मुंबई : बीसीसीआयने वेळेवर पैसे न दिल्यामुळे भारताचा महिला संघ वेस्ट इंडिजमध्ये फसल्याचे पाहायला मिळाले. बीसीसीआयवेस्ट इंडिजच्या दौऱ्यावर असलेल्या खेळाडूंना वेळेवर भत्ते देऊ शकली नाही. त्यामुळे भारतीय महिला संघावर नामुष्कीची वेळ आली आहे.
प्रत्येक दौऱ्यामध्ये खेळाडूंना काही भत्ते दिले जातात. या भत्त्यांमधून त्यांना विदेशामध्ये सर्व खर्च करायचा असतो. ही रक्कम काही वेळा खेळाडूंना आगाऊ दिली जाते. पण यावेळी मात्र भारताचा संघ वेस्ट इंडिजमध्ये पोहोचल्यानंतरही त्यांच्या खात्यामध्ये ही रक्कम जमा करण्यात आली नव्हती. त्यामुळेच भारतीय महिला संघ निराश झालेला पाहायला मिळाला.
बीसीसीआयच्या अध्यक्षपदी भारताचे माजी कर्णधार सौरव गांगुली विराजमान झाले आहेत. गांगुली अध्यक्ष झाल्यावर खेळाडूंना सर्व सुविधा मिळतील आणि त्यांच्या समस्या कमी होतील, असे म्हटले जात होते. पण गांगुलीने अध्यक्षपद सांभाळल्यावर काही दिवसांमध्येच ही वेळ बीसीसीआयवर आली आहे.
बीसीसीआयला याबाबत सूचना मिळाल्यानंतर आता त्यांच्या खात्यामध्ये दैनिक भत्त्याची रक्कम डिपॉझिट केल्याचे वृत्त आहे. पण बीसीसीआयवर ही वेळ नेमकी का आली, याचे उत्तर महिला क्रिकेटचे सर्व कामकाज पाहणारे आणि भाराताचा माजी यष्टीरक्षक साबा करीमने दिले आहे.
साबा म्हणाला की," बीसीसीआयमध्ये काही गोष्टी घडत होत्या. बीसीसीआयमध्ये नव्या कार्यकारीणीचे गठन होत होते. काही दिवसांपूर्वीच बीसीसीआयच्या नव्या कार्यकारणीची स्थापना करण्यात आली. त्यामुळे या गोष्टीला थोडा उशिर झाला. आता खेळाडूंना योग्य ती रक्कम पोचवण्यात आली आहे. यापुढे चुका कशा टाळता येतील, हे आम्ही नक्कीच पाहू."