नवी दिल्ली : एखाद्या खेळाडूने चांगली कामगिरी केली तर त्याचे स्थान आयसीसीच्या क्रमवारीमध्ये वधारल्याचे पाहायला मिळते. पण सामना न खेळताही एखाद्या खेळाडूचे नाव जर टॉप टेनमध्ये येत असेल, तर या गोष्टीवर तुमचा विश्वास बसणार नाही. पण अशी गोष्ट घडली आहे आणि ती देखील एका भारतीय गोलंदाजाचा बाबतीत.
हा गोलंदाज भारताच्या एकदिवसीय आणि ट्वेन्टी-२० संघामध्ये असतो. पण वेस्ट इंडिजविरुद्धच्या पाचव्या एकदिवसीय सामन्यात मात्र तो नव्हता. पण तरीदेखील या सामन्यानंतर जाहीर करण्यात आलेल्या आयसीसीच्या क्रमवारीत तो गोलंदाजांच्या यादीमध्ये टॉप टेनमध्ये आल्याचे पाहायला मात्र मिळाले.
भारताचा फिरकीपटू युजवेंद्र चहल हा आयसीसीच्या क्रमवारीत टॉप टेनमध्ये पोहोचला आहे. आतापर्यंतच्या कारकिर्दीत तो पहिल्यांदाच टॉप टेनमध्ये पोहोचला आहे. पण वेस्ट इंडिजविरुद्धच्या अखेरच्या सामन्यात तो खेळला नसला तरी तो टॉप टेनमध्ये कसा दाखल झाला हा प्रश्न तुम्हाला पडला असेल. तर या प्रश्नाचे उत्तर आहे की, आशिया चषकातील दमदार कामगिरीमुळे. चहलने आशिया चषकात दमदार कामगिरी केली होती आणि या गोष्टीच्या जोरावरच तो क्रमवारीत टॉप टेनमध्ये आला आहे.