India’s ICC ODI World Cup team finalised - भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या ( BCCI) राष्ट्रीय निवड समितीने शनिवारी आगामी वर्ल्ड कप स्पर्धेसाठीचा भारतीय संघ जवळपास ठरवला आहे. १५ जणांचा सहभाग असलेल्या या संघात लोकेश राहुलने ( KL Rahul) स्थान पटकावले आहे, तर संजू सॅमसनला डच्चू मिळाला आहे. निवड समिती प्रमुख अजित आगरकर श्रीलंकेत दाखल झाले आणि त्यांनी भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा व मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांची भेट घेतली आणि अंतिम संघ ठरवला. भारत-पाकिस्तान यांच्यातली लढत पावसामुळे रद्द झाल्यानंतर ही बैठक झाली.
इंडियन एक्स्प्रेसने दिलेल्या वृत्तानुसार सॅमसनसह, तिलक वर्मा आणि प्रसिद्ध कृष्णा हे सध्या आशिया चषक स्पर्धेसाठीच्या भारतीय संघासोबत आहेत, त्यांना वर्ल्ड कप स्पर्धेसाठीच्या संघात स्थान मिळालेलं नाही. रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाच्या मधल्या फळीने पाकिस्तानविरुद्ध चांगली कामगिरी करून दाखवली. विशेषतः इशान किशनने मिळालेल्या संधीचं सोनं केलं. रोहितसह शुबमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर व सूर्यकुमार यादव हे वर्ल्ड कप संघाचे सदस्य असतील.
अष्टपैलू हार्दिक पांड्या, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल आणि शार्दूल ठाकूर यांच्यावर निवड समितीने विश्वास कायम ठेवला आहे. फलंदाजाची फळी अखेरपर्यंत मजबूत असायला हवी, अशी संघ व्यवस्थापनाची इच्छा आहे. गोलंदाजी विभागात जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी आणि मोहम्मद सिराज यांच्यावर जलद माऱ्याची, तर कुलदीप यादव याच्यावर फिरकीची जबाबदारी आहे. निवड समितीने यावेळी राहुलच्या फिटनेसवर चर्चा केली आणि वैद्यकीय टीमने हिरवा कंदील दाखवल्यानंतर राहुलची संघात निवड झाली. NCA मध्ये राहुलने नेट्समध्ये चांगला खेळ करून दाखवला आहे आणि तो आता आशिया चषक स्पर्धेसाठी आज किंवा उद्या श्रीलंकेला रवाना होणार आहे.
वर्ल्ड कप स्पर्धेसाठी संघ जाहीर करण्याची ५ सप्टेंबर ही अंतिम तारीख आहे आणि बीसीसीआय आज किंवा उद्या संघाची अधिकृत घोषणा करतील. राहुलला मधल्या फळीसह यष्टिरक्षकाची भूमिकाही बजावावी लागणार आहे.
भारतीय संघाचे वर्ल्ड कप स्पर्धेतील सुधारित वेळापत्रक
( Indian team schedule for World Cup 2023 )
८ ऑक्टोबर - भारत वि. ऑस्ट्रेलिया, चेन्नई
११ ऑक्टोबर - भारत वि. अफगाणिस्ता, दिल्ली
१४ ऑक्टोबर- भारत वि. पाकिस्तान, अहमदाबाद
१९ ऑक्टोबर - भारत वि. बांगलादेश, पुणे
२२ ऑक्टोबर - भारत वि. न्यूझीलंड, धर्मशाला
२९ ऑक्टोबर - भारत वि. इंग्लंड, लखनौ
२ नोव्हेंबर - भारत वि. श्रीलंका, मुंबई
५ नोव्हेंबर - भारत वि. दक्षिण आफ्रिका, कोलकाता
१२ नोव्हेंबर- भारत वि. नेदरलँड्स, बंगळुरू
Web Title: India’s ICC ODI World Cup team finalised; KL Rahul finding a place in the team as Sanju Samson missed out
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.