चेतेश्वर पुजाराच ( Cheteshwar Pujara) नव्हे तर भारताचे दोन गोलंदाजही कौंटी अजिंक्यपद स्पर्धेत ( County Championship 2022) धुमाकूळ घालत आहेत. ससेक्सचे नेतृत्व करताना चेतेश्वर पुजाराने २३१ धावांची विक्रमी खेळी करून लॉर्ड्सवर द्विशतक झळकावणाऱ्या पहिल्या भारतीय फलंदाजाचा मान पटकावला. इंग्लंड दौऱ्यावरील कसोटी सामना संपल्यानंतर पुजारा कौंटी क्रिकेट खेळतोय. भारतीय संघासोबत नेट बॉलर म्हणून गेलेला नवदीप सैनी ( Navdeep Saini) व फिरकीपटू वॉशिंग्टन सुंदर ( Washington Sunder) यांनी कौंटी क्रिकेटमध्ये यंदा पदार्पण आणि पदार्पणाच्या सामन्यात या दोघांनीही आपापल्या क्लबकडून डावात पाच विकेट्स घेण्याचा पराक्रम केला.
जलदगती गोलंदाज नवदीप हा केंट क्लबचे पदार्पण करतोय आणि वॉर्विकशायर क्लबचा निम्मा संघ माघारी पाठवला. नवदीपने १८ षटकांत ७२ धावा देताना ख्रिस बेंजामिन, डॅन मौस्ली, मिचेल बर्गेस, हेन्री ब्रुक्स व क्रेग माईल्स या ५ विकेट्स घेतल्या. त्याच्या ५ विकेट्समुळे केंटने प्रतिस्पर्धींचा डाव २२५ धावांवर गुंडाळला. केंटचा पहिला डाव १६५ धावांवर गडगडला होता, परंतु दुसऱ्या डावात त्यांनी ४ बाद १९८ धावा करून दुसऱ्या दिवसअखेर १३८ धावांची आघाडी घेतली आहे.