Join us  

भारताचा श्रीलंकेला नमवून उपांत्य फेरी खेळण्याचा निर्धार; कोहलीच्या विक्रमी शतकाची आस

वानखेडेवर आज लढत : ट्रक भरून पॉपकॉर्न

By ऑनलाइन लोकमत | Published: November 02, 2023 6:58 AM

Open in App

मुंबई : भारतीय क्रिकेटचे माहेरघर असलेल्या मुंबईमध्ये वानखेडे स्टेडियमवर गुरुवारी भारतीय संघ श्रीलंकेच्या आव्हानाला सामोरे जाईल. यावेळी शानदार विजयासह विश्वचषक स्पर्धेच्या उपांत्य फेरीत प्रवेश करण्याचा निर्धार भारतीय संघाचा असेल. त्याचवेळी, विराट कोहलीच्या विक्रमी शतकासाठीही चाहते आसुसलेले आहेत.

कोहलीने या सामन्यात शतक झळकावल्यास तो सचिन तेंडुलकरच्या ४९ व्या एकदिवसीय शतकांच्या विश्वविक्रमाशी बरोबरी करेल. १२ वर्षांपूर्वी भारतीय संघाने महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वामध्ये वानखेडे स्टेडियमवरच श्रीलंकेला नमवून दुसऱ्यांदा विश्वचषक उंचावला होता. त्यावेळी श्रीलंकेचा संघ तोलामोलाचा होता. यंदा या संघाला दुखापतीमुळे   प्रमुख खेळाडूंची अनुपस्थिती जाणवत आहे. असे असले, तरी त्यांची फलंदाजी मजबूत असल्याचे या स्पर्धेत वारंवार दिसून आले आहे. श्रीलंकेची खरी ताकद त्यांची सलामी  जोडी असून  ही जोडी सातत्याने आक्रमक आणि भक्कम सुरुवात करून देत आहे.

सलग सहा सामने जिंकलेल्या भारताला अद्याप कडवी टक्कर मिळालेली नाही. सलामीला ऑस्ट्रेलियाविरुद्ध आघाडीची फळी अपयशी ठरल्याचा अपवाद वगळता भारताच्या फलंदाजांनी प्रत्येक संघाविरुद्ध सातत्यपूर्ण कामगिरी केली आहे. गोलंदाजीमध्येही भारतीय संघ वरचढ ठरला आहे. लंकेविरुद्ध भारतीय संघ संभाव्य विजेता असला तरी लंकेला गृहीत धरण्याची चूक भारतीय करणार नाहीत.

समरविक्रमा-निसांकाचे आव्हान

सदिरा समरविक्रमाने सहा सामन्यांतून एका शतकासह सर्वाधिक ३३१ धावा फटकावल्या आहेत. पथुम निसांकानेही यंदा एक हजाराहून अधिक धावा केल्या असून त्याने विश्वचषक स्पर्धेत सलग चार अर्धशतके झळकावली आहेत.  कर्णधार कुसल मेंडिस आणि अनुभवी अँजेलो मॅथ्यूज यांच्या रूपाने श्रीलंकेकडे मॅचविनर खेळाडू आहेत.  लंकेची गोलंदाजी चांगली असली तरी त्यांच्याकडे अनुभव कमी आहे.

हेड टू हेड

  • एकूण सामने : ९
  • भारत विजयी : ४
  • श्रीलंका विजयी : ४
  • अनिर्णीत : १

ट्रक भरून पॉपकॉर्न

मुंबई क्रिकेट संघटनेने (एमसीए) भारत-श्रीलंका सामन्यापासून विश्वचषक उपांत्य सामन्यापर्यंत वानखेडे स्टेडियमवर प्रेक्षकांसाठी एका तिकिटावर मोफत पॉपकॉर्न आणि कोल्ड्रिंक्स देण्याचा निर्णय घेतला आहे. याची जोरदार तयारी वानखेडे स्टेडियमवर सुरू आहे. बुधवारी ट्रक भरून पॉपकॉर्न येथे आणले असून प्रेक्षकांच्या सुविधेत कसर न ठेवण्यासाठी प्रयत्न होत आहेत.

दिल्ली, मुंबईत आतषबाजीवर बंदी

वाढत्या प्रदूषणाला आळा घालण्यासाठी वनडे विश्वचषकादरम्यान नवी दिल्ली आणि मुंबईतील सामन्यात आतषबाजी होणार नसल्याचे बीसीसीआय सचिव जय शाह यांनी बुधवारी जाहीर केले. दिल्लीत ६ नोव्हेंबर रोजी अखेरचा सामना हो्ईल. मुंबईत २, ७ आणि १५ नोव्हेंबरला सामने होणार आहेत. वायू प्रदूषणाबाबत बीसीसीआय संवेदनशील असल्याने विशेष काळजी म्हणून सामन्यादरम्यान आणि नंतर आतषबाजी करण्यात येणार नाही, असे बोर्डाने म्हटले आहे.

टॅग्स :वन डे वर्ल्ड कपभारत विरुद्ध श्रीलंकाविराट कोहलीरोहित शर्मा