वडोदरा : स्मृती मानधनाने चांगली सुरुवात करून दिल्यानंतरही भारतीय महिला संघाला मधली फळी अपयशी ठरल्यामुळे आॅस्ट्रेलियाविरुद्ध गुरुवारी झालेल्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात ६० धावांनी पराभव स्वीकारावा लागला. यासह भारताने तीन सामन्यांची मालिका गमावली आहे. आॅस्ट्रेलिया संघाने २-० अशी विजयी आघाडी घेतली आहे.भारतीय संघापुढे २८८ धावांचे कठीण लक्ष्य होते. डावखुरी फलंदाज मानधनाने ५३ चेंडूंना सामोरे जाताना १२ चौकार व १ षटकाराच्या मदतीने आक्रमक ६७ धावांची खेळी केली. ती बाद झाल्यानंतर मात्र भारतीय संघ ढेपाळला. भारताचा डाव ४९.२ षटकांत २२७ धावांत संपुष्टात आला.त्याआधी, भारताने नाणेफेक जिंकून आॅस्ट्रेलियाला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केले. आॅस्ट्रेलियाने ९ बाद २८७ धावा केल्या. आॅस्ट्रेलियातर्फे सलामीवीर निकोल बोल्टन (८४), एलिस पेरी (नाबाद ७०) आणि बेथ मूनी (५६) यांनी अर्धशतकी खेळी केल्या. भारतातर्फे शिखा पांडेने ६१ धावांत ३ तर पूनम यादवने ५२ धावांत २ बळी घेतले. पॅरीने अष्टपैलू कामगिरी केली. तिने ४१ धावांत दोन बळीही घेतले. भारतीय फलंदाजांवर सलग दुसºया लढतीतही फिरकीपटूंनी वर्चस्व गाजवले. डावखुरी फिरकीपटू जेस जोनासनने ५१ धावांत ३ बळी घेतले. लेग स्पिनर अमांडा वेलिंग्टनने २० धावांत २ बळी घेतले.ही मालिका आयसीसी चॅम्पियनशिपचा भाग असून आॅस्ट्रेलियाने दोन सामने जिंकत दोन गुण वसूल केले. आॅसीने ५ सामन्यांत ८ गुण घेतले असून ते दुसºया स्थानी आहेत. भारताने ५ सामन्यातून ४ गुण घेतले असून चौथ्या स्थानी आहे. (वृत्तसंस्था)मानधनाने भारताला सकारात्मक सुरुवात करुन दिली, पण तिची सहकारी पूनम राऊतने (६१ चेंडू, २७ धावा) संथ फलंदाजी केली. वैयक्तिक अर्धशतक पूर्ण केल्यानंतरही मानधनाने आक्रमक पवित्रा कायम राखला.आक्रमक खेळी करण्याच्या प्रयत्नात जोनासनच्या गोलंदाजीवर ती झेलबाद झाली. त्यानंतर भारताचा डाव गडगडला. राऊत बाद झाल्यानंतर मिताली राज (१५), अष्टपैलू हरमनप्रीत कौर (१७) यांनी मोठी खेळी करता आली नाही. दीप्ती शर्मा (२६) आक्रमक फटका खेळण्याच्या प्रयत्नात बाद झाली, तर वेदा कृष्णमूर्ती (२) व यष्टिरक्षक फलंदाज सुषमा वर्मा (८) यांनी दुहेरी आकडा गाठता आला नाही.भारतातर्फे दुसरी सर्वाधिक धावसंख्या नवव्या क्रमांकावर फलंदाजी करणाºया पूजा वस्त्राकारने (३०) नोंदवली. त्यामुळे संघाला दोनशेचापल्ला ओलांडता आला.त्याआधी, बोल्टनने एलिसा हिलीसोबत (१९) सलामीला ५४ व कर्णधार मेग लॅनिंगसोबत (२४) दुसºया विकेटसाठी ६६ धावांची भागीदारी करीत आॅस्ट्रेलियाला चांगली सुरुवात करुन दिली. दरम्यान, भारताने १४ धावांच्या अंतरात तीन बळी घेत पुनरागमन करण्याचा प्रयत्न केला, पण पेरी व मूनी यांनी पाचव्या विकेटसाठी ९६ धावांची भागीदारी करीत संघाला मोठी धावसंख्या उभारुन दिली.संक्षिप्त धावफलक : आॅस्टेÑलिया महिला : ५० षटकात ९ बाद २८७ धावा (निकोल बोल्टन ८४, एलिस पेरी नाबाद ७०, बेथ मूनी ५६; शिखा पांडे ३/६१, पूनम यादव २/५२) वि.वि. भारत महिला : ४९.२ षटकात सर्वबाद २२७ धावा (स्मृती मानधना ६७, पूजा वस्त्राकर ३०; जेस जोनासन ३/५१, अमांडा वेलिंग्टन २/२०, एलिस पेरी २/४१)
- Cricket Buzz»
- बातम्या»
- भारतीय महिलांचा दुसरा पराभव, आॅस्ट्रेलियाने मालिका जिंकली
भारतीय महिलांचा दुसरा पराभव, आॅस्ट्रेलियाने मालिका जिंकली
स्मृती मानधनाने चांगली सुरुवात करून दिल्यानंतरही भारतीय महिला संघाला मधली फळी अपयशी ठरल्यामुळे आॅस्ट्रेलियाविरुद्ध गुरुवारी झालेल्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात ६० धावांनी पराभव स्वीकारावा लागला.
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 16, 2018 1:36 AM