मुंबई : भारताच्या एका खेळाडूने आज क्रिकेटमधून निवृत्ती पत्करली आहे. भारताकडून या खेळाडूने महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली पदार्पण केले होते. पण आज मात्र या खेळाडूने आपली निवृत्ती जाहीर केली आहे.
एक खेळाडू म्हणून त्याला संघात आपले स्थान राखण्यात अपयश आले होते. पण एक मार्गदर्शक म्हणून त्याचे नाव चांगलेच गाजले होते. त्याचबरोबर त्याने समालोचनालाही सुरुवात केली होती. पण आज मात्र त्याने आपण यापुढे क्रिकेट खेळणार नसल्याचे जाहीर केले आहे.
मुंबईच्या अभिषेक नायरने 2005 साली मुंबई कडून स्थानिक क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. आपल्या अष्टपैलू कामगिरीच्या जोरावर त्याने भारतीय संघातही स्थान पटकावले होते. पण त्याला सातत्यपूर्ण कामगिरी करता न आल्यामुळे त्याला संघातून काढण्यात आले होते. 36 वर्षीय अभिषेकला आपल्या कामगिरीच्या जोरावर निवड समितीचे मन वळवता आले नव्हते.
अभिषेकने दिनेश कार्तिक, श्रेयस अय्यर आणि उन्मुक्त चंद यांना मार्गदर्शन केले होते. अभिषेकच्या मार्गदर्शनाचा या खेळाडूंना फायदा झाला. त्यामुळेच या खेळाडूंनी त्याची बऱ्याचदा स्तुतीही केली.