नवी दिल्ली : न्यूझीलंडविरुद्ध चुरशीच्या वन-डे मालिकेत सरशी साधल्यानंतर आत्मविश्वास उंचावलेल्या भारतीय संघाचे एकमेव लक्ष्य बुधवारपासून प्रारंभ होत असलेल्या टी-२० आंतरराष्ट्रीय मालिकेत विजय मिळविण्याचे आहे. त्याचसोबत वेगवान गोलंदाज आशिष नेहराला संस्मरणीय निरोप देत न्यूझीलंडविरुद्ध टी-२० क्रिकेटमध्ये आपले विजयाचे खाते उघडण्यास भारत प्रयत्नशील आहे.जवळजवळ १९ वर्षांपूर्वी कसोटी क्रिकेटच्या माध्यमातून पहिला आंतरराष्ट्रीय सामना खेळणाºया नेहराने यापूर्वीच गृहमैदान फिरोजशहा कोटलावर होणारा पहिला टी-२० सामना खेळाडू म्हणून माझ्या कारकिर्दीतील अखेरचा आंतरराष्ट्रीय सामना राहणार असल्याचे जाहीर केले होते. या ३८ वर्षीय वेगवान गोलंदाजाने भारतातर्फे अखेरचा सामना यंदा १ फेब्रुवारी रोजी बंगळुरूमध्ये खेळला होता. पण निवृत्ती जाहीर केल्यामुळे त्याचे या लढतीत खेळणे निश्चित आहे.
नेहराने अखेरचा कसोटी सामना एप्रिल २००४मध्ये, तर अखेरचा वन-डे विश्वकप २०११मध्ये खेळला होता.पण तो आयपीएल व अन्य स्पर्धांमध्ये नियमितपणे खेळतो. टी-२० क्रिकेटमध्ये तो भारतीय संघाचे प्रतिनिधित्वही करतो. दिल्लीचा हा वेगवान गोलंदाज कुटुंबीय व प्रेक्षकांच्या उपस्थितीत अखेरची लढत खेळण्यासाठी मैदानात उतरेल, त्या वेळी निश्चितच मैदानात व बाहेरचे वातावरण भावनिक होईल.
नेहराला कुठल्या गोलंदाजाच्या स्थानी अंतिम ११ खेळाडूंमध्ये स्थान मिळते, याबाबत उत्सुकता आहे. कारण आॅस्ट्रेलियाविरुद्ध दोन टी-२० सामन्यात भारताने भुवनेश्वर कुमार, जसप्रीत बुमराह, हार्दिक पांड्या, यजुवेंद्र चहल व कुलदीप यादव यांना संधी दिली होती. भुवनेश्वरला कानपूरच्या अखेरच्या वन-डे लढतीत अचूक मारा करता आला नव्हता. त्यामुळे त्याला विश्रांती देण्यात येण्याची शक्यता आहे.विराट कोहली अॅन्ड कंपनी या लढतीच्या निमित्ताने अनेक बाबी साध्य करण्यास प्रयत्नशील आहे. प्रत्येक क्रिकेटपटू आपल्या सहकाºयाला विजयाने निरोप देण्यास उत्सुक असतो आणि सध्याचा संघ नेहराला हा सन्मान देण्यास प्रयत्नशील आहे. भारताने या लढतीत विजय मिळवला तर न्यूझीलंडविरुद्ध टी-२० क्रिकेटमध्ये हा पहिला विजय ठरेल. त्यामुळे भारत पराभवाचे दुष्टचक्र भेदण्यात यशस्वी ठरण्यासोबत अखेरच्या दोन वन-डेमध्ये मिळवलेल्या विजयाची लयही कायम राखेल.
भारताने न्यूझीलंडविरुद्ध जे पाच टी-२० सामने खेळले आहेत त्यात प्रत्येक वेळी भारताला पराभवाला सामोरे जावे लागले आहे. त्यात गेल्या वर्षी विश्व टी-२० चॅम्पियनशिपमध्ये नागपूरमध्ये खेळल्या गेलेल्या लढतीचाही समावेश आहे. त्या वेळी भारतीय संघ ७९ धावांत गारद झाला होता.
टी-२० क्रिकेटमध्ये न्यूझीलंडविरुद्धची पराभवाची मालिका खंडित करणे कोहलीच्या नेतृत्वाखालील संघासाठी सोपे काम नाही. कारण वन-डे मालिकेत न्यूझीलंड संघाने शानदार खेळ केला असून, टी-२० मालिकाही रंगतदार ठरण्याची शक्यता आहे.
न्यूझीलंडची मधली फळी शानदार आहे. मधल्या फळीत विलियम्सनव्यतिरिक्त टॉम लॅथम व हेन्री निकोल्स यांची कामगिरी उल्लेखनीय असून, सलामीला कोलिन मुन्रोने छाप सोडली आहे. मार्टिन गुप्टील वन-डेतील अपयशाची भरपाई टी-२० मध्ये करण्यास आतूर आहे.नेहरा अखेरची लढत संस्मरणीय करण्यात प्रयत्नशील असेल तर कर्णधार कोहलीही गृहमैदानावर मोठी खेळी करण्यास उत्सुक आहे. फिरोजशहा कोटला मैदानावर भारत प्रथमच टी-२० सामना खेळणार आहे. शिखर धवनचेही हे गृहमैदान आहे. अष्टपैलू हार्दिक पांड्याच्या कामगिरीवर नजर राहील. भारताने फॉर्मात असलेल्या श्रेयस अय्यर व वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराज यांच्या रूपाने दोन नव्या चेहºयांना संधी दिली आहे. अय्यरला मधल्या फळीत केदार जाधवच्या स्थानी संधी मिळू शकते. पण पहिल्या लढतीत नेहरा खेळणार असल्यामुळे सिराजला पदार्पणासाठी काही काळ प्रतीक्षा करावी लागणार आहे.
कोटलाच्या खेळपट्टीचा इतिहास बघता येथे फलंदाजांना धावा फटकावणे सोपे नाही. भारत येथे अखेरचा आंतरराष्ट्रीय सामना न्यूझीलंडविरुद्ध गेल्या वर्षी खेळला होता. त्या वन-डे लढतीत भारतीय संघाला २४३ धावांचे लक्ष्य गाठण्यात अपयश आले होते. सामन्याला सायंकाळी ७ वाजता प्रारंभ होणार असल्यामुळे दवाची भूमिका महत्त्वाची ठरेल; नंतर गोलंदाजी करणाºया संघाला संघर्ष करावा लागू शकतो. अशा स्थितीत नाणेफेकीचा कौल मिळविणे महत्त्वाचे ठरेल. (वृत्तसंस्था)दवाचे आव्हान पेलण्यासाठी कुलदीपने नेटमध्ये ओल्या चेंडूने केला सरावदवामुळे चेंडूवर पकड मिळविणे मोठे आव्हान असते आणि त्याचा विचार करीत न्यूझीलंडविरुद्ध बुधवारी खेळल्या जाणाºया पहिल्या टी-२० सामन्यापूर्वी चायनामन गोलंदाज कुलदीप यादवने आज नेटमध्ये ओल्या चेंडूने सराव केला.आॅक्टोबर ते जानेवारी या कालावधीत भारतात खेळल्या जाणाºया लढतीत दवाचा प्रभाव असतो. अशा स्थितीत रात्री कृत्रिम प्रकाशझोतात खेळताना कुठलेही लक्ष्य गाठणे शक्य असते. कारण गोलंदाजांना चेंडूवर पकड मिळवण्यात अडचण भासते.आज दुपारच्या ऐच्छिक सराव सत्रात कुलदीप प्रत्येक दुसºया चेंडूवर पाणी टाकताना दिसला. त्याला भारताचे गोलंदाजी प्रशिक्षक भरत अरुण यांनी हा सल्ला दिला होता. भारताचा वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमारनेही डेथ ओव्हर्समध्ये गोलंदाजी करण्यासाठी सरावात याच रणनीतीचा वापर केला होता.कुठल्याही क्रमांकावर खेळण्याची तयारी : अय्यरभारतीय संघात प्रथमच निवड झालेल्या श्रेयस अय्यरला न्यूझीलंडविरुद्ध तीन टी-२० सामन्यांच्या मालिकेत आंतरराष्ट्रीय पदार्पणाची संधी मिळण्याची आशा आहे. कुठल्याही क्रमांकावर खेळण्याची तयारी असल्याचे अय्यरने स्पष्ट केले.बुधवारी खेळल्या जाणाºया पहिल्या टी-२० सामन्याच्या पूर्वसंध्येला बोलताना अय्यर म्हणाला, ‘माझी संघात निवड झाली असून खेळण्याची संधी मिळेल, अशी आशा आहे. मला तीनपैकी एक लढतही खेळण्याची संधी मिळाली तरी तो माझ्यासाठी संस्मरणीय अनुभव राहील.’अय्यर म्हणाला, ‘मला कुठल्याही क्रमांकावर फलंदाजी करण्याची अडचण नाही. यंदा आयपीएलमध्ये मला तिसºया व चौथ्या क्रमांकावरही खेळविण्यात आले. मला जर संधी मिळाली तर कुठल्याही क्रमांकावर खेळण्यात अडचण नसून, सर्वोत्तम कामगिरी करण्याचा प्रयत्न राहील.’प्रतिस्पर्धी संघ : भारत :- विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा, शिखर धवन, दिनेश कार्तिक, महेंद्रसिंह धोनी, श्रेयस अय्यर, मनीष पांडे, हार्दिक पांड्या, जसप्रीत बुमराह, यजुवेंद्र चहल, कुलदीप यादव, भुवनेश्वर कुमार, मोहम्मद सिराज, आशिष नेहरा, अक्षर पटेल आणि लोकेश राहुल.न्यूझीलंड :- केन विल्यम्सन (कर्णधार), टॉड अॅस्टल, ट्रेंट बोल्ट, टॉम ब्रूस, कोलिन डी ग्रँडहोम, मार्टिन गुप्टील, मॅट हेन्री, टॉम लॅथम, अॅडम मिल्ने, कोलिन मुन्रो, हेन्री निकोल्स, ग्लेन फिलिप्स, मिशेल सँटनर, ईश सोढी आणि टीम साऊदी.सामना : भारतीय वेळेनुसार सायंकाळी ७ पासून.