सुनील गावस्कर लिहितात...
गेल्या शतकात भारतीय क्रिकेटपटूंचे आंतरराष्ट्रीय सत्र आॅक्टोबर ते एप्रिलचा पहिला पंधरवडा असे असायचे. त्यानंतर एप्रिल ते सप्टेंबर या कालावधीत खेळाडू आपल्या कॉर्पोरेट कार्यालयात सेवा देण्यात व्यस्त असायचे. काही खेळाडू या कालावधीचा उपयोग इंग्लंडमधील क्लब क्रिकेट खेळण्यासाठी करायचे.
आता मात्र काळ बदललेला आहे. आता खेळाडू क्रिकेट बोर्डासोबत करारबद्ध झालेले आहेत. आता भारतीय संघाचा दौरा म्हणजे प्रसारण हक्कापोटी कोट्यवधी डॉलर्सची कमाई असते.
विंडीजविरुद्ध वन-डे सामन्यांच्या मालिकेनंतर मायदेशात परतलेला भारतीय संघ काही दिवसांच्या विश्रांतीनंतर लगेच श्रीलंका दौºयावर आहे. दोन वर्षांपूर्वी विराट कोहलीची कसोटी संघाच्या कर्णधारपदी नियुक्ती झाल्यानंतर भारतीय संघाने श्रीलंकेचा सर्वप्रथम दौरा केला होता. त्या वेळी पहिला कसोटी सामना गमाविल्यानंतर भारतीय संघाने दमदार पुनरागमन करताना नंतरचे दोन्ही सामने जिंकले होते. भारताने प्रदीर्घ कालावधीनंतर श्रीलंकेत कसोटी मालिकाविजय साकारला होता. या वेळीही मालिकेची सुरुवात गाले कसोटीने होत आहे. गेल्या वेळी येथे भारताला पराभवाला सामोरे जावे लागले होते. या वेळी मात्र भारतीय संघाला पराभव स्वीकारावा लागला तर आश्चर्य वाटेल. श्रीलंका संघाला ‘बिग थ्री’च्या (माहेला जयवर्धने, मुथय्या मुरलीधरन व कुमार संगकारा) जाण्यामुळे निर्माण झालेली पोकळी भरून काढता आलेली नाही. श्रीलंका संघासाठी फलंदाजीपेक्षा गोलंदाजीची बाजू चिंंतेचा विषय आहे. विशेषत: भारतीय फलंदाजीचा विचार करता रंगाना हेराथचा अपवाद वगळता पाच बळी घेण्याची क्षमता असलेला गोलंदाज श्रीलंका संघात दिसत नाही.
दुखापत व आजारपणामुळे भारताला दोन्ही नियमित सलामीवीर फलंदाजांविना पहिल्या कसोटीत खेळावे लागणार आहे. त्यामुळे शिखर धवन व अभिनव मुकुंद यांचे संघात पुनरागमन झाले आहे. आॅस्ट्रेलियाच्या तुलनेत श्रीलंकेविरुद्ध खेळणे मुकुंदसाठी सोपे राहील. चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये धवनची कामगिरी उल्लेखनीय ठरली होती, पण लाल चेंडूविरुद्ध खेळताना त्याला सावधगिरी बाळगावी लागणार आहे. भारतीय संघ तीन फिरकीपटू की एका अतिरिक्त फलंदाजासह खेळणार, याबाबत उत्सुकता आहे. यावरून कोहली कसोटी क्रिकेटबाबत काय विचार करतो, याची कल्पना येईल. कसोटी सामना जिंकण्यासाठी २० बळी घेण्याची गरज असते. साहाची फलंदाजी व आश्विन-जडेजा यांची धावा फटकावण्याची क्षमता लक्षात घेता भारतीय संघ ‘पाच फलंदाज’ हा फॉर्म्युला वापरण्याची शक्यता आहे. भारतीय संघाच्या एकूण क्षमतेचा विचार करता या मालिकेत संघाला विजयाचा दावेदार मानले जात आहे. आगामी व्यस्त कार्यक्रम लक्षात घेता भारतीय संघाला येथे शानदार विजयाची गरज आहे. (पीएमजी)
Web Title: India's mastery against Sri Lanka
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.