ठळक मुद्देजडेजाने हमीदला त्रिफळाचित केले आणि यानंतर जसप्रीत बुमराह व जडेजा यांनी मधली फळी उद्ध्वस्त करत, इंग्लंडची ६ बाद १४७ अशी अवस्था केली.
अयाज मेमन
लंडन : पुन्हा एकदा गोलंदाजांनी मोक्याच्या वेळी केलेल्या शानदार माऱ्याच्या जोरावर भारतीय संघाने चौथ्या कसोटी सामन्यात अखेरच्या दिवशी इंग्लंडचा १५७ धावांनी पराभव करीत पाच सामन्यांच्या मालिकेत २-१ अशी विजयी आघाडी संपादन केली. दुसऱ्या डावात १२७ धावांचे योगदान देणारा रोहित शर्मा सामनावीर ठरला. पाचवा आणि निर्णायक सामना मॅनचेस्टर येथे १० सप्टेंबरपासून खेळला जाईल. उमेश यादवने विजयात तीन बळींचे योगदान दिले. बुमराह, जडेजा आणि शार्दुल ठाकूर यांनी प्रत्येकी दोन गडी बाद केले. भारताने साेमवारी ३६८ धावांचे लक्ष्य गाठणाऱ्या इंग्लंडला चहापानानंतर थोड्याच वेळात दुसऱ्या डावात ९२.२ षटकात २१० धावात गुंडाळले. त्याआधी चहापानाला खेळ थांबला त्यावेळी इंग्लंडची ८४.१ षटकांत ८ बाद १९३ धावा अशी अवस्था होती. लाजिरवाणा पराभव टाळण्यासाठी यजमान संघाला ३७.५ षटकांत १७५ धावांची गरज होती. भारतीयांसाठी आतापर्यंत मुख्य अडसर ठरलेला इंग्लंडचा कर्णधार जो रुटची शार्दुल ठाकूरने दांडी गुल करताच उर्वरित काम सोपे झाले. उमेशने क्रेग ओव्हरटनला त्रिफळाबाद केले तर अखेरचा फलंदाज जेम्स ॲन्डरसन याला देखील त्याने यष्टिरक्षक ऋषभ पंतकडे झेल देण्यास भाग पाडले. भाताचा विजय साकार होताच विराट आणि सहकाऱ्यांनी एकच जल्लोष केला.
सोमवारी इंग्लंडने बिनबाद ७७ धावा अशी सुरुवात केली. ३६८ धावांचे लक्ष्य मिळाल्यानंतर, रोरी बर्न्स आणि हसीब हमीद यांनी शतकी सलामी देत इंग्लंडला चांगली सुरुवात करून दिली. भारताला पहिल्या बळीसाठी ४१व्या षटकापर्यंत प्रतीक्षा करावी लागली. शार्दुल ठाकूरने बर्न्सला बाद करून सलामी जोडी फोडली. यानंतर, डेव्हिड मलान धावचित झाला. लंच टाइमनंतर मात्र सामन्याचे चित्रच पालटले.
जडेजाने हमीदला त्रिफळाचित केले आणि यानंतर जसप्रीत बुमराह व जडेजा यांनी मधली फळी उद्ध्वस्त करत, इंग्लंडची ६ बाद १४७ अशी अवस्था केली. केवळ ६ धावांमध्ये इंग्लंडने ४ बळी गमावल्याने त्यांची २ बाद १४१ धावांवरून ६ बाद १४७ धावा अशी घसरगुंडी उडाली. बुमराहने ओली पोपसह जॉनी बेयरेस्टोलाही त्रिफळाचित करत इंग्लंडच्या फलंदाजीतील हवा काढली. जडेजाने सलामीवीर हमीदला (६३) बाद केल्यानंतर धोकादायक मोइन अलीला (०) स्थिरावण्यास संधीही दिली नाही. या पडझडीतून इंग्लंडच्या सर्व आशा कर्णधार जो रुटवर होत्या. मात्र, शार्दुल ठाकूरने त्याला त्रिफळाचित करत, इंग्लंडला सर्वात मोठा धक्का देताना भारताच्या मार्गातील मुख्य अडसर दूर केला. १८ धावा करणारा ख्रिस वोक्स याला उमेश यादवने लोकेश राहुलकडे झेल देण्यास बाध्य करीत यजमान संघाला आठवा धक्का दिला.
n भारतीय गोलंदाजांचे जितके कौतुक करावे, तेवढे कमीच ठरेल.
n जसप्रीत बुमराहचा स्पेल निर्णायक ठरला. खेळपट्टी पाहता, बुमराहने केलेला वैविध्यपूर्ण मारा निर्णायक ठरला. त्याने फलंदाजांची मानसिकता ओळखून गोलंदाजी केली.
n रवींद्र जडेजानेही चांगला मारा केला. त्याने बळी कमी घेतले असले, तरी धावांवर नियंत्रण राखले. एकूणच भारताच्या गोलंदाजांनी विजय मिळवून दिला.
n कोहलीने आखलेल्या सर्व योजना यशस्वी ठरल्या, त्याने गोलंदाजांचा चांगल्या प्रकारे वापर केला.
n शार्दुल ठाकूरचे योगदान बहुमूल्य ठरले. त्याने फलंदाजीत दोन्ही वेळा वाचविले, शिवाय बळी जास्त घेतले नाहीत, पण निर्णायक क्षणी महत्त्वपूर्ण बळी घेतले. तो खरा गेम चेंजर ठरला.
n रोहित शर्माचे शतक, बुमराहची गोलंदाजी आणि शार्दुलचा निर्णायक अष्टपैलू खेळ भारताच्या विजयाचे वैशिष्ट्य ठरले.
n लॉर्ड्समध्येही भारताने हरता हरता विजय मिळविला. ओव्हलमध्येही अशाच परिस्थितीतून विजय मिळवत, भारताने दडपणात अधिक दमदार खेळ करत असल्याचे दाखवून दिले.
n आता भारत मालिका गमावणार नाही, पण अखेरचा सामना जिंकण्यासाठी हीच जिद्द दाखवावी लागेल.
n इंग्लंड सहजासहजी हार मानणारा संघ नाही. त्यामुळे भारताला सर्वोत्तम फॉर्ममध्ये खेळावे लागेल. एका डावाने पत्करलेल्या पराभवानंतर भारताने जबरदस्त पुनरागमन केले.
Web Title: India's historic victory, Shardul Thakur became a game changer! pdc
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.