shubman gill news : श्रीलंका दौऱ्यावर असलेल्या भारतीय संघाला वन डे मालिकेत अद्याप एकही विजय मिळवता आला नाही. सलामीचा सामना अनिर्णित करून यजमान श्रीलंकेने चांगली सुरुवात केली. त्यात दुसरा सामना जिंकून श्रीलंकेने १-० अशी आघाडी घेतली. त्यामुळे बुधवारी होत असलेला अखेरचा सामना निर्णायक असेल. भारतीय संघ मालिका बरोबरीत संपवण्याच्या इराद्याने मैदानात उतरेल, तर मालिका खिशात घालण्यासाठी श्रीलंका भिडेल. भारताच्या वन डे संघाची धुरा रोहित शर्माकडे आहे, तर ट्वेंटी-२० संघाचा कर्णधार सूर्यकुमार यादव आहे.
रोहित शर्माने ट्वेंटी-२० आंतरराष्ट्रीयमधून निवृत्ती घेतल्याने सूर्याला मोठी जबाबदारी मिळाली. तर शुबमन गिलला उपकर्णधार बनवण्यात आले. आता गिलबाबत टीम इंडियाच्या क्षेत्ररक्षणाचे प्रशिक्षक आर श्रीधर यांनी एक मोठा दावा केला आहे. २०२७ नंतर गिल भारताच्या तिन्हीही फॉरमॅटच्या संघाचा कर्णधार म्हणून प्रबळ दावेदार असेल, असे त्यांनी सांगितले.
गिल सांभाळणार भारताची धुरा?शुबमन गिल आणि यशस्वी जैस्वाल हे चांगल्या फॉर्ममध्ये आहेत. भारत विरूद्ध इंग्लंड कसोटी मालिका आणि वन डे सामन्यांमध्ये त्यांनी चमकदार कामगिरी केली आहे. त्यामुळे मला वाटते की, ही जोडी ट्वेंटी-२० आणि वन डेमध्ये आपली जागा मजबूत करत आहेत. शुबमन गिल हा सर्व फॉरमॅटमध्ये खेळणारा खेळाडू आहे. त्यामुळे तो कसोटी आणि वन डेमध्ये भारतीय संघाचा उपकर्णधार असेल. संपूर्ण देश गिलला २०२७ नंतर सर्व फॉरमॅटच्या क्रिकेटचा कर्णधार म्हणून पाहू इच्छित आहे, असेही श्रीधर यांनी सांगितले. ते हिंदुस्तान टाइम्सशी बोलत होते.
ट्वेंटी-२० विश्वचषक २०२४ चा किताब जिंकताच रोहित शर्माने क्रिकेटच्या सर्वात लहान फॉरमॅटला रामराम केले. त्याच्यासह विराट कोहली आणि रवींद्र जडेजा यांनीही ट्वेंटी-२० क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली. त्यामुळे युवा खेळाडूंना संधी मिळाली आहे. हार्दिक पांड्या भारताचा कर्णधार बनेल असे अपेक्षित असताना सूर्यावर ट्वेंटी-२० संघाची धुरा सोपवण्यात आली. फिटनेसच्या कारणामुळे हार्दिकची संधी हुकली.