Aakash Chopra slams Team India Fielding Dropped Catches: भारतीय संघाने नुकतीच ऑस्ट्रेलिया पाठोपाठ दक्षिण आफ्रिके विरूद्धची मालिका जिंकली. ऑस्ट्रेलियाला २-१ ने पराभूत केल्यानंतर, आफ्रिकेविरूद्ध पहिल्या दोन सामन्यात भारताने विजय मिळवत अजिंक्य आघाडी घेतली. पहिल्या सामन्यात भारतीय गोलंदाजांनी आफ्रिकेच्या फलंदाजांना नाकी नऊ आणले. तर दुसऱ्या सामन्यात टीम इंडियाच्या टॉप-४ फलंदाजांनी आफ्रिकन खेळाडूंची धुलाई केली. त्यामुळे भारताने ३ सामन्यांच्या मालिकेत २-० अशी आघाडी घेतली आहे. असे असले तरी भारताचा माजी क्रिकेटपटू आणि प्रसिद्ध समालोचक आकाश चोप्रा याने मात्र रोहित शर्माच्या टीम इंडियाला आरसा दाखवत फिल्डिंग सुधारण्याचा सल्ला दिला आहे.
गेल्या काही सामन्यांमध्ये भारताच्या फिल्डर्समुळे गोलंदाजांना अधिकचा मार पडला असल्याचे मत त्याने व्यक्त केले आहे. आशिय चषकाच्या सुपर-४ फेरीपासून आतापर्यंत टीम इंडियाने ७ टी२० सामने खेळले. त्यातील चार जिंकले तर तीन हरले. त्यातील तीनही पराभव पाकिस्तान, श्रीलंका आणि ऑस्ट्रेलियाविरूद्ध आव्हानाचा बचाव करताना झाले याकडे आकाश चोप्राने विशेष लक्ष वेधले. त्याच्या म्हणण्यानुसार, या सामन्यांमध्ये भारतीय गोलंदाजांनी मोक्याच्या क्षणी फलंदाजाला आऊट करण्यासाठी काही क्लृक्ती लढवली होती पण फिल्डर्सने नीट क्षेत्ररक्षण न केल्यामुळे गोलंदाजांना अपयश आले.
आकाश चोप्राने दाखवून दिली आकडेवारी
आपल्या यूट्युब चॅनेलवर बोलताना आकाश चोप्रा म्हणाला, "मी आधीही भारतीय गोलंदाजीतील उणीवांबद्दल बोललो आहे. आव्हानाचा बचाव करताना भारतीय संघाला सातत्याने अपयश येत आहे. पण मला असं वाटतं की यात गोलंदाजांची चूक नाही. गोलंदाजी योग्य वेळी फलंदाजाला बाद करण्यासाठी उपाय करतात पण फिल्डर्स मात्र मोक्याच्या क्षणी एखादा कॅच सोडतात आणि तेथेच सगळा डाव बिघडतो. परिणामी आपले गोलंदाज अधिक कमकुवत भासतात. आकडेवारीच सांगायची झाली तर आपल्या फिल्डर्सकडे आलेल्या प्रत्येक सहा कॅचेस पैकी ते केवळ चार कॅच पकडण्यात यशस्वी होत आहेत."
भारतीय फिल्डर्स कॅच सोडण्याच्या बाबतीत पाकिस्तानपेक्षाही पुढे!
"आपले क्रिकेट फॅन्स आणि जाणकार म्हणतात की पाकिस्तानी खेळाडू खूप कॅचेस सोडतात. पण खरं पाहता भारतीय खेळाडूंचे सामन्यात कॅचेस सोडण्याचे प्रमाण हे पाकिस्तानी क्रिकेटर्सपेक्षाही वाईट आहे. एकूण कॅचेस पैकी भारतीय संघातील खेळाडू केवळ ७५.८ टक्के कॅचेस पकडतात. आपल्यापेक्षा वाईट रेकॉर्ड फक्त श्रीलंकेचं आहे. त्यांच्या संघाचे खेळाडू केवळ ७४.३ टक्के कॅच पकडतात. भारताच्या संघात सध्या अप्रतिम फिल्डिंग करणारा एकही खेळाडू नाही. सुरेश रैना, युवराज सिंगसारखे लोक निवृत्त झालेत. रविंद्र जाडेजासारखा खेळाडू दुखापतीमुळे टी२० वर्ल्ड कपमधून बाहेर पडलाय. त्यामुळे हल्ली भारताची गोलंदाजी चालू असतात, समालोचकांच्या तोंडून 'व्वा, काय मस्त फिल्डर आहे' असे शब्द येणंच बंद झालंय", असेही आकाश चोप्राने रोखठोक शब्दांत सांगितले.