मुंबई, भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया : ऑस्ट्रेलियाचा संघ भारताच्या दौऱ्यावर येणार आहे. भारताने ऑस्ट्रेलियाला त्यांच्याच मातीत पराभूत केले होते. या गोष्टीचा बदला घेण्यासाठी ऑस्ट्रेलियाचा संघ आतूर आहे. आता तर ऑस्ट्रेलियाच्या संघा भारताचाच एक फिरकीपटू मदत करणार असल्याचे समोर आले आहे.
भारतीय खेळपट्टीही फिरकीला पोषक असते. सध्याच्या घडीला ऑस्ट्रेलियाकडे चांगला फिरकीपटू नाही. त्याचबरोबर ऑस्ट्रेलियाच्या फिरकीपटूला भारतामध्ये जास्त यश मिळाल्याचेही पाहायला मिळालेले नाही. पण भारतीय खेळाडूंना मायदेशातील प्रत्येक खेळपट्टीचा पोत माहिती असतो.
भारतीय संघ घरच्या मैदानावर ऑस्ट्रेलियाविरुद्ध दोन ट्वेंटी-20 आणि पाच वन डे सामने खेळणार आहे. त्यामुळे वर्ल्ड कप स्पर्धेपूर्वी भारतीय संघाकडे केवळ सात सामने आहेत. पाच सामन्यांची वन डे मालिका 2 मार्चपासून सुरु होईल आणि पहिला सामना हैदराबाद येथे होईल. त्यानंतर नागपूर ( 5 मार्च), रांची ( 8 मार्च), मोहाली ( 10 मार्च ) व दिल्ली ( 13 मार्च ) असे सामने होतील.
ऑस्ट्रेलियाच्या संघाने आपल्या ताफ्यात भारतातील एका प्रशिक्षकाची निवड केली आहे. हा फिरकीपटू मुंबईचा असून तो आयपीएलमध्ये किंग्ज इलेव्हन पंजाब या संघाकडून खेळला होता. भारतातील खेळपट्ट्यांचा त्याला चांगला अंदाज आहे. त्यामुळेच ऑस्ट्रेलियाने प्रदीप साहू या फिरकीपटूची प्रशिक्षक म्हणून नियुक्ती केली आहे. या नियुक्तीला बीसीसीआयनेही परवानगी दिली आहे. ऑस्ट्रेलिया जेव्हा युएईमध्ये पाकिस्तानविरुद्ध खेळणार आहे, तेव्हा प्रदीप त्यांना मदत करणार आहे.
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मायदेशात होणाऱ्या ट्वेंटी-20 आणि वन डे मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली. न्यूझीलंड दौऱ्यानंतर विश्रांतीवर गेलेल्या कर्णधार विराट कोहलीचे या सामन्यात कमबॅक झाले आहे. भारतीय संघ आगामी वर्ल्ड कप स्पर्धेची पूर्वतयारी म्हणून ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या वन डे मालिकेकडे पाहत आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने ( बीसीसीआय ) पहिल्या दोन वन डे आणि उर्वरित वन डे सामन्यांसाठी वेगळे संघ जाहीर केले आहेत. ट्वेंटी- 20 मालिकेसाठी संघ जाहीर केला आहे. दिनेश कार्तिकला वन डे संघातून डच्चू देण्यात आला आहे.
कोहलीचा ट्वेंटी-20 व वन डे संघात समावेश करण्यात आला आहे. त्याच्यासह जसप्रीत बुमराचाही 15 सदस्यीय संघांत समावेश करण्यात आला आहे. बुमरालाही ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी मालिकेनंतर विश्रांती देण्यात आली होती. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील मालिकेला ट्वेंटी-20 सामन्याने 24 फेब्रुवारीपासून सुरुवात होणार आहे. दोन सामने अनुक्रमे विशाखापट्टणम व बंगळुरु येथे होतील.