India’s New T20 Captain: ट्वेंटी-२० वर्ल्ड कपनतंर विराट कोहली ( Virat Kohli) टीम इंडियाच्या ट्वेंटी-२० संघाचे कर्णधारपद सोडणार आहे. विराटनं आयपीएल २०२१ला सुरुवात होण्याआधीच ही घोषणा केली होती. त्यामुळे विराटनंतर टीम इंडियाच्या ट्वेंटी-२० संघाच्या कर्णधारपद कोणाकडे जाईल, याची चर्चा सुरू आहे. ३४ वर्षीय रोहित शर्मा ( Rohit Sharma) याचे नाव आघाडीवर आहे, पण भविष्याचा विचार करता लोकेश राहुल ( KL Rahul) आणि रिषभ पंत ( Rishabh Pant) यांचीही नावं चर्चेत आहेत. BCCIनंही विराटनंतरचा उत्तराधिकारी निवडला आहे आणि ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेनंतर त्याची अधिकृत घोषणा करण्यात येणार आहे.
ट्वेंटी-२० वर्ल्ड कपनंतर टीम इंडियाच्या ट्वेंटी-२० संघाचे नेतृत्व रोहित शर्मा ( Rohit Sharma) कडे सोपवण्यात येणार आहे आणि InsideSportला बीसीसीआयच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार ट्वेंटी-२० वर्ल्ड कपनंतर याची घोषणा करण्यात येणार आहे. रोहित सध्या टीम इंडियाच्या मर्यादित षटकांच्या संघाचा उप कर्णधार आहे आणि विराटनंतर त्याच्याकडे कर्णधारपदाची जबाबदारी सोपवण्यात येणार आहे. ''विराटनंतर कर्णधार कोण असेल, याबाबत काहीच रहस्य नाही. रोहित शर्मा हा ट्वेंटी-२० वर्ल्ड नंतर कर्णधारपदी विराजमान होईल. वर्ल्ड कपनंतर त्याची अधिकृत घोषणा केली जाईल,''असे बीसीसीआयच्या सूत्रांनी सांगितले.
विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली टीम इंडियानं ४५ पैकी २७ सामने जिंकले आहेत, तर १४ सामन्यांत पराभव झाला असून २ सामने अनिर्णीत राहिले आहेत. विराटच्या नेतृत्वात विजयाची टक्केवारी ही ६५.११ इतकी आहे. दुसरीकडे रोहितच्या नेतृत्वाखाली टीम इंडियानं १९ पैकी १५ सामने जिंकले आहेत, तर ४ सामन्यांत पराभव पत्करावा लागला आहे.