पाकिस्तान संघाचे आशिया चषक २०२३ जिंकण्याचे स्वप्न काल भंगले. यजमान श्रीलंकेने थरारक लढतीत विजय मिळवून पाकिस्तानला स्पर्धेबाहेर फेकले. बाबर आजम अँड टीमने ज्याप्रकारे स्पर्धेत सुरुवात केली होती, ते पाहता जेतेपदाच्या शर्यतीत ते आघाडीवर होते. पण, भारताकडून झालेल्या धुलाईनंतर त्यांचे खच्चिकरण झाले अन् काल त्यांना गाशा गुंडाळून मायदेशात परतावे लागले. या धक्क्यानंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का बसला अन् यावेळी निमित्त टीम इंडिया ठरली. पाकिस्तानची कामगिरी ढासळत असताना टीम इंडिया फॉर्मात दिसली आणि हेच कारण बाबरच्या संघाला धक्का देण्यासाठी पुरेसे ठरले.
आशिया स्पर्धेतून पॅकअप झाल्यामुळे पाकिस्तानने आयसीसी वन डे क्रमवारीतील नंबर १ स्थानही गमावले. ऑस्ट्रेलियाने दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेतील पहिला सामना जिंकून अव्वल स्थानी झेप घेतली होती. पण, पाकिस्तानने बांगलादेशला नमवले अन् दुसऱ्या वन डेत ऑस्ट्रेलियाची हार झाली. त्यामुळे बाबर आजमचा संघ पुन्हा नंबर १ बनला होता. पण, आता ते थेट तिसर्या क्रमांकावर फेकले गेले आहेत. बाबर आजमच्या संघाला ११५ रेटींग पॉईंट्ससह तिसऱ्या क्रमांकावर घसरावे लागले. वर्ल्ड कप स्पर्धेच्या तोंडावर पाकिस्तानला हा मोठा धक्का आहे, कारण आता त्यांना थेट वर्ल्ड कप स्पर्धेतच खेळायचे आहे.
ऑस्ट्रेलियाने ११८ रेटींग पॉईंट्ससह अव्वल स्थानावर आली आहे, तर टीम इंडिया ११६ रेटींग पॉईंट्सह दुसऱ्या क्रमांकावर आली आहे. भारतीय संघाने बांगलादेशविरुद्धची मॅच अन् पुढे आशिया चषक ( वि. श्रीलंका) जिंकल्यास ते नंबर १ बनतील. पण, त्याचेवी ऑस्ट्रेलियाच्या दक्षिण आफ्रिकेकडून पराभवाची वाट त्यांना पाहावी लागेल. भारतीय संघा सध्या कसोटी व ट्वेंटी-२० क्रमवारीत अव्वल क्रमांकावर आहे आणि वन डेतही ते अव्वल बनल्यास ही खूप मोठी गोष्ट असेल.