किंगस्टन, भारत विरुद्ध वेस्ट इंडिज : भारताने वेस्ट इंडिजमध्ये कसोटी मालिका 2-0 अशा फरकाने जिंकली. पण ही चांगली गोष्ट घडल्यावर भारतीय चाहत्यांसाठी एक वाईट बातमी आहे. भारताचे फलंदाजी प्रशिक्षक संजय बांगर संकटात सापडले आहेत. एका बंद रुममध्ये त्यांनी एक वाईट गोष्ट केली. या गोष्टीमुळे आता बीसीसीआय त्यांच्यावर कारवाई करण्याच्या प्रयत्नांमध्ये आहे.
बांगर हे गेल्या पाच वर्षांपासून भारतीय संघाबरोबर फलंदाजी प्रशिक्षक म्हणून आहे. विश्वचषकानंतर सर्व प्रशिक्षकांसाठी अर्ज मागवण्यात आले होते आणि त्यानंतर त्यांच्या मुलाखतीही झाल्या. पण यानंतर मुख्य प्रशिक्षकपदी रवी शास्त्री यांची निवड करण्यात आली होती. त्याचबरोबर गोलंदाजी प्रशिक्षक भारत अरुण आणि क्षेत्ररक्षक प्रशिक्षक एस. अरुण यांना कायम ठेवण्यात आले होते. फक्त बांगर यांनाच आपल्या पदावरून दूर करण्यात आले. त्यामुळे बांगर हे गेले काही दिवस निराश होते, असे म्हटले जात होते.
भारताने वेस्ट इंडिजविरुद्धचा दुसरा सामना जिंकला. भारताने जेतेपदाचा चषक उंचावला. खेळाडूंच्या मुलाखती झाल्या. त्यानंतर भारतीय संघ आपल्या हॉटेलमध्ये पोहोचला. हॉटेलमध्ये पोहोचल्यावर बांगर यांनी असे एक कृत्य केले की, त्यामुळे आता बीसीसीआयचा रोष त्यांना ओढवावा लागणार आहे.
भारताच्या निवड समितीचे सदस्य देवांग गांधी हे भारतीय संघाच्या हॉटेलमध्ये होते. त्यावेळी बांगर हे त्यांच्या रुममध्ये गेले आणि यावेळी त्यांनी भरपूर गोष्टी सुनावल्या. बांगर यांनी गांधी यांचा यावेळी अपमान केला. ही गोष्ट आता संघातील सर्वांना समजली आहे. बीसीसीआयनेदेखील या गोष्टीची दखल घेतली आहे. त्यामुळे आता बीसीसीआय बांगर यांच्यावर काय कारवाई करते, याकडे साऱ्यांचे लक्ष आहे.
याबाबत पीटीआयला बीसीसीआयच्या एका अधिकाऱ्यांनी सांगितले की, " जे काही बांगर यांनी केले ते नक्कीच वाईट आहे. पण आता याबाबतचे नियम काय आहे, याची आम्ही चाचपणी करणार आहोत. कारण बांगर यांनी राष्ट्रीय निवड समिती सदस्याचा अपमान केला आहे. त्यामुळे त्यांच्यावर नेमकी काय कारवाई करायची, याचा विचार बीसीसीआय करत आहे."