भारतीय संघ नोव्हेंबरमध्ये ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर बॉर्डर गावसकर ट्रॉफीसाठी ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जाणार आहे. न्यूझीलंड विरुद्ध घरच्या मैदानातील लाजिरवाण्या पराभवामुळे भारतीय संघासाठी ही मालिका आणखी आव्हानात्मक झाली आहे. न्यूझीलंड विरुद्धच्या पराभवानंतर कर्णधार रोहित शर्मा आणि स्टार बॅटर विराट कोहली यांच्या कामगिरीवर प्रश्नचिन्ह उपस्थितीत करण्यात येत आहे.
हे दोघे कसोटी कारकिर्दीच्या अखेरच्या टप्प्यावर आहेत, अशी चर्चा रंगू लागली आहे. बॉर्डर गावसकर ट्रॉफीसाठी होणारी कसोटी मालिका या दोघांसाठी शेवटची संधी असेल, असेही बोलले जात आहे. इथं एक नजर बॉर्डर गावसकर ट्रॉफी दरम्यान किंवा या स्पर्धेनंतर कसोटी कारकिर्दीला ब्रेक लागलेल्या दिग्गज भारतीय खेळाडूंवर
अनिल कुंबळे हे नाव भारतीय कसोटी क्रिकेटमधील सर्वात यशस्वी गोलंदाजांच्या यादीत येते. कसोटी क्रिकेटमध्ये कुंबळेच्या खात्यात ६१९ विकेट जमा आहेत. २००८ मध्ये ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या कसोटी मालिकेतच कुंबळे आपल्या कसोटी कारकिर्दीली शेवटचा सामना खेळताना दिसले होते. भारतीय संघाने घरच्या मैदानातील ३ सामन्यांची ही कसोटी मालिका २-० अशी जिंकली होती.
सौरव गांगुली
२००८ मध्येच सौरव गांगुली यानेही आपल्या कारकिर्दीतील शेवटचा कसोटी सामना खेळला होता. धोनीच्या नेतृत्वाखालील टीम इंडियानं ऑस्ट्रेलिया विरुद्ध नागपूर कसोटी सामना १७२ धावांनी जिंकत गांगुलीसह कुंबळेला निरोपाचा सामना अविस्मरणीय केला होता.
व्हीव्हीएस लक्ष्मण
२०१२ मध्ये भारतीय संघाने ऑस्ट्रेलिया दौरा केला होता. हा दौरा व्हीव्हीएस लक्ष्मणच्या कसोटी कारकिर्दीला ब्रेक लावणारा असेल, असा विचारही त्यावेळी कुणी केला नव्हता. ऑस्ट्रेलियाने ती कसोटी मालिका ४-० अशी जिंकली होती. या मालिकेतील शेवटच्या सामन्यात भारतीयसं घाला २९८ धावांनी पराभवाचा सामना करावा लागला होता. त्यानंतर लक्ष्मणला कधीच टीम इंडियात स्थान मिळाले नाही. काही दिवसांनी लक्ष्मणनं निवृत्तीची घोषणा केली होती.
विरेंद्र सेहवाग
२०१३ मध्ये ऑस्ट्रेलियन संघ भारतीय दौऱ्यावर आला होता. घरच्या मैदानात टीम इंडियानं ४-० असा विजय नोंदवला. या मालिकेतील हैदराबाद कसोटीत सेहवाग टीम इंडियाचा भाग होता. पण त्यानंतर त्याला कसोटी संघात स्थान मिळालेच नाही.
२०१२ च्या अॅडिलेड कसोटी नंतर राहुल द्रविडच्या कसोटी कारकिर्दीला ब्रेक लागला. टीम इंडियानं ही मालिका ०-४ गमावल्यानंतर त्याचे खापर द्रविडवर फोडण्यात आले. त्यानंतर द्रविड पुन्हा भारतीय कसोटी संघात स्थान मिळाले नव्हते.
एमएस धोनी
२०१४ मध्ये भारतीय संघ धोनीच्या नेतृत्वाखाली ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर गेला होता. ऑस्ट्रेलियानं या मालिकेत २-० असा विजय मिळवला होता. ३ सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिल्या सामन्यात धोनीच्या अनुपस्थितीत विराट कोहलीनं कॅप्टन्सी केली होती. या सामन्यात भारतीय संघाला ४८ धावांनी पराभवाचा सामना करावा लागला होता. धोनी भारतीय संघात आल्यावर ब्रिस्बेन कसोटी सामनाही भाराने गमावला. मेलबर्नच्या मैदानातील शेवटचा सामना अनिर्णित राहिला. या मालिकेदरम्यानच धोनीनं कसोटीतून निवृत्तीची घोषणा केली होती.