ठळक मुद्देसगळ्याच क्रिकेटप्रेमींच्या मनात स्टेडिअमविषयी एक वेगळं स्थान असतं. अमुक एका ठिकाणी आपण हरतोच किंवा अमुक एक स्टेडिअम आपल्यासाठी किती भाग्यशाली आहे याच्या चर्चा घडताना दिसतात. भारतात अनेक जुने क्रिकेट स्टेडिअम आजही अस्तित्वात आहेत. त्याचप्रमाणे अनेक नवे स्टेडिअमही आधुनिक पद्धतीने बांधण्यात आले आहेत.
मुंबई : सगळ्याच क्रिकेटप्रेमींच्या मनात स्टेडिअमविषयी एक वेगळं स्थान असतं. अमुक एका ठिकाणी आपण हरतोच किंवा अमुक एक स्टेडिअम आपल्यासाठी किती भाग्यशाली आहे याच्या चर्चा घडताना दिसतात. त्यामुळे प्रत्येक स्टेडिअमला एक वेगळी जागा प्रत्येक खेळाडू आणि क्रिकेटप्रेमींच्या मनात आहे. भारतात अनेक जुने क्रिकेट स्टेडिअम आजही अस्तित्वात आहेत. त्याचप्रमाणे अनेक नवे स्टेडिअमही आधुनिक पद्धतीने बांधण्यात आले आहेत. अशाच काही प्रसिद्ध जुन्या-नव्या स्टेडिअमविषयी आपण जाणून घेऊया.
इडन गार्डन, कोलकत्ता
देशातील सर्वात जुनं आणि मोठं स्टेडियम म्हणून ओळख असलेल्या इडन गार्डन स्टेडिअम १८६५ पासून अस्तित्वात आहे. पूर्वी येथे ९० हजार प्रेक्षक बसण्याची क्षमता होती. मात्र या स्टेडिअमचं नूतनीकरण करण्यात आलं तेव्हा आसन क्षमता ६५,००० करण्यात आली. असं म्हणतात की प्रत्येक क्रिकेट खेळाडूची अशी इच्छा असते की एकदातरी इडन गार्डनमध्ये खेळायचं आणि नुसतं खेळायचंच नाही तर हे मैदान गाजवाय़चं. स्डेडिअमची आसन व्यवस्था अधिक असल्याने येथे गर्दीही मोठ्या प्रमाणात असते. येथे स्थानिकांचाही येथे मोठ्या प्रमाणात हस्तक्षेप असतो. म्हणूनच १९९६ सालच्या वर्ल्डकपच्या सेमी फायनलमध्ये येथे बाचाबाची होऊन सामन्यात व्यत्यय आला होता.
फिरोझ शहा कोटला ग्राऊंड, दिल्ली
इडन गार्डननंतर सगळ्यात जुनं क्रिकेट स्टेडिअम म्हणून ज्याची गणना होते ते स्टेडिअम म्हणजे फिरोझ शहा कोटला ग्राऊंड. दिल्ली डिस्ट्रिक क्रिकेट असेसोसिएशनच्या अखत्यारित हे स्टेडिअम येतं. सचिननं त्याचं ३५वं शतक इथेच पूर्ण केलं होतं. ५५ हजार आसनव्यवस्था असलेलं हे स्टेडिअम १८८३ मध्ये बांधण्यात आलं आहे. अनेक वर्ल्ड रेकॉर्ड या स्टेडिअमने पाहिले आहेत. त्यामुळे प्रत्येक खेळाडूच्या मनात या स्टेडिअमविषयी एक वेगळीच आपुलकी आहे.
राजीव गांधी इंटरनॅशनल स्टेडिअम, हैदराबाद
२००४ साली बांधण्यात आलेल्या राजीव गांधी इंटरनॅशनल स्टेडिअममध्ये जवळपास ५५ हजार प्रेक्षक बसू शकतील एवढी क्षमता आहे. पूर्वी या स्टेडिअमला विसाका इंटरनॅशनल स्टेडिअम असंही नाव होतं. हे स्टेडिअमही सचिनसाठी फार महत्त्वाचं आहे. कारण ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या खेळात त्याने त्यांना ३ धावांनी पराजित केलं होतं. शिवाय त्याचं ४५ वं शतकही इथेच पूर्ण झालं होतं. त्याच्या करिअरमधील वन-डे खेळासाठी मॅन ऑफ दि मॅच याच स्टेडिअममध्ये मिळाला तर १७ हजार धावांचा टप्पाही त्याने याच स्टेडिअमवर पूर्ण केला होता.
डि.व्हाय. पाटील स्टेडिअम, नवी मुंबई
या स्टेडिअमची रचना एवढी भव्य आणि अवाढव्य आहे की, जगातील काही प्रसिद्ध स्टेडिअमपैकी एक स्टेडिअम म्हणून याची अल्पावधीतच ओळख झाली. २००८ सालापासून या स्टेडिअमवर सामने भरवण्यास सुरुवात झाली असून जवळपास ६० हजार आसनव्यवस्था या स्टेडिअममध्ये आहे. नुकताच या स्टेडिअममध्ये आंतरराष्ट्रीय फिफा वर्ल्डकपचा सामना पार पडला आहे.
वानखेडे स्टेडिअम, मुंबई
क्रिकेट क्लब ऑफ इंडिया आणि मुंबई क्रिकेट असोसिएशन यांच्यात झालेल्या वादामुळे या स्टेडिअमची रचना करण्यात आली असल्याचं सांगण्यात येतं. १९७४ साली या स्टेडिअमचं बांधकाम पूर्ण झालं असून १९७५ साली भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील पहिला सामना येथे खेळवला गेला. वानखेडेवर भारताचा सामना असेल तर या ठिकाणी तिकीटं मिळणं हे लॉटरी लागण्यासारखं असतं, असं म्हटलं जातं. तसेच सगळेच खेळाडू या स्टेडिअमवर खेळायला नेहमीच उत्सुक असतात. धोनीच्या नेतृत्वाखाली २०११ साली भारताने दुसरा वर्ल्डकप याच स्टेडिअमवर जिंकला होता. याच स्टेडीअमवर सचिन तेंडूलकर शेवटचा विश्वचषक सामना खेळला.
विदर्भ क्रिकेट असोसिएशन, नागपूर
भारतातील सर्वात महत्वाचं स्टेडिअम म्हणून विदर्भ क्रिकेट असोसिएशन या स्टेडिअमची गणना होते. टेस्ट आणि एकदिवसीय सामन्यांसाठी हे स्टेडिअम फार प्रसिद्ध आहे. २००८ सालापासून या स्टेडिअमवर सामने खेळवले जात असून जवळपास ४१ हजार आसनव्यवस्था येथे आहे. शिवाय आधुनिक पद्धतीने या स्टेडिअमचं बांधकाम करण्यात आल्याने प्रेक्षकवर्गही येथे आवर्जून उपस्थित राहतो. भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया हा सामना येथे पहिल्यांदा खेळवण्यात आला, त्यावेळी भारताने १५४ रन करून ऑस्ट्रेलियाला पराजित केलं होतं.
Web Title: india's old and huge cricket stadiums and records
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.