सेंच्युरियन : लुंगी एन्गिडीने भारताच्या के. राहुल (४) आणि कर्णधार विराट कोहली (५) व रबाडाने मुरली विजयला (९) धावांवर बाद करुन भारताची दुस-या डावात ३ बाद ३५ अशी दयनीय अवस्था केली. दिवसाचा खेळ संपला तेव्हा चेतेश्वर पुजारा आणि पार्थिव पटेल खेळपट्टीवर होते. बुधवारी शेवटच्या दिवशी भारताला विजयासाठी २५२ धावांची आवश्यकता आहे. तडाखेबंद फलंदाज एबी डिव्हिलियर्स आणि डीन एल्गर यांच्या शतकी भागीदारीच्या जोरावर दक्षिण आफ्रिकेने दुसºया डावात सर्व बाद २५८ धावा करीत भारताला २८७ धावांचे आव्हान दिले.
तत्पूर्वी दक्षिण आफ्रिकेने २ बाद ९० धावांवरून सुरुवात केली. एबी डिव्हिलियर्स (८० धावा) याने सलामीवीर डीन एल्गर (६१ धावा) याच्यासोबत तिसºया गड्यासाठी १४१ धावांची भक्कम भागीदारी केली. संघ १४४ धावांवर असताना डिव्हिलियर्स बाद झाला. त्यानंतर लगेचच एल्गरही परतला. चहापानाच्या वेळी कागिसो रबाडा आणि फाफ डु प्लेसिस खेळत होते. फाफ डु प्लेसिस याने व्हर्नाेन फिलँडरसोबत सहाव्या गड्यासाठी ४६ धावांची भागीदारी केली. या दोघांनी १५६ चेंडूंचा सामना केला. त्यानंतर इशांत शर्मा याने ७४ व्या षटकात फिलँडर याला शॉर्ट चेंडूवर मुरली विजयकडे झेल देण्यास भाग पाडले. दोन षटकांनंतर शर्मा यानेच केशव महाराजला बाद करीत आफ्रिकेचा सातवा गडी बाद केला.
८० षटकांनंतरही भारताचा नवा चेंडू न घेण्याचा निर्णय हैराण करणारा होता. तसेच ४ गडी बाद करणाºया मोहम्मद शमी याला दुसºया सत्रात फक्त एकच षटक देण्यात आले. भारताकडून आक्रमणाची सुरुवात जसप्रीत बुमराह आणि इशांत शर्मा यांनी केली. डिव्हिलियर्स आणि एल्गर यांनी पहिल्या तासाभरातच ५४ धावा करत संघाला चांगली सुरुवात करून दिली. या दोघांनी १६७ चेंडूंत १०० धावांची भागीदारी केली. दक्षिण आफ्रिकेने ४३ व्या षटकातच १५० धावा पूर्ण केल्या.
त्यानंतर शमीने भारताला पुनरागमन करून दिले. शमीने डिव्हिलियर्सला पार्थिव पटेलकरवी झेलबाद केले. चार षटकांत एल्गरदेखील शमीच्या चेंडूवर लोकेश राहुलकडे झेल देऊन परतला.
फाफ डु प्लेसिस ६ धावांवर असताना लोकेश राहुल याने त्याचा झेल सोडला. डीकॉकला पार्थिव पटेल यानेच जीवदान दिले. मात्र शमीने डीकॉकला बाद करत आफ्रिकेला आणखी एक धक्का दिला.
आयसीसी आचारसंहिता भंगप्रकरणी कोहलीला दंड
विराटला मिळणाºया सामना शुल्कातील २५ टक्के रक्कम दंड म्हणून कपात करण्यात येईल. आयसीसीने स्पष्ट केले, ‘भारतीय कर्णधार विराट कोहलीवर आयसीसी आाचारसंहिता लेव्हल-१ उल्लंघनासाठी सामना शुल्काच्या २५ टक्के रकमेचा दंड ठोठावण्यात आला आहे. त्याचसोबत त्याच्या खात्यात एक डिमेरीट गुण जोडला गेला आहे.’ ही घटना दक्षिण आफ्रिकेच्या दुसºया डावातील २५व्या षटकात घडली. त्या वेळी पावसामुळे खेळ उशिरा सुरू झाला आणि बाह्य मैदान ओलसर असल्यामुळे चेंडूवर फरक पडत असल्याची तक्रार विराट वारंवार पंच मायकल गॉ यांच्याकडे करीत होता. कोहलीने आयसीसी खेळाडू व सपोर्ट स्टाफसाठी आचारसंहिता कलम २.१.१ चे उल्लंघन केले आहे.
धावफलक
द. आफ्रिका पहिला डाव : सर्व बाद ३३५, भारत पहिला डाव : सर्व बाद ३०७, द. आफ्रिका दुसरा डाव : एकूण ९१.३ षटकांत २५८ धावा. एडन मार्कराम पायचित गो. बुमराह १, डीन एल्गर झे. राहुल गो. शमी ६१, आमला पायचित गो. बुमराह १, डिव्हिलियर्स झे. पार्थिव गो. शमी ८०, फाफ डु प्लेसिस झे. व गो. बुमराह ४८, क्विंटन डी कॉक झे. पार्थिव गो. शमी १२, व्हर्नोन फिलँडर झे. विजय गो. इशांत २६, केशव महाराज झे. पार्थिव गो. इशांत शर्मा ६, कागिसो रबाडा झे. कोहली गो. शमी ४, मॉर्नी मॉर्केल नाबाद १०, लुंगी एन्गिडी झे. विजय गो. आश्विन १, अवांतर १०, गोलंदाजी - आश्विन २९.३-६-७८-१, बुमराह २०-३-७०-३, इशांत १७-३-४०-२, शमी १६-३-४९-४, पंड्या ९-१-१४-०.
भारत दुसरा डाव : २३ षटकांत ३ बाद ३५ धावा मुरली विजय गो. रबाडा ९, लोकेश राहुल झे. केशव महाराज गो. एन्गिडी ४, चेतेश्वर पुजारा खेळत आहे ११, विराट कोहली पायचित एन्गिडी ५, पार्थिव पटेल खेळत आहे ५.
Web Title: India's second innings in the worst conditions, Team India 35 for 3; D. South African strong lead
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.