कोलंबो : रवींद्र जडेजाच्या अचूक माऱ्याच्या जोरावर भारताने दुसऱ्या कसोटी सामन्यात रविवारी चौथ्या दिवशी चहापानाच्या विश्रांतीपूर्वीच श्रीलंकेचा एक डाव व ५३ धावांनी पराभव केला आणि तीन सामन्यांच्या मालिकेत २-० अशी विजयी आघाडी घेतली. यजमान संघातर्फे कुसाल मेंडिस व दिमुथ करुणारत्ने यांनी शतके झळकावली असली तर संघाचा पराभव टाळण्यात त्यांना यश आले नाही.
करुणारत्नेच्या (१४१) शतकी खेळीच्या जोरावर श्रीलंका संघाने एकवेळ ४ बाद ३१० धावांची मजल मारली होती. फॉलोआॅन स्वीकारीत पुन्हा फलंदाजी करणाऱ्या श्रीलंका संघाचा दुसरा डाव ११६.५ षटकांत ३८६ धावांत संपुष्टात आला. करुणारत्नेने कुसाल मेंडिसच्या (११०) साथीने शनिवारी दुसऱ्या विकेटसाठी १९१ धावांची भागीदारी केल्यानंतर आत मलिंदा पुष्पकुमारसोबत (१६) तिसºया विकेटसाठी ४० आणि अँजेलो मॅथ्यूजसोबत (३६) पाचव्या विकेटसाठी ६९ धावांची भागीदारी केली, पण संघाचा पराभव टाळण्यात त्याचे प्रयत्न अपुरेच पडले.
भारताने पहिला डाव ९ बाद ६२२ धावसंख्येवर घोषित केल्यानंतर प्रत्युत्तरात खेळताना श्रीलंका संघाचा पहिला डाव १८३ धावांत संपुष्टात आला होता. त्यामुळे त्यांच्यावर फॉलोआॅन स्वीकारण्याची नामुष्की ओढावली.
श्रीलंकेने कालच्या २ बाद २०९ धावसंख्येवरून आज पुढे खेळण्यास सुरुवात केली. करुणारत्नेने कसोटी कारकिर्दीतील सहावे शतक पूर्ण केले. त्याने नाईट वॉचमन पुष्पकुमारसोबत तिसऱ्या विकेटसाठी ४० धावांची भागीदारी केली. या दोघांनी भारतीय गोलंदाजांना घाम गाळण्यास भाग पाडले. करुणारत्ने वैयक्तिक ९५ धावांवर असताना सुदैवी ठरला. त्या वेळी जडेजाच्या गोलंदाजीवर शॉर्टलेगवर तैनात लोकश राहुलला त्याचा झेल टिपता आला नाही. या सलामीवीराने मोहम्मद शमीच्या गोलंदाजीवर चौकार ठोकत २२४ चेंडूमध्ये शतक पूर्ण केले.
भारताला डावच्या ७३ व्या षटकांत आजचे पहिले यश मिळाले. आश्विनच्या गोलंदाजीवर रिव्हर्स स्विपचा फटका खेळताना पुष्पकुमार क्लीन बोल्ड झाला. जडेजाने त्यानंतरच्या षटकात कर्णधार दिनेश चंदीलमला (२) स्लिपमध्ये रहाणेकडे झेल देण्यास भाग पाडले. भारताने ८० षटकांनंतर दुसरा नवा चेंडू घेतला. मोहम्मद शमी व उमेश यादव यांनी छोट्या स्पेलमध्ये गोलंदाजी केली, पण करुणारत्ने व मॅथ्यूज यांची जोडी मात्र त्यांना फोडता आली नाही. श्रीलंकेने ९० व्या षटकात संघाला ३०० चा पल्ला ओलांडून दिला. उपाहारानंतरही कर्णधार कोहलीने जडेजाचा मारा कायम ठेवला. जडेजाने कर्णधाराचा विश्वास सार्थ ठरविताना उपाहारानंतर पाचव्या षटकात करुणारत्नेला माघारी परतवले. करुणारत्नेने ३०७ चेंडूंना सामोरे जाताना १६ चौकार लगावले. फॉलोआॅननंतर फलंदाजी करताना श्रीलंकेतर्फे ही तिसरी सर्वोच्च वैयक्तिक धावसंख्या आहे. त्यानंतरच्या षटकात जडेजाने मॅथ्यूजला तंबूची वाट दाखविली. मॅथ्यूजने ६६ चेंडूंमध्ये ३ चौकार व १ षटकार लगावला. याच षटकात दिलरुवान परेरा (४) सुदैवी ठरला. गलीमध्ये तैनात कोहलीला त्याचा झेल टिपता आला नाही. जडेजाच्या पुढच्या षटकात पुढे सरसावत खेळण्याच्या प्रयत्नात परेराचा अंदाज चुकला व साहाने यष्टिचित करण्याची संधी गमावली नाही. सलग तीन चौकार ठोकणाºया धनंजय डिसिल्वाला (१७) जडेजाने रहाणेकडे झेल देण्यास भाग पाडले. या निर्णयासाठी मैदानावरील पंचांना तिसऱ्या पंचाची मदत घ्यावी लागली. निरोशन डिकवेला (३१) व रंगना हेराथ (नाबाद १७) यांनी नवव्या विकेटसाठी ४१ धावांची भागीदारी करीत भारताला विजयासाठी प्रतीक्षा करण्यास भाग पाडले. पांड्याने डिकवेला याला तंबूचा मार्ग दाखवित ही भागीदारी संपुष्टात आणली. अश्विनने ११ व्या क्रमांकावर फलंदाजी करणाºया नुवान प्रदीपला (१) मिड आॅनला तैनात धवनकडे झेल देण्यास भाग पाडत भारताच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. (वृत्तसंस्था)
धावफलक
भारत पहिला डाव ९ बाद ६२२ (डाव घोषित). श्रीलंका पहिला डाव सर्व बाद १८३. श्रीलंका दुसरा डाव :- दिमुथ करुणारत्ने झे. रहाणे गो. जडेजा ४१, उपुल थरंगा त्रि. गो. यादव ०२, कुसाल मेंडिस झे. साहा गो. पांड्या ११०, मलिंदा पुष्पकुमार त्रि. गो. आश्विन १६, दिनेश चंदीमल झे. रहाणे गो. जडेजा ०२, अँजेलो मॅथ्यूज झे. साहा गो. जडेजा ३६, निरोशन डिकवेला झे. रहाणे गो. पांड्या ३१, दिलरुवान परेरा यष्टिचित साहा गो. जडेजा ०४, धनंजय डिसिल्वा झे. रहाणे गो. जडेजा १७, रंगना हेराथ नाबाद १७, नुवान प्रदीप झे. धवन गो. अश्विन ०१. अवांतर (९). एकूण ११६.५ षटकांत सर्व बाद ३८६. बाद क्रम : १-७, २-१९८, ३-२३८, ४-२४१, ५-३१०, ६-३१५, ७-३२१, ८-३४३, ९-३८४, १०-३८६. गोलंदाजी : उमेश यादव १३-२-३९-१, आश्विन ३७.५-७-१३२-२, शमी १२-३-२७-०, जडेजा ३९-५-१५२-५, पांड्या १५-२-३१-२.
८ कसोटी मालिका सलग जिंकण्याची भारताची किमया. यापूर्वी आॅस्ट्रेलियाने २००५ ते २००८ पर्यंत ९ कसोटी मालिका जिंकल्या होत्या. इंग्लंडने १८८४ ते १८९२ मध्ये आठ कसोटी मालिका जिंकल्या होत्या.
२००० या वर्षी श्रीलंकेने घरच्या मैदानावर एका डावाने पाकिस्तानविरुद्ध मालिका गमावली होती. एकंदरीत, घरच्या मैदानावर हा श्रीलंकेचा सातवा पराभव आहे.
२ खेळाडूंनी योगायोगाने एका कसोटी सामन्यात अर्धशतक आणि ५ बळी घेण्याची किमया साधली. यामध्ये आर. आश्विन आणि रवींद्र जडेजा यांचा समावेश आहे. अशा दोन वेळा घटना घडल्या. १८९५ मध्ये आॅस्ट्रेलियाच्या जॉर्ज गिफन आणि अल्बर्ट ट्रॉटने इंग्लंडविरुद्ध अॅडिलेड येथे अशी कामगिरी केली होती.२०११ मध्ये ट्रेट ब्रिज येथे टीम बे्रस्नन आणि स्टुअर्ट ब्रॉडने भारताविरुद्ध प्रत्येकी अर्धशतक आणि ५ बळी घेतले होते.
३८६ एवढी धावसंख्या एसएससी मैदानावरील श्रीलंकेची दुसऱ्या डावात फॉलोआॅननंतरची सर्वाेच्च चौथी धावसंख्या ठरली. फॉलोआॅनवर यापूर्वी त्यांनी तीन वेळा सर्वाधिक धावसंख्या उभारली आहे. त्यातील सर्वाेच्च दोन धावसंख्या या याच वर्षातील आहेत. २०१६ मध्ये इंग्लंडविरुद्ध ४७५, २०१४ मध्ये न्यूझीलंडविरुद्ध ४०७ धावसंख्या उभारली होती.
४ वेळा गेल्या एक वर्षात कसोटी क्रिकेटमध्ये सामनावीर पुरस्कार मिळवणारा रवींद्र जडेजा हा एकमेव खेळाडू आहे.
जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानावर असलेल्या भारताने सलग आठवी मालिका जिंकली. २०१४-१५ मध्ये आॅस्ट्रेलियात चार कसोटी सामन्यांच्या मालिकेत २-० ने पराभव स्वीकारावा लागला होता. त्यानंतर मात्र टीम इंडियाने कुठलीही मालिका गमावलेली नाही. विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली भारताने आपली विजय मोहीम कायम राखली आहे.
कसोटी क्रिकेटमध्ये नवव्यांदा डावामध्ये पाच किंवा त्यापेक्षा अधिक बळी घेण्याची कामगिरी करणाºया जडेजाच्या (५-१५२) अचूक माऱ्यापुढे यजमान संघाच्या अखेरच्या सहा विकेट ७६ धावांत माघारी परतल्या.
जडेजाव्यतिरिक्त हार्दिक पांड्या (२-३१) व रविचंद्रन आश्विन (२-१३२) यांनी प्रत्येकी दोन तर उमेश यादवने (१-३९) एक बळी घेतला.
मालिकेतील तिसरा व अखेरचा कसोटी सामना १२ आॅगस्टपासून कँडी येथील पाल्लेकल आंतरराष्ट्रीय स्टेडियममध्ये खेळला जाणार आहे.
जडेजा निलंबित
कोलंबो : भारतीय फिरकीपटू रवींद्र जडेजाला लंकेविरुद्धच्या तिसºया कसोटीत खेळता येणार नाही. आयसीसीने आज त्याच्यावर आचारसंहितेचा भंग केल्यामुळे निलंबनाची कारवाई केली. ताज्या प्रकरणामुळे गेल्या २४ महिन्यांत त्याचे एकूण सहा निगेटिव्ह गुण झाले आहेत. जडेजा गोलंदाजी करीत असताना त्याने श्रीलंकेचा सलामीवीर फलंदाज दिमुथ करुणारत्नेकडे चेंडू फेकला. त्यावेळी फलंदाज क्रिजमध्ये होता. पंचांनी हा ‘थ्रो’ धोकादायक ठरवला. आचारसंहितेचे उल्लंघन केल्यामुळे त्याला तीन निगेटिव्ह गुण मिळाले. जडेजाने लेव्हल दोनचे उल्लंघन केल्यामुळे सामना शुल्कातील ५० टक्के रकमेचा दंड ठोठावला.
‘आम्हाला विजयाची सवय लागली आहे’
कोलंबो : आमच्या संघाला विजयाची सवय लागली असून भविष्यातही ही मोहीम कायम राखण्यास उत्सुक आहे, अशी प्रतिक्रिया श्रीलंकेविरुद्धच्या कसोटी मालिकेत २-० ने आघाडी घेतल्यानंतर भारतीय कर्णधार विराट कोहलीने व्यक्त केली.
भारताने रविवारी श्रीलंकेचा दुसऱ्या कसोटी सामन्यात एक डाव व ५३ धावांनी पराभव करीत तीन सामन्यांच्या मालिकेत २-० अशी आघाडी घेतली. भारताने यापूर्वी २०१५ मध्ये श्रीलंकेचा त्यांच्याच भूमीत २-१ ने पराभव केला होता. आता भारताला १२ आॅगस्टपासून पल्लेकलमध्ये प्रारंभ होणाऱ्या तिसऱ्या कसोटी सामन्यात विजय मिळवत विदेशात यजमान संघाचा सफाया करण्याची संधी आहे.
कोहली म्हणाला, ‘पुन्हा मालिका जिंकल्यामुळे निश्चितच आनंद झाला आहे. प्रामाणिकपणे सांगायचे झाल्यास आम्ही कसोटी क्रिकेटचे देश किंवा विदेश असे वर्गीकरण करीत नाहीत. आम्ही कसोटी क्रिकेटचा केवळ कसोटी क्रिकेट म्हणूनच विचार करतो. जेथे खेळतो तेथे विजय नोंदविण्यास इच्छुक असतो.’ (वृत्तसंस्था)
क्षमतेवर विश्वास ठेवला तर कुठे खेळत आहोत याचा काही फरक पडत नाही. संघात तशी ऊर्जा आहे. आम्हाला जिंकण्याची सवय लागली असून भविष्यातही कायम ठेवण्यास उत्सुक आहे.
- विराट कोहली
पहिल्या डावातील फलंदाजीचा फटका बसला : चंदीमल
कोलंबो : पहिल्या डावातील निराशाजनक कामगिरीमुळे भारताविरुद्ध दुसऱ्या कसोटी सामन्यात आम्हाला डावाने पराभव स्वीकारावा लागला, अशी प्रतिक्रिया श्रीलंकेचा कर्णधार दिनेश चंदीमलने व्यक्त केली. चंदीमल म्हणाला, ‘पहिल्या डावात आमची फलंदाजी ढेपाळली. त्याचा आम्हाला फटका बसला. भारताने पहिल्या डावात चांगली फलंदाजी करताना ६२२ धावांची दमदार मजल मारली. त्यामुळे आम्ही दडपणाखाली आलो, पण आम्ही स्वस्तात बाद होऊ असे वाटले नव्हते. दुसºया डावात मात्र आम्ही चांगला प्रयत्न केला. मेंडिस व करुणारत्ने यांनी चांगली फलंदाजी केली.’ (वृत्तसंस्था)
Web Title: India's Danka, Sri Lanka won by an innings and 53 runs
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.