भारताचा दारुण पराभव, न्यूझीलंडची विजयी सलामी

कर्णधार सोफी डीवाईनचे झुंजार अर्धशतक

By ऑनलाइन लोकमत | Published: October 5, 2024 06:17 AM2024-10-05T06:17:25+5:302024-10-05T06:17:40+5:30

whatsapp join usJoin us
India's crushing defeat, New Zealand's winning debut t 20 world cup womens 2024 | भारताचा दारुण पराभव, न्यूझीलंडची विजयी सलामी

भारताचा दारुण पराभव, न्यूझीलंडची विजयी सलामी

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

दुबई : महिला टी-२० विश्वचषक स्पर्धेत भारताची सुरुवात अत्यंत खराब झाली. फलंदाजांच्या निराशाजनक कामगिरीमुळे भारतीय संघाला अ गटात न्यूझीलंडविरुद्ध ५८ धावांनी दारुण पराभव पत्करावा लागला. न्यूझीलंडने प्रथम फलंदाजीचा निर्णय घेत २० षटकांत ४ बाद १६० धावा केल्यानंतर भारताचा डाव १९ षटकांत १०२ धावांवर संपुष्टात आला.

लक्ष्याचा पाठलाग करताना भारताच्या एकाही स्टार फलंदाज लौकिकास साजेशी कामगिरी करता आली नाही. स्मृती मानधना (१२), शेफाली वर्मा (२), कर्णधार हरमनप्रीत कौर (१५), जेमिमा रॉड्रिग्ज (१३) आणि रिचा घोष (१२) हे प्रमुख फलंदाज स्वस्तात बाद झाले. न्यूझीलंडने भारताचा अर्धा संघ ११ षटकांत ७० धावांमध्ये बाद करत सामन्याचे चित्र स्पष्ट केले. रोसमेरी मेर हिने ४, ली ताहुहु हिने ३, तर इडेन कार्सनने २ बळी घेतले. 

त्याआधी, आक्रमक सुरुवातीनंतरही न्यूझीलंडला मोठी धावसंख्या उभारता आली नाही. कर्णधार सोफी डीवाईनने झुंजार अर्धशतक झळकावताना ३६ चेंडूंत ७ चौकारांसह नाबाद ५७ धावा केल्या. सुझी बेट्स आणि जॉर्जिया प्लिमेर यांनी न्यूझीलंडला वेगवान सुरुवात करून देताना ४६ चेंडूंत ६७ धावांची सलामी दिली. अरुंधती रेड्डीने आठव्या षटकात भारताला पहिले यश मिळवून देताना बेट्सला (२७) बाद केले. पुढच्याच षटकात आशा शोभनाने प्लिमेरला बाद करून किवींना मोठा धक्का दिला. प्लिमेरने २३ चेंडूंत ३ चौकार व एका षटकारासह ३४ धावा फटकावल्या. यानंतर अमेलिया केरला (१३) स्वस्तात बाद करत भारताने पकड मिळवली. 

डीवाईनने न्यूझीलंडला सावरले. तिला ब्रूक हॅलिडे (१६) हिची दमदार साथ मिळाली. दोघींनी चौथ्या बळीसाठी २६ चेंडूंत ४६ धावांची भागीदारी केली. भारताकडून रेणुका सिंगने दोन, तर अरुंधती आणि आशा यांनी प्रत्येकी एक बळी घेतला.

धावबादवरून रंगला वाद
१४व्या षटकात दीप्ती शर्माच्या अखेरच्या चेंडूवर अमेलिया केरने लाँग ऑफला फटका मारत एक धाव घेतली. यावेळी क्षेत्ररक्षण करत असलेल्या हरमनप्रीत कौरने लगेच चेंडू फेकला नाही आणि याचा फायदा घेत केर-डीवाईन यांनी आणखी एक धाव घेण्याचा प्रयत्न केला. यावेळी, हरमनप्रीतने लगेच चेंडू यष्टिरक्षक रिचा घोषकडे फेकला आणि रिचाने केरला धावचीत केले. यावेळी, केर तंबूत जाण्यासही निघाली, मात्र चौथ्या पंचांनी तिला माघारी पाठवले आणि वाद झाला. यामुळे कर्णधार हरमनप्रीतसह प्रशिक्षक अमोल  मुझुमदार यांनीही पंचांकडे प्रश्न उपस्थित केले. जेव्हा दोन्ही फलंदाजांनी पहिली धाव घेतली, तेव्हा मैदानी पंचांनी दीप्तीला टोपी दिली आणि यामुळे षटक संपल्याचे मानले गेले. त्यामुळेच धावबाद तसेच दुसरी धाव वैध ठरली नाही.

संक्षिप्त धावफलक
न्यूझीलंड : २० षटकांत ४ बाद १६० धावा (सोफी डीवाईन नाबाद ५७, जॉर्जिया प्लिमेर ३४, सुझी बेट्स २७, ब्रूक हॅलिडे १६; रेणुका सिंग २/२७, आशा शोभना १/२२, अरुंधती रेड्डी १/२८.) वि. वि. भारत : १९ षटकांत सर्वबाद १०२ धावा (हरमप्रीत कौर १५, जेमिमा रॉड्रिग्ज १३, दीप्ती शर्मा १३; रोसमेरी मेर ४/१९, ली ताहुहु ३/१५, इडेन कार्सन २/३४.)

Web Title: India's crushing defeat, New Zealand's winning debut t 20 world cup womens 2024

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.