रांची : महेंद्रसिंग धोनीच्या घरच्या मैदानावर भारत आज, शुक्रवारी ऑस्ट्रेलियाविरुद्ध तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात विजयासह पाच सामन्यांच्या मालिकेत ३-० अशी आघाडी घेण्याच्या निर्धाराने भारतीय संघ उतरणार आहे. या शहराचा ‘हीरो’ असलेल्या धोनीला भारतीय संघाचा विजय हीच सर्वांत मोठी भेट ठरणार आहे.
सलामीला शिखर धवनचे अपयश संघाच्यादृष्टीने चिंतेचा विषय ठरला. त्याने १५ वन-डेत केवळ दोनदा अर्धशतक ठोकले; तरीही विजयी संघात कुठला बदल होईल, असे वाटत नाही. अशावेळी लोकेश राहुलला राखीव बाकावर प्रतीक्षा करावी लागेल. भारताने दोन्ही सामने सहा गडी राखून आणि आठ धावांनी जिंकले. पण, चुरशीच्या वेळी बाजी मारल्याने संघाचे मनोधैर्य उंचावले आहे. दोन्ही सामन्यांत भारताची गोलंदाजी वरचढ ठरल्यामुळे पाहुणा संघ २५० पर्यंत पोहोचण्यात अपयशी ठरला. विराटने जामठ्याच्या मंद खेळपट्टीवर कौशल्य पणास लावून शतक झळकविले. उपकर्णधार रोहित शर्मा हा मात्र मोठी खेळी करण्यात अपयशी ठरला. याशिवाय पहिल्या सामन्याचे हीरो महेंद्रसिंग धोनी आणि केदार जाधव यांनादेखील धावा काढण्यात अपयश आले होते. अंबाती रायुडू हा देखील ‘स्ट्राईक रोटेट’ करण्यात अपयशी ठरला. शिखरला डच्चू दिल्यास पुढील तीन सामन्यांत राहुला तिसऱ्या स्थानावर संधी मिळू शकेल. अशावेळी कर्णधार कोहलीला चौथ्या स्थानावर खेळावे लागेल.
गोलंदाजीत भारताला समस्या नाही. सांघिक कामगिरीच्या बळावर गोलंदाज सामना जिंकून देत आहेत. केदार आणि विजय शंकर यांनी स्वत:ची भूमिका चोखपणे बजाविली. हार्दिक पांड्याची उणीव शंकर कधीही भरून काढू शकतो. जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद शमी या वेगवान गोलंदाजांससह रवींद्र जडेजा आणि कुलदीप यादव यांचा मारादेखील प्रभावी ठरला आहे. विश्रांतीनंतर भुवनेश्वर कुमार हा देखील संघात परतल्यामुळे वेगवान सिद्धार्थ कौल याला संधी मिळण्याची शक्यता कमीच आहे. (वृत्तसंस्था)
Web Title: India's determination to win series, Dhoni retains dominance over home ground
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.