नागपूर : फॉर्मात असलेल्या स्मृती मंधानाने शानदार सुरुवात करुन दिल्यानंतर कर्णधार मिताली राजची धैर्यपूर्ण खेळी व दीप्ती शर्माच्या नाबाद अर्धशतकाच्या जोरावर भारतीय महिला संघाने गुरुवारी खेळल्या गेलेल्या तिसऱ्या वन-डे आंतरराष्ट्रीय सामन्यात इंग्लंडचा २८ चेंडू व ८ गडी राखून पराभव केला आणि तीन सामन्यांच्या मालिकेत २-१ असा विजय मिळवला. भारताच्या या विजयात गोलंदाजांची भूमिका महत्त्वाची ठरली. भारताने इंग्लंडचा डाव निर्धारित ५० षटकांत ९ बाद २०१ धावांत रोखला. इंग्लंडच्या डावाचे वैशिष्ट्य यष्टिरक्षक फलंदाज एमी जोन्सची ९४ धावांची खेळी ठरले. या व्यतिरिक्त कर्णधार हीथर नाईटने ३६ धावांचे योगदान दिले. भारतातर्फे दीप्ती शर्मा, झुलन गोस्वामी, राजेश्वरी गायकवाड व पूनम यादव यांनी प्रत्येकी दोन बळी घेतले.
लक्ष्याचा पाठलाग करताना भारताची सुरुवात निराशाजनक झाली, पण मंधानाने एक टोक सांभाळून फलंदाजी केली. रियायर्ड हर्ट होण्यापूर्वी मंधानाने ५३ धावांची शानदार खेळी केली तर मितालीने (नाबाद ७४) आपल्या कारकिर्दीतील ५० वे वन-डे अर्धशतक झळकावले. दीप्तीने (नाबाद ५४) षटकार ठोकत आपले नववे अर्धशतक पूर्ण करीत भारताला विजयी लक्ष्य गाठून दिले. भारतने ४२.२ षटकांत २ गड्यांच्या मोबदल्यात २०२ धावा केल्या.
भारतापुढे लक्ष्य मोठे नसले तरी जेमिमा रोड्रिग्स (२) व वेदा कृष्णमूर्ती (७) झटपट बाद झाल्यामुळे भारताला अपेक्षित सुरुवात मिळाली नाही. या दोघींना अन्या श्रबसोले (२-३७) हिने बाद केले. भारताची २ बाद ९९ अशी स्थिती असताना मंधानाला अस्वस्थ वाटत असल्यामुळे खेळपट्टी सोडावी लागली. तिने ६७ चेंडूंना सामोरे जाताना ६ चौकार लगावले. त्यानंतर दीप्तीने मितालीला चांगली साथ दिली. मितालीने स्ट्राईक रोटेट करण्यावर लक्ष दिले तर दीप्तीने काही आक्रमक फटके लगावले. मितालीने १२४ चेंडूंना सामोरे जाताना ९ चौकार लगावले तर दीप्तीने ६१ चेंडू खेळताना ९ चौकार व १ षटकार मारला.
त्याआधी, इंग्लंडने जोन्सच्या खेळीच्या जोरावर द्विशतकाची वेस ओलांडली. तिने ११९ चेंडूंना सामोरे जाताना ७ चौकार व १ षटकार लगावला. भारताने पहिल्या वन-डेमध्ये एक गडी राखून विजय मिळवला होता तर दुसºया लढतीत इंग्लंडने ८ गड्यांनी सरशी साधली होती. (वृत्तसंस्था)
>स्मृती ठरली मालिकावीर
अलीकडेच आॅस्ट्रेलियाची मालिका व तिरंगी स्पर्धेत निराशाजनक कामगिरी झाल्यानंतर भारताचा मालिका विजय विशेष महत्त्वाचा ठरला आहे. भारताच्या मालिका विजयाची नायिका निश्चितच स्मृती मंधाना ठरली आहे. तिने तीन सामन्यात १८१ धावा केल्या. तिची मालिकावीर पुरस्कारासाठी निवड झाली. दीप्ती सामनावीर पुरस्काराची मानकरी ठरली.
Web Title: Indian women's team win series
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.