Join us  

क्लीन स्वीपसह ४० गुण मिळविण्याचा भारताचा निर्धार

तिसरा कसोटी सामना : द. आफ्रिकेसमोर जागतिक स्पर्धेतील गुणांचे खाते उघडण्याचे आव्हान

By ऑनलाइन लोकमत | Published: October 19, 2019 4:34 AM

Open in App

रांची : मालिका आधीच खिशात घालणारा भारतीय संघ शनिवारपासून द.आफ्रिकेविरुद्ध खेळल्या जाणाऱ्या तिसºया आणि अंतिम कसोटीत विजय मिळवून ‘क्लीन स्वीप’च्या तसेच जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेतील महत्त्वपूर्ण गुण संपादन करण्याच्या निर्धाराने उतरणार आहे.

हा सामना औपचारिक वाटत असला तरी विजयामुळे भारतीय संघ ४० गुणांची कमाई करेल. पहिल्या दोन्ही सामन्यात प्रत्येक क्षेत्रात भारताने वर्चस्व गाजवले होते.जागतिक अजिंक्यपद स्पर्धेमध्ये भारताचे चार सामन्यातून २०० गुण, तर न्यूझीलंड व श्रीलंका यांचे प्रत्येकी १४० गुण आहेत. भारतीय संघात फलंदाजी आणि गोलंदाजीत कुठलीही उणीव जाणवत नाही. रोहित शर्मा याने सलामीवीर म्हणून चोख भूमिका बजावली. पहिल्या कसोटीत दोन्ही डावात त्याने शतके ठोकली होती. मयांक अगरवाल याने विशाखापट्टणमला द्विशतक, तर पुण्यात शतक ठोकले. कोहलीनेही कारकिर्दीतील सर्वोत्कृष्ट खेळी करीत २५४ धावा ठोकल्या होत्या. मालिकेत दोन अर्धशतकांची नोंद करणारा चेतेश्वर पुजारा याला येथे मोठी खेळी करण्याची संधी असेल.

भारताने या मालिकेत आतापर्यंत केवळ १६ गडी गमावले. आतापर्यंत नाणेफेकीनेही भारताच्या बाजूने कौल दिला. फिरकीपटूंसह वेगवान गोलंदाजांचे यश हे या मालिकेचे वैशिष्ट्य म्हणावे लागेल. उमेश यादव याने पुण्यात भेदक मारा केला तर यष्टिरक्षक रिद्धिमान साहा याने काही अप्रतिम झेल टिपले होते. उमेशमुळे हनुमा विहारीला बाहेर बसावे लागले. या सामन्यात कोहली विजयी संघात काही बदल करतो का, हे पाहावे लागेल.

रांची येथल खेळपट्टी फिरकीला अनुकूल मानली जात असल्याने, सामन्यात तिसरा फिरकी गोलंदाज या नात्याने कुलदीप यादवला संधी मिळण्याची शक्यता आहे. शुक्रवारी त्याने गोलंदाजीचा नेटमध्ये कसून सराव केला.दुसरीकडे फलंदाज एडेन मार्कराम जखमी झाल्याने दक्षिण आफ्रिका संघाच्या समस्या वाढल्या. गोलंदाजीत कागिसो रबाडा, व्हर्नोन फिलॅन्डर आणि एन्रिच नॉर्टजे यांना भारतीय फलंदाजांना रोखण्यात अपयश आले. त्याचप्रमाणे अनुभवी फिरकीपटू केशव महाराजदेखील खेळू शकणार नसल्याने भारतीयांना रोखणे दक्षिण आफ्रिकेच्या माºयापुढे भारतीय संघाला रोखण्याचे मोठे आव्हान असेल. (वृत्तसंस्था)

प्रतिस्पर्धी संघ :भारत : विराट कोहली (कर्णधार), मयंक अग्रवाल, रोहित शर्मा, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे (उपकर्णधार), हनुमा विहारी, रिद्धिमान साहा, रविचंद्रन अश्विन,रवींद्र जडेजा, कुलदीप यादव, मोहम्मद शमी, उमेश यादव, इशांत शर्मा, रिषभ पंत आणि शुभमन गिल. दक्षिण आफ्रिका : फाफ डु प्लेसिस (कर्णधार), तेम्बा बावुमा (उप कर्णधार), थेनिस डी ब्रुइ, क्वींटन डिकॉक, डीन एल्गर, झुबेर हमजा, जॉर्ज लिंडे, सेनुरन मुथुस्वामी, लुंगी एनगिडी, एरिक नॉर्टजे, व्हर्नोन फिलॅॅन्डर, डेन पीट, कासिगो रबाडा आणि रूडी सेकंड.

टॅग्स :द. आफ्रिका