धर्मशाला : नियमित कर्णधार विराट कोहलीविना खेळणा-या भारतीय संघाने श्रीलंकेविरुद्ध आज रविवारपासून सुरू होत असलेल्या
तीन सामन्यांच्या वन-डे मालिकेत क्लीन स्वीप करण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. अजिंक्य रहाणेचा फॉर्म मात्र संघासाठी चिंतेचा विषय असेल.
दिल्लीच्या प्रदूषणापासून दूर हिरव्यागार पर्वतराईत असलेल्या देखण्या क्रिकेट स्टेडियममध्ये सामना खेळला जाणार आहे. मुख्य कोच रवी शास्त्री आणि काळजीवाहू कर्णधार रोहित शर्मा विजयी संयोजन बनविण्यात व्यस्त आहेत. थंडगार वातावरणात सकाळी ११.३० पासून सामन्याला सुरुवात होणार आहे. येथील खेळपट्टी उसळी घेणारी असल्याने नाणेफेकीचा कौलही मोलाचा ठरेल. सलग पाच
द्विपक्षीय मालिका जिंकणारा
भारतीय संघ ही मालिका ३-० ने जिंकल्यास द. आफ्रिकेला मागे सारून वन-डेतही अव्वल स्थानावर विराजमान होईल. मागच्या वन-डे मालिकेत भारताने लंकेला ५-० असे नमविले होते.
विराटच्या अनुपस्थितीत रोहित, रहाणे, कार्तिक, धोनी, केदार जाधव हे फलंदाजीत योगदान देण्यास सज्ज आहेत. रोहित आणि धवन सलामीला तर रहाणे तिसºया स्थानावर येईल. धवनला व्हायरल आहे. तो न खेळल्यास रहाणे सलामीला खेळू शकतो.
रहाणे लंकेविरुद्ध कसोटी मालिकेत फलंदाजीत सपशेल अपयशी ठरला होता. नव्या मालिकेत फॉर्म परत मिळविण्याची त्याच्याकडे संधी असेल. श्रेयस अय्यर आणि मनीष पांडे हेदेखील फलंदाजीत योगदान देतील. अष्टपैलू हार्दिक पांड्याच्या कामगिरीवर विशेष लक्ष असेल. यजुवेंद्र चहल, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह आणि भुवनेश्वर कुमार यांच्याकडे गोलंदाजीची जबाबदारी असेल. (वृत्तसंस्था)''
बुमराहची निवड
युवा खेळाडूंसाठी प्रेरणा
द. आफ्रिका दौरा करणाºया भारतीय संघात जसप्रीत बुमराहची निवड होणे हे युवा खेळाडूंसाठी प्रेरणास्पद असल्याचे काळजीवाहू कर्णधार रोहित शर्मा याने सांगितले. वन-डे संघाचा नियमित खेळाडू बुमराहला कसोटी संघात पाचवा तज्ज्ञ गोलंदाज म्हणून स्थान देण्यात आले. मेहनतीचे फळ किती मोठे असते हे बुमराहने सिद्ध केले. डेथ ओव्हरमध्ये त्याचा मारा अप्रतिम असतो. कठीण समयी नवे डावपेच आखणारा गोलंदाज म्हणून बुमराहची ओळख बनली आहे.
वन-डे असो वा आयपीएल, नेतृत्वाचा कस सारखाच...
वन-डे क्रिकेट असो किंवा आयपीएल, नेतृत्वाचा कस मात्र सारखाच लागतो. आयपीएल संघातील तुलनेत आमच्याकडे वन डेत विविधता असलेले खेळाडू आहेत. मैदानावर त्यांचा योग्य वापर करून घ्यावा लागेल. मुंबई इंडियन्ससाठी मी नेतृत्वाचे जे बेसिक्स वापरले तेच, वन-डेत राष्टÑीय संघासाठी वापरणार आहे. दडपण आणि खेळाडूंची मानसिकता या दोन भिन्न बाबी आहेत. संघातील काही युवा खेळाडू कठीण समयी कशी कामगिरी करतात हे पाहणे रंजक ठरणार आहे.
- रोहित शर्मा, कर्णधार.'
'
मॅथ्यूजकडून अपेक्षा
अष्टपैलू अँजेलो मॅथ्यूजकडून मोठ्या अपेक्षा आहेत. आज काहीतरी विशेष करेल. कसोटीत केवळ फलंदाज या नात्याने तो संघात होता पण वन-डेत गोलंदाजी करणार आहे. सहकाºयांनी सर्वोत्कृष्ट खेळी केल्यास भारताला मालिकेत हरवू शकतो. मानसिकदृष्ट्या आणि शारीरिकदृष्ट्या आम्ही फिट आहोत.
- थिसारा परेरा, कर्णधार श्रीलंका
उभय संघ यातून निवडणार
भारत : रोहित शर्मा (कर्णधार), शिखर धवन, अजिंक्य रहाणे, श्रेयस अय्यर, मनीष पांडे, वॉशिंग्टन सुंदर, दिनेश कार्तिक, महेंद्रसिंह धोनी, हार्दिक पांड्या, अक्षर पटेल, कुलदीप यादव, यजुवेंद्र चहल, जसप्रीत बुमराह, भुवनेश्वर कुमार आणि सिद्धार्थ कौल.
श्रीलंका : थिसारा परेरा (कर्णधार), उपुल थरंगा, धनुष्का गुणतिलक, लाहिरू थिरिमाने, अँजेलो मॅथ्यूज, असेला गुणरत्ने, निरोशन डिकवेला, चतुरंगा डिसिल्व्हा, अकिला धनंजय, सुरंगा लकमल, नुआन प्रदीप, सदीरा समरविक्रम, धनंजय डिसिल्व्हा, दुष्मंत चमीरा, सचित पाथिराना, कुसाल परेरा.
Web Title: India's goal of 'clean sweep', one-day series from today
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.