भारताचा सलामीवीर शुबमन गिल डेंग्यूने ग्रस्त असून यामुळे तो विश्वचषकातील पहिल्या दोन सामन्यांना मुकला. शनिवारी भारत आणि पाकिस्तान यांच्यात सामना होणार आहे. त्यामुळे गिल पुनरागमन करणार का हे पाहण्याजोगे असेल. पण, शेजाऱ्यांविरूद्धच्या बहुचर्चित सामन्यापूर्वी आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने शुबमन गिलला मोठी भेट दिली आहे. गिलला सप्टेंबर महिन्यातील अविस्मरणीय कामगिरीमुळे 'ICC प्लेयर ऑफ द मंथ' पुरस्कार जाहीर झाला आहे.
दरम्यान, दोनदा आयसीसी प्लेयर ऑफ द मंथ अवॉर्ड जिंकणारा शुबमन पहिला भारतीय क्रिकेटर ठरला आहे. जानेवारी २०२३ मध्ये देखील त्याला या पुरस्काराने गौरवण्यात आले होते, तेव्हा त्याने वन डेमध्ये द्विशतक झळकावले होते. आशिया चषकानंतर ऑस्ट्रेलियाविरूद्धच्या मालिकेत देखील गिलने कमाल केली. त्याने मोहालीत ७४ आणि इंदूरमध्ये १०४ धावांची अप्रतिम शतकी खेळी केली.
दरम्यान, उद्या वन डे विश्वचषकात भारत आणि पाकिस्तान यांच्यात सामना होणार आहे. आजारपणामुळे पहिल्या दोन सामन्याला मुकलेला गिल पाकिस्तानविरूद्ध खेळणार का हे पाहण्याजोगे असेल. दोन्ही संघ प्रत्येकी २-२ सामने जिंकून इथपर्यंत पोहचले आहेत. यजमान भारताने ऑस्ट्रेलिया आणि अफगाणिस्तानचा पराभव केला, तर पाकिस्तानने नेदरलॅंड्स आणि श्रीलंकेला पराभूत करून यजमानांशी भिडण्यासाठी सज्ज असल्याचे दाखवून दिले. खरं तर वन डे विश्वचषकाच्या इतिहासात पाकिस्तानला कधीच भारताविरूद्ध विजय मिळवला आलेला नाही. त्यामुळे टीम इंडिया देखील शेजाऱ्यांविरूद्धचा विजयरथ कायम ठेवण्यासाठी प्रयत्नशील असेल.
विश्वचषकासाठी भारतीय संघ - रोहित शर्मा (कर्णधार), हार्दिक पंड्या (उप कर्णधार), शुबमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, लोकेश राहुल, रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, कुलदीप यादव, मोहम्मद शमी, रविचंद्रन अश्विन, इशान किशन, सूर्यकुमार यादव.
वन डे विश्वचषकातील भारताचे पुढील सामने - भारत विरुद्ध पाकिस्तान - १४ ऑक्टोबर, अहमदाबादभारत विरुद्ध बांगलादेश - १९ ऑक्टोबर, पुणेभारत विरुद्ध न्यूझीलंड - २२ ऑक्टोबर, धर्मशालाभारत विरुद्ध इंग्लंड - २९ ऑक्टोबर, लखनौभारत विरुद्ध श्रीलंका - २ नोव्हेंबर, मुंबईभारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका - ५ नोव्हेंबर, कोलकाताभारत विरुद्ध नेदरलँड्स - १२ नोव्हेंबर, बंगळुरू