कोलंबो : अनुजा पाटीलच्या अष्टपैलू कामगिरीच्या जोरावर भारतीय महिला संघाने पाच सामन्यांच्या टी-२० मालिकेत चौथ्या सामन्यात सोमवारी श्रीलंका महिला संघाचा ७ गडी राखून पराभव केला आणि मालिकेत ३-० अशी विजयी आघाडी घेतली.
अनुजाने श्रीलंकेच्या तीन फलंदाजांना बाद करण्याव्यतिरिक्त नाबाद ५४ धावांची खेळी केली. तिने जेमिमा रॉड्रिग्जसोबत (नाबाद ५२) चौथ्या विकेटसाठी ९६ धावांची अभेद्य भागीदारी केली. जेमिमानेही ३७ चेंडूत ५ चौकार व २ षटकारांसह नाबाद ५२ धावांची तडाखेबंद खेळी केली.
भारताने यापूर्वी श्रीलंकेचा वन-डे सामन्यांच्या मालिकेत २-१ ने पराभव केला होता. मैदान खेळण्यायोग्य नसल्यामुळे उशिरा प्रारंभ झालेली ही लढत प्रत्येकी १७ षटकांची खेळविण्यात आली. भारतीय संघाने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारण्याचा निर्णय घेताना श्रीलंकेला निर्धारित १७ षटकांत ५ बाद १३४ धावांत रोखले. श्रीलंकेतर्फे चमारी अटापट्टू (३१) आणि शशिकला सिरिवर्धने (४०) यांचे योगदान उल्लेखनीय ठरले.
भारताने विजयासाठी आवश्यक धावा १५.४ षटकांत ३ गड्यांच्या मोबदल्यात पूर्ण केल्या. भारतीय संघ ४ षटकांत ३ बाद ४१ असा संघर्ष करीत होता, पण फॉर्मात असलेली रॉड्रिग्ज व अनुजा यांनी वैयक्तिक अर्धशतके झळकावित सहज विजय साकारला. गेल्या लढतीत ५७ धावांची खेळी करणाऱ्या रॉड्रिग्जने या लढतीतही जबरदस्त फटकेबाजी केली. अनुजाने ४२ चेंडूंच्या खेळीमध्ये ५४ धावा केल्या. श्रीलंकेतर्फे
तीनही बळी ओशादी रणसिंघने
घेतले. (वृत्तसंस्था)
संक्षिप्त धावफलक : श्रीलंका महिला : १७ षटकात ५ बाद १३४ धावा. (शशिकला सिरिवर्धने ४०, चमारी अटापट्टू ३१; अनुजा पाटील ३/३६.) पराभूत वि. भारत महिला : १५.४ षटकात ३ बाद १३७ धावा. (अनुजा ५४*, जेमिमा रॉड्रिग्ज ५२, ओशादी रणसिंघे ३/३३)
Web Title: Indian women's team wins T20 series against Sri Lanka
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.