व्ही. व्ही. एस. लक्ष्मण लिहितात...विश्वचषकाच्या उपांत्य सामन्यात पराभव झाल्यानंतर तीन आठवडे वादविवादात गेले. आज शनिवारपासून वेस्ट इंडिजविरुद्ध सुरू होत असलेल्या तीन टी-२० सामन्यांच्या मालिकेनिमित्त सर्व फोकस पुन्हा एकदा क्रिकेट मैदानावरील हालचालींवर केंद्रित होत आहे.हे तिन्ही सामने विराट अॅन्ड कंपनीसाठी खडतर आव्हान ठरतील. सध्याचा टी-२० चॅम्पियन विंडीजला जेतेपदाचा दावेदार मानले जात आहे. कॅरेबियन खेळाडू हा प्रकार एन्जॉय करतात. त्यांची आक्रमकता देखील याच प्रकारात चपखल बसते. याच्याविरुद्ध भारताकडे भुवनेश्वर आणि रवींद्र जडेजा वगळता कमी अनुभवी गोलंदाज आहेत. यामुळे कॅरेबियन फलंदाजांना आवर घालणे हे मोठे आव्हान असेल.आव्हानांमधून संधी निर्माण होते हे मी नेहमी मानतो. आगामी मालिकेत खलील अहमद, दीपक चाहर, नवदीप सैनी, कृणाल पांड्या, राहुल चाहर आणि वॉशिंग्टन सुंदर हे युवा खेळाडू आयपीएलच्या कामगिरीची पुनरावृत्ती करीत पुढे जातील यात शंका नाही. ही मालिका युवा चेहऱ्यांचा शोध घेणारी ठरेल, असे माझे मत आहे. मागील काही दिवसात सर्व लक्ष ५० षटकांच्या सामन्यांवर केंद्रित झाले होते. आता पुढील वर्षी आॅक्टोबर- नोव्हेंबरमध्ये आयोजित टी-२० विश्वचषकासाठी संघ बांधणीची प्रक्रिया सुरू होणार आहे. भारताने २००७ च्या विश्वचषक जेतेपदाचा अपवाद वगळता या प्रकारात विशेष काही केलेले नाही. त्यामुळे आगामी विश्वचषकाचा थिंक टँकला विचार करावाच लागणार आहे.
शिखर धवन आता ताजातवाना वाटतो. राहुला चौथ्या स्थानावर खेळताना पाहणे रंजक ठरणार असून रिषभ पंत हा पूर्णकालीन यष्टिरक्षक- फलंदाज म्हणून कशी कामगिरी करतो हे देखील पहावे लागेल. मनीष पांडे आणि श्रेयस अय्यर या दोघांना अंतिम एकादशमध्ये संधी मिळेलच याची खात्री नाही. पहिल्या सात खेळाडूंमध्ये दोघांना गोलंदाजांची भूमिका निभवावी लागेल. त्यामुळे कृणाल पांड्या आणि जडेजा यांचे खेळणे निश्चित असेल. दोघेही डावखुरे अष्टपैलू आहेत. टी-२० त तर विंडीजविरुद्ध भारतीय संघात सहाव्या गोलंदाजाचे महत्त्व अधिकच विषद होत आहे.