मुंबई - भारताचा स्टार अष्टपैलू क्रिकेटपटू स्टुअर्ट बिन्नी याने क्रिकेटच्या सर्व प्रकारांमधून निवृत्तीची घोषणा केली आहे. ३७ वर्षीय स्टुअर्ट बिन्नी हा दीर्घकाळापासून भारतीय संघाच्या बाहेर होता. (Indian Cricket Team) त्याने २०१६ नंतर कुठलाही आंतरराष्ट्रीय सामना खेळला नव्हता. २०१४ मधील न्यूझीलंडविरुद्धच्या एकदिवसीय सामन्यामधून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करणाऱ्या स्टुअर्ट बिन्नी याने सहा कसोटी, १४ एकदिवसीय आणि ३ टी-२० सामन्यामध्ये भारतीय संघाचे प्रतिनिधित्व केले होते. स्टुअर्ट बिन्नी हा भारताचे माजी क्रिकेटपटू रॉजर बिन्नी यांचा पुत्र आहे. (India's all-rounder Stuart Binny announces retirement)
भारतीय संघाकडून खेळण्याची फारशी संधी न मिळालेल्या स्टुअर्ट बिन्नीच्या नावावर एक खास रेकॉर्ड आहे. २०१४ मध्ये त्याने बांगलादेशविरुद्धच्या एकदिवसीय सामन्यात केवळ चार धावा देऊन सहा बळी टिपले होते. त्याचा हा विक्रम भारताचा कुठलाही गोलंदाज अद्याप तोडू शकलेला नाही.
स्टुअर्ट बिन्नीने सहा कसोटी सामन्यांमध्ये १९४ धावा आणि ३ बळी घेतले होते. तर १४ एकदिवसीय सामन्यात २३० धावा आणि २० बळी घेतले होते. तर तीन टी-२० सामन्यात ३५ धावा आणि १ बळी टिपला होता. स्टुअर्ट बिन्नीने ९५ प्रथमश्रेणी सामन्यांमध्ये ४ हजार ७९६ धावा आणि १४८ बळी घेतले होते. तर १०० लिस्ट ए सामन्यांमध्ये १ हजार ७८८ धावा आणि ९९ बळी टिपले होते.