नवी दिल्ली : सध्या दक्षिण आफ्रिकेच्या धरतीवर ICC अंडर-19 महिला ट्वेंटी-20 विश्वचषकाचा थरार रंगला आहे. आज भारतीय संघाने आपल्या सलामीच्या सामन्यात यजमान आफ्रिकेच्या संघाला पराभूत करून विजयी सलामी दिली. दक्षिण आफ्रिकेने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकांत 5 बाद 166 धावा केल्या होत्या. ज्याचा पाठलागा करताना भारतीय संघाची कर्णधार शेफाली वर्माने शानदार खेळी केली. शेफाली वर्माने केवळ 16 चेंडूत 45 धावांची स्फोटक खेळी केली. शेफालीने 9 चौकार आणि 1 षटकार ठोकून विश्वचषकाची सुरूवात अविस्मरणीय केली. तर श्वेता सेहरावतने 57 चेंडूत 92 धावांची नाबाद खेळी करून भारताच्या विजयावर शिक्कामोर्तब केला. लक्षणीय बाब म्हणजे श्वेताने तिच्या खेळीत एकूण 20 चौकार ठोकले. अखेर भारताने 7 विकेट आणि 21 चेंडू राखून पहिला सामना आपल्या नावावर केला.
भारतीय महिलांचा बोलबाला तत्पुर्वी, यजमान दक्षिण आफ्रिकेच्या संघाने नाणेफेक जिंकली आणि प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. आफ्रिकेच्या संघाने देखील ताबडतोब सुरूवात करून भारतीय गोलंदाजांवर दबाव टाकला होता. आक्रमक खेळी करणाऱ्या सिमोन लॉरेन्स (61) धावांवर धावबाद करण्यात भारताला यश आले आणि यजमान संघाला मोठा झटका बसला. अखेरच्या काही षटकांमध्ये मॅडिसन लँड्समने 17 चेंडूत नाबाद 31 धावांची खेळी केली आणि भारतासमोर विजयासाठी 167 धावांचे तगडे लक्ष्य ठेवले. खरं तर भारतीय संघाची कर्णधार शेफाली वर्माने अष्टपैलू खेळी करून संघाच्या विजयात मोलाची भूमिका पार पाडली. तिने 4 षटकांत 31 धावा देत 2 बळी पटकावले. याशिवाय सोनम यादव आणि पार्शवी चोप्रा यांना प्रत्येकी 1-1 बळी घेण्यात यश आले.
भारताची विजयी सलामी दक्षिण आफ्रिकेने दिलेल्या 167 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना भारताची सुरूवात शानदार झाली. कर्णधार शेफाली वर्माने 16 चेंडूत 45 धावांची खेळी करून आफ्रिकेच्या गोलंदाजांना घाम फोडला. मात्र, मियाने स्मित हिने शेफालीचे अर्धशतक हिसकावले आणि तिला तंबूत पाठवले. त्यानंतर श्वेता सेहरावतने भारताच्या फलंदाजीची धुरा सांभाळली. मोठे फटकार मारत श्वेताने भारताची विजयाकडे कूच केली. श्वेताच्या नाबाद 92 धावांच्या खेळीच्या जोरावर भारताने ट्वेंटी-20 विश्वचषकात विजयी सलामी दिली. भारतीय संघाने 16.3 षटकांत 3 बाद 170 धावा करताना 7 विकेट आणि 21 चेंडू राखून विजय संपादन केला.
आजच्या सामन्यासाठी भारतीय संघ - शेफाली वर्मा (कर्णधार), श्वेता सेहरावत, गोंगडी त्रिशा, सौम्या तिवारी, ऋचा घोष (यष्टीरक्षक), सोनिया मेंढिया, हृषिता बसू, अर्चना देवी, पार्शवी चोप्रा, शबनम एमडी, सोनम यादव. ICC अंडर-19 महिला ट्वेंटी-20 विश्वचषकाची स्पर्धा दक्षिण आफ्रिकेत 14 ते 29 जानेवारी 2023 दरम्यान खेळवली जात आहे. या स्पर्धेत एकूण 16 संघ सहभागी झाले आहेत. भारताला दक्षिण आफ्रिका, संयुक्त अरब अमिराती (UAE) आणि स्कॉटलंडसह गट ड मध्ये ठेवण्यात आले आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"