प्रसाद लाड : तो असं काही करेल, असं कुणाला स्वप्नातही वाटलं नसेल. कारण त्याच्याकडे बघून असं कधी वाटलंच नाही. संघात तो काही वेळा पर्यटक असायचा तर काहीवेळा एखाद-दुसरा सामना त्याच्या वाट्याला यायचा. एखादी मालिका फारशी महत्वाची नसेल तर त्याची वर्णी बदली यष्टीरक्षक म्हणून लागायची. देहयष्टीही काही क्रिकेटपटूला साजशी नव्हतीच. भारतीय संघातला तो बटुकेश्वर होता. पण सध्याच्या घडीला मात्र तो देशाचा नायक ठरला आहे. मूर्ती लहान पण किर्ती महान, असं त्याच्या बाबतीत म्हणायला सुरुवात झाली आहे. त्याचा तो षटकार जावेद मियाँदादची आठवण करून गेला आणि अनेकांच्या गळ्यातील ताईत ठरला तो दिनेश कार्तिक.
कार्तिकचे आयुष्य म्हणजे अडथळ्यांची मॅरेथॉनंच. दिनेशचे वडिल कृष्णा कुमार यांना क्रिकेटचं वेड होते. पण या वेडापायी त्यांना आयुष्यात फारसं काही करता आलं नाही. त्यांना नोकरीसाठी कुवैतला जावं लागलं. दिनेशचं शिक्षणही तिथेच सुरु होतं. त्याला क्रिकेटमध्ये रस होताच. पण आधी शिक्षण आणि वेळ मिळाला तर नंतर क्रिकेट खेळ, असं त्याला सांगण्यात आलं. दिनेश मात्र शिक्षणात फारसा रमला नाही. कारण लहानपणासून मला क्रिकेटचं खेळायचं हे त्याने मनोमन ठरवलं होतं. त्यासाठी तो चेन्नईत आला. क्रिकेट खेळायलासुरुवात केली. गुणवत्तेच्या जोरावर यशाची एक एक पायरी चढत राहिला. बडोद्याविरुद्ध त्याने प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये पदार्पण केलं. तेव्हा यष्टीरक्षक म्हणून तो आठव्या स्थानावर फलंदाजीला आला होता. दुसऱ्या सामन्यात त्याने नाबाद 88 धावांची खेळी साकारली आणि संघाला पराभवापासून दूर लोटले होते. 19-वर्षांखालील क्रिकेटमध्ये त्याची कामगिरी चांगलीच झाली होती. दुलीप करंडक स्पर्धेतही तो चांगला खेळला.
भारतीय संघात तो सप्टेंबर 2004 साली आला आणि पदार्पण केले ते थेट लॉर्ड्सवर. यावर्षी तो ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी मालिकेतही खेळला. पण जास्त काळ त्याला भारतीय संघातून खेळता आले नाही, कारण त्यावेळी आंतरराष्ट्रीय स्तरावर उदय झाला होता तो महेंद्रसिंग धोनीचा. धोनीने सुरुवातीपासूनच संघातील आपले स्थान कायम राखले. 2007 च्या विश्वचषकात धोनीला कर्णधारपद दिले गेले. हा विश्वचषक त्याच्या नेतृत्वाखाली भारताने जिंकला. त्यानंतर अन्य प्रकारांमध्येही धोनीची कर्णधारपदी निवड करण्यात आली आणि दिनेशला मात्र दुय्यम स्थान मिळत गेले. दिनेशला एका बाजूला धोनी आणि दुसऱ्या बाजूला त्याच्यासारखीच शैली असलेल्या पार्थिव पटेलची स्पर्धा होती. पण दिनेशसाठी एक गोष्ट चांगली झाली आणि ती म्हणजे आयपीएल.
दिनेश आयपीलमध्ये सातत्याने खेळत होता. दिनेश आयपीएलमध्ये ठसा उमटवत असताना त्याच्या वैयक्तिक आयुष्यात एक वादळ आलं. त्याची पत्नी निकीता वंजाराने त्याच्यापासून विभक्त होण्याचा निर्णय घेतला. हे त्याच्यासाठी धक्कादायक होतंच, पण मोठा धक्का त्याला पुढे बसला. कारण निकीता आणि भारतीय संघातील सलामीवीर, त्याच्याच चेन्नईच्या मुरली विजयबरोबर तिचे विवाहबाह्य संबंध होते. निकीताने दिनेशला सोडचिठ्ठी देत विजयशी दुसरे लग्न केले. पण दिनेश खचला नाही. काही काळआनंतर त्याने स्क्वॉशपटू दीपिका पल्लीकलशी आपला दुसरा विवाह केला.
काही दिवसांपूर्वी दिनेशला आयपीएलमधील कोलकाता नाईट रायडर्स संघाचे कर्णधारपद सोपवण्यात आले, तेव्हा साऱ्यांनीच भुवया उंचावल्या होत्या. पण त्याच्या बांगलादेशविरुद्धच्या खेळीने हा निर्णय योग्य असल्याचे आता लोकांना वाटत आहे.
अंतिम फेरीत आपल्या आधी मालिकेत एकही सामना न खेळलेल्या विजय शंकरला फलंदाजीसाठी पाठवले, तेव्हा दिनेश चांगलाच वैतागला होता. त्याचे आणि रोहितचे चांगलेच वाजले. अशी परिस्थिती काही वेळा आपल्यातील राग, जिंकण्यातील ईर्षा बाहेर काढायचे काम करत असते. आणि नेमके तेच झाले. पहिल्याच चेंडूवर त्याने षटकार ठोकत मला उशिरा फलंदाजीला का पाठवले, हे दाखवून दिले. पण त्यानंतर तो थांबला नाही. कारण विजयाचा वसा आणि आपली पत कशी सांभाळायची हे त्याने ठरवले होते. अपमान गिळला होता. सामन्यातील 18व्या षटकात फक्त एकच धाव गेली होती. पण दिनेशने 19व्या षटकात 22 धावांची लूट केली. विसाव्या षटकाच्या पाचव्या चेंडूवर विजय शंकर बाद झाला आणि अखेरच्या चेंडूवर पाच धावांची गरज होती. दिनेश स्ट्राईकवर होता. तेव्हा काही जणांनी हा चेंडू पाहण्याचे टाळले. आम्ही हा पराभव कसा पाहायचा, असं म्हणत त्यांनी नाकं मुरडली. डोळे टीव्हीपासून लांब गेले. दिनेशच्या डोक्यात मात्र काही तरी वेगळेच शिजत होते. काही फटक्यांना धार चढवत तो मैदानात उतरला होता. आणि अखेरच्या चेंडूवर षटकार तोही कव्हर्सवर लगावला. भारतीय संघाने मैदानात धाव घेतली. एकेकाळी नावडता असलेला दिनेश आता आवडता झाला होता. ही खेळी दिनेशचे कर्तृत्व सिद्ध करून गेली. आता आयपीएलमध्ये तो कशी कामगिरी करतो, याकडे साऱ्यांचे लक्ष असेल.