India Squad T20 WC, Jasprit Bumrah Injury: भारतीय संघाला ट्वेंटी-२० वर्ल्ड कपपूर्वी मोठा धक्का बसण्याची शक्यता निर्माण झाली आहे. भारताचा प्रमुख जलदगती गोलंदाज जसप्रीत बुमराह ( Jasprit Bumrah) हा ऑस्ट्रेलियात होणाऱ्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत खेळण्याची शक्यता कमी आहे. पाठीच्या दुखापतीमुळे जसप्रीतने आशिया चषक स्पर्धेतून माघार घेतली आहे. २०१९मध्ये याच दुखण्यामुळे त्याला आंतरराष्ट्रीय क्रिकेटपासून दूर रहावे लागले होते. त्याच्या या दुखापतीने पुन्हा डोकं वर काढलं आहे आणि त्यामुळे BCCI व निवड समितीची चिंता वाढली आहे. कारण, ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेसाठी संघ जाहीर करण्यासाठी आता महिनाच उरला आहे.
''होय ही चिंतेची बाब आहे. तो आता पुनर्वसनासाठी NCA त आहे आणि त्याच्यासाठी आम्ही सर्वोत्तम वैद्यकिय सल्ला घेणार आहोत. त्याच्या जुन्याच दुखापतीनं डोकं वर काढलं आहे आणि हिच चिंतेची बाब आहे. वर्ल्ड कप स्पर्धेसाठी आता दोन महिनेच शिल्लक आहेत आणि नको त्या वेळी त्याला दुखापतीने घेरले आहे. त्याच्या दुखापतीवर आमचं बारीक लक्ष आहे आणि त्याची दुखापत योग्य रितीने हाताळली गेली पाहिजे,''असे BCCI च्या वरिष्ठ अधिकाऱ्याने InsideSport ला सांगितले.
पाठीच्या दुखापतीमुळे जसप्रीत बुमराह आधीही मैदानाबाहेर होता. त्याच्या गोलंदाजीच्या वेगळ्या शैलीमुळे ही दुखापत डोकं वर काढत असल्याचे जाणकारांचे मत आहे. पाठीच्या दुखापतीमुळे त्याला अनेक महिने मैदानाबाहेर बसवू शकते. ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या तोंडावर भारतीय संघाला हा मोठा धक्का बसू शकतो. २०१८मध्ये याच दुखापतीमुळे त्याचे कसोटी पदार्पण लांबणीवर पडले. आता बुमराहच्या गैरहजेरीत भुवनेश्वर कुमारवर संपूर्ण मदार असणार आहे.
हर्षल पटेल यालाही दुखापत झाली आहे आणि तोही वर्ल्ड कप खेळण्याची शक्यता कमी आहे. जर हे दोन्ही गोलंदाज वर्ल्ड कप स्पर्धेतून बाहेर पडले, तर भारताचा मार्ग अधिक खडतर बनेल. अशा परिस्थितीत निवड समिती मोहम्मद शमीच्या नावाचा विचार करू शकतील. निवड समितीने शमीला ट्वेंटी-२० साठी विचार करणार नसल्याचे आधी सांगितले आहे. त्याच्या वयामुळे हा निर्णय घेतला गेला आहे. पण, बुमराह व पटेलच्या गैरहजेरीत निवड समिती त्यांचा निर्णय बदलू शकतात.