मुंबई : भारताचा फिरकीपटू आर. अश्विनच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला गेला आहे. अश्विन भारताच्या ट्वेन्टी-२० आणि एकदिवसीय संघात नाही. कसोटी सामन्यांमध्येही अश्विनचे स्थान निश्चित समजले जात नाही. पण तरीही अश्विनच्या शिरपेचात एक मानाचा तुरा खोवला गेला आहे. क्रिकेट विश्वामध्ये अश्विनला एक मोठा बहुमान मिळाला आहे.
गेल्या दशकामध्ये सर्वाधिक विकेट्स मिळवण्याचा पराक्रम अश्विनच्या नावावर झाला आहे. कारण गेल्या वर्षभरात अश्विनने ५६४ विकेट्स मिळवल्या आहेत. या ५६४ विकेट्स मिळवताना अश्विनने जेम्स अँडरसन, स्टुअर्ट ब्रॉड, ट्रेंट बोल्ट, टीम साऊथी यांना पिछाडीवर टाकले आहे.
अश्विनने २०११ साली आंतरराष्ट्रीय स्तरावर पदार्पण केले होते. त्यानंतर सातत्याने अश्विनने विकेट्स मिळवत संघातील आपले स्थान कायम राखले होते. कसोटी क्रिकेटमध्ये सर्वात जलद ३०० विकेट्स मिळवण्याचा पराक्रमही अश्विनच्या नावावर आहे. पण २०१७ सालापासून अश्विनला ट्वेन्टी-२० आणि एकदिवसीय संघातून वगळण्यात आले आहे. त्यानंतर अश्विन फक्त कसोटी क्रिकेटमध्ये भारताचे प्रतिनिधीत्व करत आहे.