफ १९ चेंडूत १७ धावांवर खेळत असताना स्नेह रानाने तिला बाद केले.
तत्पूर्वी, पाकिस्तानच्या संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. भारताकडून स्नेह राना हिने ३ षटकांमध्ये २ बळी पटकावले आहेत. तर मेघना सिंग आणि रेणुका सिंग यांना प्रत्येकी १-१ बळी पटकावण्यात यश आले आहे.
आजच्या सामन्यासाठी भारतीय संघ -हरमनप्रीत कौर (कर्णधार), स्मृती मानधना (उपकर्णधार), शेफाली वर्मा, एस मेघना, यास्तिका भाटिया, दीप्ती शर्मा, मेघना सिंग, रेणुका सिंग, जेमिमा रॉड्रिग्ज, राधा यादव, स्नेह राणा.
आजच्या सामन्यासाठी पाकिस्तानचा संघ - बिस्माह महरूफ (कर्णधार), मुनीबा अली, इरम जावेद, ओमामा सोहेल, आयेशा नसीम, आलिया रियाज, कैनत इम्तियाज, फातिमा सना, तुबा हसन, डायना बेग, अनम अमीन.