आॅकलंड : भारतीय संघाने आज, रविवारी ईडन पार्कवर होणाऱ्या दुसºया टी-२० लढतीत न्यूझीलंडवर विजय मिळवून आघाडी दुप्पट करण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. संघात विजयी संयोजन कायम राहणार असले तरी, गोलंदाजीत किरकोळ बदलाची शक्यता आहे.जसप्रीत बुमराहने पहिल्या सामन्यात सर्वात कमी म्हणजे षटकामागे आठ धावा दिल्या होत्या. मोहम्मद शमीने चार षटकात ५३ आणि शार्दुल ठाकूरने तीन षटकात ४४ धावा मोजल्या. न्यूझीलंडने मनसोक्त धावा वसूल केल्या होत्या.
शमी संघात कायम राहण्याची शक्यता असून, ठाकूरचे स्थान नवदीप सैनी घेऊ शकतो. तीन वेगवान आणि दोन फिरकी असे पाच गोलंदाज खेळतील का, हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे. भारताने अतिरिक्त फिरकी गोलंदाज खेळविल्यास अष्टपैलू शिवम दुबे हा तिसरा पर्यायी वेगवान गोलंदाज ठरू शकतो.
फलंदाजीबाबत कोहली समाधानी दिसला. श्रेयस अय्यरने नाबाद ५८ धावा करीत चौथे स्थान भक्कम केले. भारताने २०४ धावांचे लक्ष्य गाठले, ही दौºयाची चांगली सुरुवात म्हणावी लागेल. लोकेश राहुलने यष्टिरक्षणाची जबाबदारी स्विकारल्यामुळे संघात लवचिकता आली आहे. यामुळे कर्णधाराकडे आणखी एक फलंदाज किंवा गोलंदाजाला खेळवण्याची मुभा मिळत आहे. मनीष पांडे आणि दुबे यांनी मॅचफिनिशरची भूमिका वठविल्यामुळे भारताचे पारडे जड झाले आहे. संघाच्या योग्य ताळमेळाच्या बळावर भारताचे टी-२० संयोजन शानदार बनले आहे.
न्यूझीलंडला पहिल्या सामन्यात १०-१५ धावा कमी झाल्याचे शल्य आहे. याशिवाय मैदानावर गमावलेल्या संधीचा लाभ भारताच्या फलंदाजांनी घेतला होता. भारताने फेब्रुवारी २०१९ ला येथे विजय मिळविला होता. तथापि, तीन सामन्यांची टी-२० मालिका भारताला १-२ अशी गमवावी लागली. न्यूझीलंड आजच्या सामन्यात आधीचाच संघ कायम ठेवणार आहे.
भारत : विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा, लोकेश राहुल (यष्टिरक्षक), मनीष पांडे, ऋषभ पंत, संजू सॅमसन, श्रेयस अय्यर, शिवम दुबे, रवींद्र जडेजा, कुलदीप यादव, युजवेंद्र चहल, मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह, शार्दुल ठाकूर, नवदीप सैनी आणि वॉशिंग्टन सुंदर.
न्यूझीलंड : केन विलियम्सन (कर्णधार), मार्टिन गुप्तिल, रॉस टेलर, स्कॉट कुगेलेजिन, कॉलिन मुन्रो, कॉलिन डी ग्रॅन्डहोम, टॉम ब्रूस, डेरिल मिशेल, मिशेल सँटनर, टिम सिफर्ट (यष्टिरक्षक), हॅमिश बेनेट, ईश सोढी, टिम साउदी आणि ब्लेयर टिकनर.