नवी दिल्ली : ‘‘बॉर्डर-गावसकर मालिकेतील उर्वरित तीन कसोटी सामन्यांमध्ये भारताचे तळाचे फलंदाज आपल्या कामगिरीने निर्णायक भूमिका बजावू शकतात. तसेच ही गोष्टच विजयातील अंतर स्पष्ट करणारी ठरेल,’’ असे मत ऑस्ट्रेलियन संघाचे मुख्य प्रशिक्षक अँड्यू मॅकडोनाल्ड यांनी व्यक्त केले आहे. नागपूर कसोटीत भारतीय संघातील ६ ते ११ क्रमांकाच्या फलंदाजांनीच २००च्या वर धावा केल्या होत्या. याचाच फटका मुख्यत्वेकरून कांगारूंना बसला.
आता १७ फेब्रुवारीपासून दिल्लीला सुरू होणाऱ्या दुसऱ्या कसोटीपूर्वी ऑस्ट्रेलिया यावर उपाय शोधत असल्याचेही मॅकडोनाल्ड यांनी स्पष्ट केले आहे. नागपूरमध्ये झालेल्या पहिल्या कसोटीत रवींद्र जडेजा आणि अक्षर पटेल यांनी अनुक्रमे ७० आणि ८४ धावा केल्या होत्या. त्यामुळेच भारताने पहिल्या डावात ४०० धावांपर्यंत मजल मारली होती. मॅकडोनाल्ड पुढे म्हणाले, ‘‘भारतीय संघातील गोलंदाजही आता चांगली फलंदाजी करतात. जडेजा, अश्विन आणि अक्षर तर विशेषज्ञ अष्टपैलूच आहेत. मात्र, शमीने केलेली फलंदाजी आम्हाला विचार करायला भाग पाडणारी ठरली. कारण नागपूरचाच कित्ता भारताने उर्वरित मालिकेत गिरवला तर मालिकेत पुनरागमन करणे आम्हाला कठीण होऊन बसेल.’’
रणनीतीत बदल करणार नाही
पहिल्या कसोटी सामन्यात दारूण पराभव स्वीकारावा लागला असला तरी ठरलेल्या रणनीतीत कुठलाही बदल करणार नसल्याचेही मॅकडोनाल्ड यांनी स्पष्ट केले. कारण अचानक बदल केला तर खेळाडूसुद्धा गोंधळू शकतात. त्यामुळे ऑस्ट्रेलियातून ठरवून आलेला मार्गच आम्ही स्वीकारणार असल्याचे मॅकडोनाल्ड यांनी सांगितले.
Web Title: 'India's bottom batsmen will play a decisive role in the series', andru mcdonald
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.