कोलंबो : आत्मविश्वास बळावलेला भारतीय संघ रविवारी श्रीलंकेविरुद्ध पाचवा आणि अखेरचा वन-डे सामना खेळणार असून, विजयासह यजमान संघाला ‘क्लीन स्वीप’ देण्याचा टीम इंडियाचा इरादा असेल. भारताने कसोटी मालिका ३-० अशी जिंकली असून, वन-डे मालिकादेखील ५-० ने जिंकण्याचा संघाला विश्वास वाटतो.
नोव्हेंबर २०१४ मध्ये श्रीलंकेने भारताविरुद्ध ५ सामन्यांची मालिका गमावली होती. त्यानंतर दुसºयांदा क्लीन स्वीप होण्याचे संकट यजमानांवर घोंगावत आहे. लंकेच्या कामगिरीत सातत्याने घसरण होत असल्याने, या संघाने २०१९ च्या विश्वषकात थेट पात्रतेची संधीदेखील गमावली आहे. भारताकडून मागच्या वन-डे मालिकेत पराभूत झाल्यापासून लंकेने झिम्बाब्वेला दोनदा हरविले. दुसरीकडे, भारताने न्यूझीलंडला २०१० मध्ये आणि इंग्लंडला २०१२ मध्ये ५-० ने पराभूत केले होते. भारताविरुद्ध दोनदा ५-० ने मालिका गमावणारा इंग्लंड एकमेव संघ आहे. भारताने उद्या लंकेला नमविल्यास या पंक्तीत श्रीलंकेचादेखील समावेश होईल. लंकेतील उकाडा आणि उष्णता यांवर मात करून भारताने पाठोपाठ मिळविलेले विजय संस्मरणीय ठरले. संघाचे सर्वच खेळाडू फिट असले, तरी आधीचाच ११ जणांचा संघ उद्यादेखील खेळविला जाऊ शकतो. याचा अर्थ, मनीष पांडे, शार्दूल ठाकूर व कुलदीप यादव यांना आणखी एक संधी मिळेल.
रवी शास्त्री यांनी गोलंदाजांची काळजी घेण्यावर भर दिल्याने हार्दिक पांड्याला विश्रांती देऊन केदार जाधवला संधी मिळेल, असे दिसते. रोहितबरोबर सलामीला कोण येईल, याचा निर्णय उद्या होईल. अजिंक्य रहाणे, लोकेश राहुल आणि मनीष पांडे हे फलंदाजीत धावा काढण्यात तरबेज आहेत. पांडेने मागच्या सामन्यात अर्धशतक ठोकले. रहाणे मात्र पुन्हा बाहेर बसेल, अशी चिन्हे आहेत. दुसरीकडे, लंकेचा संघ ११ जणांत बदल करू शकतो. कर्णधार उपुल थरंगा २ सामन्यांसाठी बाहेर होता. तो मधल्या फळीत उतरणार असल्याने थिरीमन्ने डावाला सुरुवात करेल.
मनोबल उंचाविण्याची गरज : गुणवर्धने
वन-डे मालिका गमावल्याने संघात निराशा पसरली आहे. ही मरगळ दूर करण्यासाठी खेळाडूंचे मनोबल उंचाविण्याची गरज असल्याचे मत श्रीलंका संघाचे अविष्का गुणवर्धने यांनी व्यक्त केली आहे. भारताने पाचपैकी चार सामने जिंकल्यामुळे लंकेला २०१९ च्या विश्वचषकातदेखील थेट प्रवेश मिळविता आला नाही. पाचव्या सामन्याच्या पूर्वसंध्येला गुणवर्धने म्हणाले, ‘तयारीसाठी फार वेळ नसतो. मागचा सामना संपवून दोन दिवस झाले. पाचवा सामना तोंडावर आहे. कोच या नात्याने खेळाडूंचे मनोबल उंचवायचे आव्हान आहे. मी खेळाडूंना काही टार्गेट दिले. खेळाडूंकडून कशी प्रतिक्रिया व्यक्त होते, हे तपासून
पाहावे लागेल. संघात उत्साह संचारण्यासाठी एक तरी विजय हवा आहे. पाचवा सामना जिंकण्याचा
माझा प्रयत्न असेल. मी खोटे बोलणार नाही, पण संघात निरुत्साह आहे, हे सांगेन. ०-४ ने माघारल्यानंतर
निरुत्साह असणे स्वाभाविक आहे. पण आमचे खेळाडू फॉर्ममध्ये येण्याचा प्रयत्न करीत असल्याची माहिती गुवणर्धने यांनी दिली.
धवन भारतात परतणार : भारताचा सलामीवीर शिखर धवन आपल्या आजारी आईला भेटण्यासाठी रविवारी मायदेशी परतणार आहे. त्यामुळे तो पाचवा एकदिवसीय क्रिकेट सामना व एकमेव टी-२० सामन्यात खेळू शकणार नाही. ५ वा एकदिवसीय सामना रविवारी होणार आहे. धवन याच्या आईची प्रकृती सध्या स्थिर आहे. त्याच्या जागी वरिष्ठ संघाच्या निवड समितीने अजूनपर्यंत कोणत्याही खेळाडूची निवड केली नसल्याचे बीसीसीआयचे सचिव अमिताभ श्रीवास्तव यांनी स्पष्ट केले.
5-0 भारताने जर उद्याच्या सामन्यात विजय मिळवला तर दोन्ही देशांतील मालिकेत हा भारताचा दुसरा व्हाईटवॉश असेल. भारताने २०१४ च्या मालिकेतदेखील श्रीलंकेला व्हाईटवॉश दिला होता.
7 विराट कोहलीने आतापर्यंत २९ शतके ठोकली आहेत. त्यातील सात शतके ही श्रीलंकेविरोधात आहेत, तर पाच शतके आॅस्ट्रेलियाविरोधात केली आहेत.
91.16 महेंद्रसिंह धोनी याने गुरुवारी केलेल्या ४९ धावांसह त्याने २०१७ मध्ये ८५ च्या स्ट्राईक रेटने आपली सरासरी ९१.१६ अशी केली.
प्रतिस्पर्धी संघ
भारत : विराट कोहली (कर्णधार), शिखर धवन, रोहित शर्मा, लोकेश राहुल, मनीष पांडे, अजिंक्य रहाणे, केदार जाधव, महेंद्रसिंह धोनी, हार्दिक पांड्या, अक्षर पटेल, कुलदीप यादव, यजुवेंद्र चहल, जसप्रीत बुमराह, भुवनेश्वर कुमार आणि शार्दूल ठाकूर.
श्रीलंका : उपुल थरंगा (कर्णधार), लसिथ मलिंगा, धनंजय डिसिल्व्हा, दिलशान मुनवीरा, लाहिरू थिरीमन्ने, अँजेलो मॅथ्यूज, निरोशन डिकवेला, कुशल मेंडिस, मिलिंदा सिरिवर्धने, मलिंडा पुष्पकुमारा, अकिला धनंजया, लक्षण संदाकन, थिसारा परेरा, वानिंदू हसरंगा, दुष्मंता चामिरा आणि विश्वा फर्नांडो.
स्थळ : प्रेमदासा स्टेडियम, कोलंबो
वेळ : दुपारी २.३० पासून
Web Title: India's intention to give clean sweep to Sri Lanka: fifth ODI today
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.