नवी दिल्ली : भारतीय संघ यंदा वेगवान गोलंदाजीत ‘पॉवर हाऊस’ म्हणून उदयास आला. २०१९ ची ही उपलब्धी मानली पाहिजे, असे मत माजी अनुभवी वेगवान गोलंदाज इरफान पठाण याने व्यक्त केले.
यंदा उमेश यादवने २३, ईशांत शर्मा २५ आणि मोहम्मद शमी याने ३३ असे एकूण ८१ गडी बाद केले. याआधी १९७८ साली एका संघातील तीन वेगवान गोलंदाज इयान बोथम, बॉब विलिस आणि ख्रिस ओल्ड यांनी २० धावांच्या सरासरीने केवळ २० गडी बाद केले होते.‘स्टार स्पोर्टस्’शी बोलताना इरफान म्हणाला, ‘यंदा भारतीय ेवेगवान गोलंदाजांनी देशासाठी लक्षणीय कामगिरी केली आहे. विश्व क्रिकेटमधील सर्वोत्कृष्ट गोलंदाजी लाईनअपवर नजर टाकल्यास आमचे गोलंदाज त्यापैकी एक ठरतात. चेंडू नवीन असो वा जुना, या गोलंदाजांनी स्विंग मारा एकसारखाच केला. मी वेगवान गोलंदाजांबाबत भारताची प्रगती पाहिली आहे. माझ्या मते ही वर्षातील सर्वांत मोठी उपलब्धी ठरावी.’