India vs Pakistan : भारतीय संघाने रविवारी इंग्लंडमध्ये ऐतिहासिक मालिका विजय मिळवला. मँचेस्टर येथे १९८३नंतर प्रथमच भारताला वन डे सामना जिंकता आला आणि हा विजय अविस्मरणीय ठरला. रिषभ पंतचे खणखणीत शतक अन् हार्दिक पांड्याच्या अष्टपैलू कामगिरीने भारताला २-१ अशी मालिका जिंकून दिली, ८ वर्षांनंतर भारताने इंग्लंडमध्ये वन डे मालिका जिंकली. मोहम्मद अझरुद्दीन व महेंद्रसिंग धोनी यांच्यानंतर आता रोहित शर्मा हा इंग्लंडमध्ये वन डे मालिका जिंकणारा तिसरा भारतीय कर्णधार ठरला आहे. पण, रोहितने ट्वेंटी-२० व वन डे अशा दोन्ही मालिका जिंकल्या आणि अशी कामगिरी अद्याप कोणत्याही भारतीय कर्णधाराला जमली नाही.
भारताने ऐतिहासिक मालिका विजय जिंकून इंग्लंडचा नव्हे, तर कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानलाही धक्का दिला आहे. भारताने तीन सामन्यांची मालिका २-१ अशी जिंकताना ICC ODI Rankings मध्ये तिसऱ्या क्रमांकावर झेप घेतली आहे. त्यांनी पाकिस्तानला चौथ्या क्रमांकावर ढकलले आहे. न्यूझीलंड १२८ रेटिंगसह अव्वल, तर इंग्लंड १२१ रेटिंगसह दुसऱ्या स्थानावर आहे. तिसऱ्या स्थानावर असलेल्या भारताच्या खात्यात १०९ रेटिंग गुण आहेत, पाकिस्तानकडे १०६ रेटिंग गुण आहेत. त्यामुळे तिसऱ्या स्थानावरची स्पर्धा पुढेही सुरू राहणार आहे.
सहाव्या क्रमांकावर असलेला दक्षिण आफ्रिकेचा संघ सध्या पाकिस्तानपेक्षा ७ गुणांनी पिछाडीवर आहे आणि त्यांना चौथ्या क्रमांकावर येण्याची संधी आहे. इंग्लंडविरुद्धच्या तीन सामन्यांच्या मालिकेत आफ्रिकेने बाजी मारली, तर पाकिस्तान व ऑस्ट्रेलिया यांना फटका बसू शकतो. भारतीय संघा २२ जुलैपासून वेस्ट इंडिजविरुद्ध तीन वन डे सामन्यांची मालिका खेळणार आहे. पाकिस्तान सध्या श्रीलंकेत कसोटी मालिका खेळतोय.. त्यानंतर ऑगस्टमध्ये नेदरलँड्सविरुद्ध वन डे मालिका खेळणार आहे.