Join us  

ऑस्ट्रेलियाविरुद्ध अंतिम लढतीसाठी भारतीय युवा सहाव्या जगज्जेतेपदासाठी सज्ज

१९ वर्षांखालील विश्वचषक : ऑस्ट्रेलियाविरुद्ध सीनिअर्सच्या पराभवाचा हिशेब चुकता करण्याची संधी, आमच्यासाठी प्रत्येक सामना महत्त्वाचा असून विश्वचषकातील सर्वच संघ चांगले आहेत.

By ऑनलाइन लोकमत | Published: February 11, 2024 9:40 AM

Open in App

बेनोनी : भारताचे युवा क्रिकेटपटू रविवारी १९ वर्षांखालील विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत ऑस्ट्रेलियाविरुद्ध अंतिम लढत जिंकून विक्रमी सहावे जगज्जेतेपद उंचावण्यासाठी सज्ज झाले आहेत. गतवर्षी १९ नोव्हेंबरला ऑस्ट्रेलियाने रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील भारताच्या वरिष्ठ संघाला विश्वचषकाच्या अंतिम लढतीत पराभूत केले होते. त्यामुळे संपूर्ण देश दु:खात होता. आता उदय सहारनच्या नेतृत्वाखालील संघ १९ वर्षांखालील ऑस्ट्रेलियन संघाला पराभूत करून देशवासीयांना जगज्जेतेपदाचा आनंद देण्यास उत्सुक आहे.

कर्णधार सहारन याने याआधी सांगितले की, अंतिम फेरीत आमच्यासमोर ऑस्ट्रेलिया असो की पाकिस्तान; आम्हाला काहीही फरक पडत नाही. आम्ही विरोधी संघावर लक्ष न देता आमच्या खेळावर लक्ष देत आहोत. आम्ही प्रत्येक सामन्यासाठी योजना आखली असून प्रत्येक सामना गांभीर्याने घेत आहोत. वरिष्ठ संघ ऑस्ट्रेलियाविरुद्ध पराभूत झाला होता; त्यामुळे या सामन्यासाठी कोणती रणनीती असेल याबाबत तो म्हणाला की, वरिष्ठ संघाच्या कामगिरीवरून आम्ही कोणताही विचार करत नाही. आम्ही आमच्या खेळावर लक्ष देत असून सर्वोत्तम कामगिरीस तयार आहोत. आमच्यासाठी प्रत्येक सामना महत्त्वाचा असून विश्वचषकातील सर्वच संघ चांगले आहेत.

ऑस्ट्रेलियाचा कर्णधार ह्यू वेबगेन, सलामीवीर हॅरी डिक्सन, वेगवान गोलंदाज टाॅम स्ट्रेकर आणि कॅलम विडलर यांनी सातत्याने शानदार कामगिरी केली असून, ते भारतासाठी त्रासदायक ठरतील. भारताच्या १९ वर्षांखालील संघाने २०१२ आणि २०१८च्या अंतिम लढतीत ऑस्ट्रेलियाला पराभूत केले होते. त्यामुळे यंदाही भारतच विजेतेपदाचा प्रबळ दावेदार आहे. सहारनच्या नेतृत्वाखालील सध्याचा संघ सुरुवातीला प्रभावी वाटत नव्हता. कारण काही महिन्यांपूर्वी त्यांना १९ वर्षांखालील आशिया चषकाची अंतिम फेरीही गाठता आली नव्हती. पण आता संघाची कामगिरी सुधारली आहे. फलंदाजांच्या यादीत ३८९ धावा करून सहारन आघाडीवर आहे. भारताने प्रत्येक सामन्यात मोठ्या फरकाने विजय मिळवला. उपांत्य फेरीत त्यांना यजमान दक्षिण आफ्रिकविरुद्ध केवळ एक गडी राखून विजय मिळवता आला. सरफराज खानचा छोटा भाऊ मुशीर खान सर्वाधिक धावा करणारा दुसरा फलंदाज आहे. तसेच, तो फिरकी गोलंदाजही आहे.

भारतीय युवा संघ नवव्यांदा अंतिम फेरीत पोहोचला आहे. भारताच्या १९ वर्षांखालील संघाने २०१६ नंतर सर्व अंतिम सामने खेळले आहेत. त्यांपैकी २०१८, २०२२मध्ये त्यांनी विजेतेपद पटकावले; तर २०१६, २०२० मध्ये त्यांना पराभवाचा सामना करावा लागला. विराट कोहलीच्या संघाने २००८मध्ये जगज्जेतेपद पटकावले होते. १९ वर्षांखालील विश्वचषकाने युवराजसिंग, मोहम्मद कैफ, सुरेश रैना, शिखर धवन, रोहित शर्मा, कोहली, रवींद्र जडेजा, के. एल. राहुल, ऋषभ पंत, शुभमन गिल आणि यशस्वी जैस्वाल यांसारखे स्टार क्रिकेटपटू दिले आहेत. 

प्रसिद्धीच्या शिखरावर पोहोचल्यानंतरही अपयशी ठरलेल्यांमध्ये २०००च्या दशकाच्या सुरुवातीला रीतिंदर सिंग सोढी आणि गौरव धीमान यांच्यासह उन्मुक्त चंद, हरमित सिंह, विजय झोल, संदीप शर्मा, अजितेश अर्गल, कमल पासी, सिद्धार्थ कौल, स्मित पटेल, रविकांत सिंग आणि कमलेश नागरकोटी अशी मोठी यादी आहे. पृथ्वी शाॅ आपली कारकीर्द पुन्हा सावरण्याचा प्रयत्न करीत आहे; तर यश धुलला वरिष्ठ पातळीवरील क्रिकेट मानकांचा सामना करणे कठीण वाटत आहे.

राज, नमन यांच्यावर मदारवेगवान गोलंदाज राज लिम्बानी, नमन तिवारी हे आतापर्यंत स्पर्धेत प्रभावी ठरले आहेत. रविवारीही त्यांच्याकडून अशाच प्रभावी कामगिरीची गरज आहे.

टॅग्स :भारतआॅस्ट्रेलिया