sachin tendulkar 50th birthday । सिंधुदुर्ग : भारतीय क्रिकेट संघाचा दिग्गज सचिन तेंडुलकरने आज ५१व्या वर्षात पदार्पण केले असून तो ५०वा वाढदिवस साजरा करत आहे. भारताचा महान क्रिकेटपटू क्रिकेटचा देव, मास्टरब्लास्टर, जागतिक क्रिकेटला नवीन ओळख देणारा आणि भारतीयांचे दैवत अशा अनेक नावांनी ओळखल्या जाणाऱ्या सचिन रमेश तेंडुलकरने आज आयुष्याचे अर्धशतक पूर्ण केले. आपल्या सर्वांचा लाडका सचिन आज ५० वर्षांचा झाला. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून सचिनने निवृत्ती घेतली. या गोष्टीलाही आता दहा वर्ष होत आली. पण तरीही त्याने त्याची प्रतिमा आणि चाहतावर्ग अद्यापही तसाच राखण्यात यश मिळवले आहे.
दरम्यान, निवृत्तीनंतर त्याचा चाहतावर्ग कमी झालेला नाहीच, उलट सचिनच्या नवनव्या गोष्टींमुळे त्याच्या चाहत्यांमध्ये भरच पडताना दिसते. क्रिकेटमध्ये ४०व्या वर्षी निवृत्त होणाऱ्या सचिनने २४ वर्षे क्रिकेट खेळले आणि समृद्ध अशी कारकीर्द घडवली. सचिनचे रेकॉर्ड पाहिले की प्रत्येक भारतीय सचिनला साष्टांग दंडवत घालूनच त्याचे आभार मानू शकतो. सचिन स्वत: आपला ५०वा वाढदिवस साजरा करण्यासाठी निसर्गाच्या सानिध्यात म्हणजेच कोकणात गेला आहे. सचिन आपल्या वाढदिवसाच्या निमित्ताने सिंधुदुर्गात असून तो आपला वाढदिवस भोगवे येथील समुद्रकिनारी साजरा करत आहे.
सचिनचा मायबोलीत बोलण्याचा दिला सल्लाभोगवे समुद्र किनाऱ्यावर मालवणी जेवणाचा आस्वाद घेतल्यानंतर सचिनची गाठ एका मराठी चाहत्यासोबत झाली. संबंधित चाहता क्रिकेटच्या देवाशी हिंदीत बोलू लागला. चाहता हिंदीत बोलत असल्याचे ऐकताच सचिनने म्हटले, "मराठी आहे ना? मग मराठीत बोला." मग सचिनने चाहत्यांना ऑटोग्राफ दिला. सचिन रविवारी दुपारी मित्रांसमवेत गोवा मार्गे सिंधुदुर्ग जिल्ह्यात दाखल झाला. तेथील भोगवे समुद्रकिनारी फेरफटका मारताना तो अनेकांना दिसला. भोगवे येथील समुद्रकिनारी असलेल्या पंचतारांकित हॉटेलमध्ये सचिन आपला ५०वा वाढदिवस साजरा करत आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"