अयाझ मेमन
लंडनहून नॉटिंगहॅमला येत असताना भारतासमोर सर्वात मोठी अडचण उभी राहिली. आॅस्ट्रेलियाविरुद्धच्या भारताच्या विजयाचा शिल्पकार ठरलेल्या शिखर धवनच्या अंगठ्याला फ्रॅक्चर असल्याचे स्पष्ट झाले. धवनने या सामन्यात शतक झळकावले, तसेच तो सामनावीरही ठरला. मात्र आता या दुखापतीनंतर स्पर्धेतील उर्वरित सामन्यातही त्याचे खेळणे शंकास्पद आहे. आता पुढचा सामना न्युझीलंडविरुद्ध आहे.
धवनने आॅस्ट्रेलियाविरुद्ध क्षेत्ररक्षण केले नाही. आॅस्ट्रेलियाविरुद्ध भारताचा विजय झाल्यावर त्याने ड्रेसिंग रूममधून स्मित हास्य केले होते. वेदना कमी होत नसल्याने त्याला लीड्सच्या रुग्णालयात स्कॅनिंगसाठी पाठवण्यात आले. त्यावेळी त्याच्या दुखापतीचे स्वरूप समोर आले. ही दुखापत बरी होण्यास किमान तीन अठवडे तरी लागतील. त्यामुळे तो इंग्लंडविरुद्धच्या साखळी सामन्यापर्यंत तरी खेळू शकणार नसल्याचे स्पष्ट आहे. पण यातून सावरण्यास आणखी कालावधी लागल्यास तो विश्वचषकातून बाहेर जाऊ शकतो. धवन हा संघाच्या यशातील मोठा घटक आहे. तो न्यूझीलंड आणि पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यांना नक्कीच मुकेल. हे सामने मोठ्या फरकाने जिंकल्यास भारत सहज उपांत्य फेरीत प्रवेश करू शकतो. भारताला आता दुसरा सलामीवीर शोधावा लागेल. बहुतेक हा सलामीवीर लोकेश राहुल असू शकतो. धवन आणि रोहित शर्मा हे भारताचे विश्वासू सलामीवीर आहेत. भारत डावखुरा आणि उजव्या फलंदाजांचे संयोजन मात्र गमावेल. रोहितला नव्या सलामीवीरासोबत जुळवून घ्यावे लागेल.
धवन दुखापत असतानाही खेळण्यास उत्सुक आहे. मात्र त्यासाठी किती मोठी किंमत मोजावी लागते, हे प्रशिक्षक शास्त्री यांना चांगलेच माहित आहे. १९९२ च्या विश्वचषकात गुडघा दुखापतीनंतरही लगेचच शास्त्री आॅस्ट्रेलियाला गेले होते. मात्र त्यामुळे त्यांना लवकर निवृत्ती घ्यावी लागली. संघ व्यवस्थापनातील सूत्रांनी सांगितले की, धवनच्या पूर्ण बरे होण्याची आम्ही प्रतीक्षा करत आहोत. त्यामुळे तो अखेरच्या टप्प्यात तरी उपलब्ध राहू शकतो. आता भारताकडे रिषभ पंत व श्रेयस अय्यर हे दोन फलंदाज आहेत. क्षमता व कौशल्य असलेल्या पंतला संघ निवडकर्त्यांनी संधी दिली नव्हती. या शर्यतीत अजिंक्य रहाणेचे नावही आहे. रहाणे येथे काऊंटी क्रिकेटमध्ये हॅम्पशायरकडून खेळत आहे आणि सध्या चांगल्या फॉर्ममध्ये आहे. त्याने इंग्लंडमधील परिस्थितीसोबत जुळवून घेतले आहे. तो कोणत्याही स्थानावर फलंदाजी करू शकतो.
(लेखक लोकमत वृत्तसमुहात सल्लागार संपादक आहेत)
Web Title: India's 'peak' of problems with Dhanav's injury in worldcup
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.